स्थापना : २१ ऑक्टोबर, १९५०). केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्था (सीएफटीआरआय) ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते. याचे मुख्य कार्यालय म्हैसूर येथे आहे. मुख्य कार्यालयाव्यतिरिक्त हैदराबाद, मुंबई आणि लखनौ या तीन भिन्न राज्यांतील शहरांत सीएफटीआरआयची संसाधन केंद्रे आहेत. संस्थेच्या संकुलात सूक्ष्मजीवशास्त्र, धान्य, अन्न अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जीवरसायन, रेणवीय पोषणशास्त्र, अन्नसुरक्षा अशा सोळा भिन्न विभागांचा समावेश आहे. संस्थेने आजपर्यंत तीनशेपेक्षा जास्त उत्पादने, उत्पादनप्रणाली, पद्धती, उपकरणे विकसित केली आहेत. अधिक उत्पादन, उच्च गुणवत्ता, सफाईदार निर्मिती यांमुळे संस्थेच्या माध्यमातून देशाला परकीय चलन मिळत आहे.

अन्नधान्य, फळे, भाज्या अशा खाद्य उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे साहजिकच संस्था तेलबिया, तृणधान्ये, कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ देणाऱ्या वनस्पती, औषधी द्रव्ये देणाऱ्या वनस्पती, फळभाज्या, फूलभाज्या, सस्तनी प्राण्यांचे मांस, मासे, पक्ष्यांचे मांस, अंडी, झिंग्यांचे लोणचे, निवडुंगापासून पेये, शेवग्याच्या शेंगांचे (पावडर रूपातील) सूप, तयार इडली, वडा, डोसा चकली, जिलेबी, शेवया उपमा – अशा खाद्यपदार्थांचा विविध अंगांनी अभ्यास करते.

भारत सरकार व स्व‍ित्झर्लंड सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने आणि सहकार्याने संस्थेच्या मार्गदर्शनाखाली इंटरनॅशनल स्कूल ऑफ मिलिंग टेक्नॉलॉजी (आयएसएमटी) संस्थेमार्फत गेली कित्येक वर्षे धान्यांसंबंधी एक अभ्यासक्रम राबवला जातो. अत्युच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून, स्वच्छ, ताजे, टिकाऊ, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्वीकारले जाईल असे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, चणाडाळ, मूगडाळ यांचे पीठ निर्जंतुक करून त्यांची साठवणूक, वितरण व्यवस्था कशी करता येईल, निवडणे, चाळणे, ओतणे, दळणे, भरडणे, पिशव्यांत भरणे, त्या पूर्ण हवाबंद करणे अशा कामांसाठीची यंत्रे अधिक सुरक्षित, प्रभावी, स्वस्त कशी करता येतील यावर सतत संशोधन या माध्यमातून असतात.

अन्नमार्गात न पचणारे, सेल्युलोज धागे असणारे, सारक गुण असणारे (पोट साफ करायला मदत करणारा), नाचणीयुक्त पाव, मिश्र फळाचा मुरांबा, सुके आले (सुंठ), प्रथिन मात्रा वाढवलेला पाव निर्माण करण्याचे तंत्र संस्थेने प्रसारित केले. हिरव्यागार मिरचीची चटणी, इडली, डोसा पीठ, हळद कांडे, तांदळाखेरीज ज्वारी, बाजरी, नाचणी ही आणि इतर भरड तृणधान्ये; लाह्या, चिवडा यांसारखी उत्पादने आणि पायांनी चालवण्याचे पापड-यंत्र संस्थेकडून उपलब्ध झाले आहे. तांदूळ आणि नारळाचे दूध यांचे तयार मिश्रण, लाडू, करंज्यांसारख्या अनेक मिठायांमध्ये लागणारे नारळाचे सारण, सुका नारळ (नारळाचे तेल, दूध काढून घेतलेले खोबरे) मिसळून बनवलेली खमंग, स्वादिष्ट बिस्किटे, यांसारखी उत्पादनांची यादी मोठी  आहे.

अन्न पदार्थांशी संबंधित पंचवीस छोटे अभ्यासक्रम संस्था युवकांना देऊ करते. त्यात कीटकनाशकांचा वापर करून अन्न टिकवणे, उंदीर-घूशींसारख्या प्राण्यांचा बंदोबस्त करणे, अन्न उद्योगातील वीज वापर यंत्रे सुरक्षितपणे कशी वापरावी आणि त्यांची देखभाल, जुजबी दुरुस्ती, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, पीयुष, चीज यांसारखे अन्नप्रकार बनवणे, अन्नघटकांचे पृथक्करण करणे, तेलबियांतून तेल गाळणे, पाव बिस्किटांसारखे पदार्थ भाजणे, विविध तऱ्हेचे मसाले तयार करणे शिकवले जाते. स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना हे ज्ञान आणि कौशल्य वापरून ताबडतोब पैसे मिळतील अशा या अभ्यासक्रमांना भरपूर मागणी आहे.

जगभरात वयस्कर लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यांच्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी अशा भरड धान्यांपासून आंबवून बनविलेली जीवनसत्त्व, कॅल्शियमसारख्या खनिजांनी युक्त पेये किंवा भरड धान्यांपासून साका – दुधाविना दही संस्थेने विकसित केले आहे. तसेच संस्थेकडून ‘ॲथलिटबीट’. या प्रकल्पाद्वारे खेळाडूंसाठी त्यांच्या विशिष्ट आहार गरजा पुरवणारे, ऊर्जादायक, जीवनसत्त्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात देणारे खाद्य-पेय पदार्थ निर्माण केले जातात.

कळीचे शब्द : #खाद्य #तंत्रज्ञान #संशोधन #प्रशिक्षण

संदर्भ : 

समीक्षक : मोहन मद्वाण्णा