(स्थापना : १९७४). होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अर्थात होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची (HBCSE; एचबीसीएसई) निर्मिती जुलै १९७४ मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टकडून मिळालेल्या अनुदानांतर्गत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिर्सचचा (टिआयएफआर; TIFR) एक घटक म्हणून करण्यात आली. पहिली सात वर्षे, एचबीसीएसईला या ट्रस्टचा पाठिंबा होता; नंतर, अणुऊर्जा विभागाने टिआयएफआरचा एक भाग म्हणून त्याला पाठिंबा देण्याचे काम हाती घेतले. एचबीसीएसई आता टिआयएफआरच्या स्कूल ऑफ नॅचरल सायन्सेस अंतर्गत एक राष्ट्रीय केंद्र आहे. हे केंद्र विज्ञान-गणित शिक्षणामध्ये संशोधन व विकासासाठी समर्पित संस्था  आहे..

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची इमारत

टिआयएफआर मधील काही शास्त्रज्ञांना देशातील विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या समस्येत रस निर्माण होऊन त्यांनी स्वेच्छेने मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आणि मध्य प्रदेशातील ग्रामीण भागात कार्यक्रम राबवले. जसजसे उपक्रम वाढत गेले, तसतसे संस्थात्मक समर्थनाची, क्षेत्रीय प्रकल्प पद्धतशीरपणे राबविण्यासाठी, विज्ञान शिक्षणामध्ये संबंधित मूलभूत संशोधन करण्यासाठी आणि चांगले शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी तीव्र गरज भासू लागली.

विज्ञानशिक्षण प्रसाराकरिता विज्ञान शिक्षक प्रशिक्षणासाठी साहित्य तयार करणे, शिक्षक प्रशिक्षकांना प्रशिक्षित करणे इ. कामे या या केंद्रामार्फत करण्यात येतात. ‘किशोर’ सारख्या मासिक पत्रिकेत ‘शंका समाधान’ नामक सदर एचबीसीएसईने सुरू केले. किशोर मासिकातील प्रश्न-उत्तरांची पुढे संकलन करून विविध भाषांमध्ये ते प्रकाशित करण्यात आले आहे. मराठी विज्ञान पाठ्यपुस्तके निर्मितीची कामेही या केंद्रात करण्यात आली आहे. पहिली ते पाचवी इयत्तांसाठी प्राथमिक विज्ञानाचा पाया म्हणून होमी भाभा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. मुलांसाठी साध्या, सोप्या भाषेत पाठ्यपुस्तके, शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका, तसेच कृतीपुस्तकेही केंद्राने प्रयत्नपूर्वक तयार केली आहेत.

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड या आव्हानात्मक परीक्षांसंबंधी माहिती देणारी पुस्तके केंद्राने प्रकाशित केली आहेत. केंद्राकडून भारतीय पातळीवर खगोलशास्त्र, भौतिकी, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र विषयांत ऑलिम्पियाड परीक्षांचे आयोजन केले जाते. या पाचही विषयांत गती आणि रुची असलेले पूर्ण वेळ तज्ज्ञ केंद्राकडे आहेत. होमी भाभा विज्ञान संशोधन केंद्रास विद्यापीठ अनुदान आयोगाने अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिल्याने टिआयएफआर भौतिकी, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि विज्ञान शिक्षण या पाच विषयात पीएच.डी देऊ शकते. ‘विज्ञान प्रतिभा’सारखाच परंतु आणखी उच्च ज्ञानपातळीवरील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातील पदवीपूर्व युवा गटासाठी नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडरग्रॅजुएट सायन्स (एनआययूएस) नावाचा प्रकल्प केंद्राने २००४ पासून कार्यान्वित केला आहे. एनआययूएस हा प्रकल्प शुद्ध विज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांकरिता मुख्यत्: सुरू करण्यात आला आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र शिक्षणाच्या सर्व पातळ्यांवर कार्यरत असते. शिवाय केंद्राच्या सर्व प्रकल्पांतून विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, पर्यावरणीय ज्ञान आणि गणित एकमेकांबरोबर जोडून एकात्म रूपात कसे वापरता येतील असे पाहिले जाते. विद्यार्थी केंद्रीत अशा या उपक्रमांचा मुलांना विज्ञान आणि गणिताची गोडी लागावी असा उद्देश आहे.

कळीचे शब्द : #विज्ञानशिक्षण #संशोधन

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा