उत्परिवर्तन म्हणजे पेशीच्या केंद्रस्थानी असलेल्या डीएनएमध्ये (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लामध्ये) झालेल्या बदलामुळे सजीवाच्या गुणधर्मामध्ये झालेला बदल. हा बदल कायमस्वरूपी आणि आनुवांशिक असतो. डीएनए  हा चार प्रकारच्या बेसेसचा (क्षारकीय संयुगांचा) बहुवारिक (Polymer) असून त्यात बेसेसच्या क्रमात माहिती साठविलेली असते. ही माहिती सुरक्षित आणि बिनचूक ठेवण्यासाठी पेशीमध्ये यंत्रणा असते, परंतु तरीही काही बदल होतात आणि त्यामुळे डीएनएमधील माहितीत बदल होतो. या बदलाचा परिणाम सजीवाच्या गुणधर्मात बदल होण्यामध्ये होतो. डीएनएमध्ये बदल होणे आणि त्याच्यामुळे गुणधर्म बदलणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. उत्परिवर्तनाची कल्पना मांडली गेली तेव्हा डीएनएचा शोध लागलेला नव्हता, निरीक्षणांच्या आधारावर ही कल्पना मांडली गेली होती.

ह्यूगो द व्ह्ररीस (१६ फेब्रुवारी १८४८ – २१ मे १९३५) या डच वनस्पतिशास्त्रज्ञाने इव्हिनिंग प्रिमरोझ (इनोथेरा लामार्कींयाना ) या फुलझाडाचे जंगली वाण व लागवडीचे वाण यांच्यामधील फरकांचे निरीक्षण केले. त्याने एका प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली असता त्यात त्याला फरक असलेली फुलझाडे दिसून आली. या अचानक होणाऱ्या बदलांच्या निरीक्षणातून त्याने  उत्परिवर्तनाची कल्पना मांडली. त्यानंतर उत्परिवर्तन हे सर्वच सजीवांमध्ये घडते असे आढळून आले.

डीएनएची आवृत्ती (replication) होताना  बेस क्रमामध्ये झालेल्या चुका, वैश्विक किरण व नैसर्गिक प्रारणे यांचा होणारा परिणाम किंवा डीएनए किंवा गुणसूत्रे यांच्यातील वाढ वा घट अशा कारणांमुळे नैसर्गिक उत्परिवर्तने घडतात. बहुतेक उत्परिवर्तनांचा परिणाम बिघाड या स्वरूपाचा असतो व त्यामुळे ते उत्परिवर्तन असलेल्या वनस्पतीस किंवा प्राण्यास इतरांच्या तुलनेत नुकसान होते. त्यामुळे अशी उत्परिवर्तने नामशेष होतात. काही उत्परिवर्तने वनस्पतीस किंवा प्राण्यास इतरांच्या तुलनेत फायदा मिळवून देतात, त्यामुळे ते उत्परिवर्तन असलेली वनस्पती जास्त कार्यक्षम किंवा यशस्वी ठरते. असे उत्परिवर्तन पुढच्या पिढीत उतरते व त्या वनस्पतीच्या समूहात कायमस्वरूपी गुणधर्म म्हणून दिसून येते. उत्परिवर्तनांचे निर्माण होणे, नामशेष होणे किंवा निवड होऊन टिकून राहणे ही  क्रिया निसर्गात अव्याहतपणे सुरू असते. काही उत्परिवर्तने अशी असतात की, ज्यांमुळे उत्परिवर्तास (Mutant) फायदा किंवा नुकसान होत नाही अशी उत्परिवर्तनेदेखील टिकून राहतात.

नैसर्गिक उत्परिवर्तन हा जैवविविधतेचा स्रोत आहे. उत्परिवर्तने जरी यदृच्छया (Randomly) होत असली तरी त्यातून निसर्गातल्या  घटकांमुळे  होणारी काही उत्परिवर्तने निवडली जातात व त्यापासून उत्क्रांती झालेली दिसून येते. नैसर्गिक उत्परिवर्तने ही आर्थिक दृष्ट्यादेखील  महत्त्वाची बाब आहे. पिकांचे नवे वाण निर्माण करताना नैसर्गिक उत्परिवर्तने उपयोगी पडतात. रोग किंवा तणाव प्रतिबंधक्षमता असलेले  नवे वाण निर्माण करताना हे उपयुक्त गुणधर्म निसर्गात होणाऱ्या उत्परिवर्तनातून उपलब्ध होऊ शकतात. वापरात असलेली बरीच पिके, फळे आणि भाज्या या नैसर्गिक उत्परिवर्तनामधून निर्माण झालेल्या विविधतेतून निवड करून निर्माण करण्यात आल्या आहेत.

                                                                                                                                                                                                                           समीक्षक : डॉ. बाळ फोंडके