इंग्रजी भाषेत भारतातून प्रसिद्ध होणारे एक साप्ताहिक आणि जगप्रसिद्ध नियतकालिक. याची स्थापना इ. स. १९४९ मध्ये सचिन चौधरी या पत्रकाराने इकॉनॉमिक वीकली या मूळ नावाने केली होती. इकॉनॉमिक वीकलीचे १९६६ मध्ये नामांतरण होऊन इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली या नावाने ते प्रसिद्ध होऊ लागले. समीक्षा विश्वस्त निधी या सार्वजनिक न्यासातर्फे हे साप्ताहिक चालविले जाते. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, स्त्रीविषयक समस्या, कायदा, राज्यघटना इत्यादी विषयांवर यात बहुतांशी लेखन असते. प्रचलित घडामोडींचा मागोवा घेणे, त्यावर भाष्य करणे, त्याची टीकात्मक चिकित्सा करणे, धोरणांचे विश्लेषण करणे, धोरणांचे मूल्यमापन करणे इत्यादी या नियतकालिकेचा मुख्य गाभा आहे. यांशिवाय यामध्ये स्वतंत्र शोधनिबंध व लेखही असतात. गंभीर, वैचारिक चिकित्सक व मूल्यमापनात्मक लेखन हे यामधील लिखाणातील मुख्य वैशिष्ट्ये आहे.

साधारणपणे १९९० पर्यंत देशातील अर्थकारणावर व राजकारणावर डाव्या विचारांचा प्रभाव होता. लोकशाही समाजवादाचा स्वीकार व पाठपुरावा हे त्याचे प्रसिद्ध उदाहरण होय. विमा उद्योगांचे, बँकांचे राष्ट्रीयीकरण, नियमन व नियंत्रणावर आधारित औद्योगिक धोरण ही त्याच्या व्यवहारातील रूपे होती. प्रस्तुत साप्ताहिकात या धोरणांच्या बाजूने लिखाण प्रसिद्ध होत असे; मात्र त्याच बरोबर या धोरणांची आंधळेपणाने भलावण न करता त्याचे चिकित्सक मूल्यमापन करणे, त्यातील त्रुटी दाखविणे, त्यातील राजकीय-सामाजिक पैलू उलघडून दाखविणे अशा स्वरूपाचे मुबलक लिखाण यात असे. विश्लेषक, संशोधक, प्राध्यापक, पत्रकार, विद्यार्थी, धोरणकर्ते, यांना हे नियतकालिक एक आवश्यक संदर्भ म्हणून उपयोगी पडत असे.

देशात १९९० नंतर टप्प्याटप्प्याने जो खुलेपणाचा आणि जागतिकीकरणाचा स्वीकार केला गेला, त्याला अनुसरून या नियतकालिकेने आपले अंतरंग बदलते ठेवले आहे. आता दलित चळवळी, महिलाविषयक समस्या, देशातील प्रादेशिक विषमता, आर्थिक सुधारणा कार्यक्रमाची फलश्रुती, या सुधारणा कार्यक्रमाने निर्माण होणाऱ्या समस्या, कर पद्धतीतील बदलांचा मागोवा, नक्षलवादी चळवळ, जगातील एकध्रुवीय सत्ता, बँकिंग क्षेत्रातील घडामोडी, मध्यवर्ती बँकांची कार्यपद्धती, गरिबी-कुपोषणाच्या समस्या, नागरी विभागांच्या विकासाचे पैलू, साहित्य आणि विकास यांचा परस्परसंबंध अशा अनेक विषयांवर मार्मिक लिखाण या नियतकालिकात आढळते. वस्तूनिष्ठ विश्लेषण, तर्कशुद्ध मांडणी, कठोर मूल्यमापन, समतोल पण काहीशी डावीकडे झुकणारी भूमिका इत्यादी साप्ताहिकाची वैशिष्ट्ये वाचकाला जाणवतात.

साप्ताहिकाच्या अंकांमध्ये संपादकीय लेखाबरोबर स्फुट, टीकाटिप्पणी, परीक्षणात्मक लेख, पुस्तक परीक्षणे, सरकारी-निमसरकारी धोरणे व अहवालांवर चर्चा, भाष्य, पत्रव्यवहार, विशेष लेख, सदरे, सांख्यिकी माहिती अशा प्रकारचे साहित्य असते. त्रैमासिक आढाव्यामध्ये स्त्रीविषयक धोरणांची-समस्यांची चिकित्सा, राज्यांची खबरबात, शेतीविषयक समस्यांचे विश्लेषण, औद्योगिक धोरणांची चिकित्सा, अंदाजपत्रकावरील चर्चा, वित्तीय संमस्यांचा मागोवा असा मजकूर असतो. साप्ताहीकेतील सर्व लेख मूळ लेखकांच्या नावाने प्रसिद्ध होतात. लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्याचे मूल्यमापन केले जाते व जरूर पडल्यास त्यांच्या सुचनांनुसार लेखात बदल/सुधारणा सुचविल्या जातात. या नियतकालिकातील महत्त्वाच्या लेखांचा निवडक भारतीय भाषांमध्ये अनुवाद करून वाचकांसाठी तेही उपलब्ध करून दिले जाते.

इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकलीतर्फे काही पुस्तकांचे संपादन व प्रकाशनही केले जाते. तसेच इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली व समीक्षा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काही संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात आणि त्यांचे अहवालही यात प्रसिद्ध केले जातात. भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय धोरणांवर आपल्या भूमिकेचा प्रभाव पाडणारे एक आघाडीचे नियतकालिक म्हणून इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली प्रसिद्ध आहे.

समीक्षक : ज. फा. पाटील