सातारा जिल्ह्यातील कृष्णेची सर्वांत मोठी उपनदी व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानली जाणारी नदी. कोयना महाबळेश्वर पठाराच्या पश्चिम भागातील एलफिन्स्टन पॉइंटजवळ (१७° ५८’ उत्तर आणि ७३° ४३’ पूर्व) उगम पावते. ती सातारा जिल्ह्यातील पाटण व कराड तालुक्यातून वाहत असून तिचा एकूण १२८ किमी.चा वहनमार्ग या जिल्ह्यातून गेला आहे. कोयनेच्या उगमापासून पहिल्या ६४ किमी.च्या लांबीत तिचे पात्र अरुंद, पण खोल आढळते. उगमापासूनचे हे वहन उत्तर-दक्षिण आहे आणि नंतर पाटण तालुक्यातील हेळवाक येथून ती एकदम पूर्वेकडे वळून पुढे कराडजवळ कृष्णा नदीला मिळते. कोयनेच्या सोळशी, कंदाटी किंवा कांदाटी, केरा, मोरणा व वांग या पाच उपनद्या आहेत. या सर्व नद्या सह्याद्रीत उगम पावतात. जावळी तालुक्यातील बामणोली आणि तांबी गावाजवळून वाहताना कोयनेला बामणोली पासून ४.८ किमी.वर डावीकडून सोळशी नदी मिळते; तर दक्षिणेला ३.२ किमी.वर उजवीकडून कंदाटी मिळते. पाटणजवळून जाताना केरा डावीकडून, तर पुढे उजवीकडून मोरणा व वांग या नद्या कोयनेला मिळतात. कोयनेच्या खोऱ्यात महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील गावे येतात.

कोयनेच्या ८९२ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या खोऱ्यात सुमारे ५०८ सेंमी पाऊस पडतो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पायथ्यापासून हे खोरे सुमारे ४२७ मी उंच आहे. हा भाग घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. कोयना नदीच्या मोठ्या पाणलोटाला हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे बांध घालून कोयना धरण बांधलेले असून हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक आहे. त्यावरील १९६० मेवॉ. क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पामुळे महाराष्ट्राची विजेची मोठी गरज भागली आहे. कोयना धरणावरील जलविद्युतनिर्मिती प्रकल्प हा राज्यातील व देशातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. या जलविद्युत केंद्रावर अनेक उद्योगव्यवसायांची उभारणी झालेली आहे. या धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयाला ‘शिवाजीसागर’ जलाशय म्हणतात. कराडजवळ कृष्णा आणि कोयना समोरासमोर येऊन मिळतात. या संगमाला ‘प्रीतीसंगम’ असे नाव असून या स्थळाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या संगमावर अनेक मंदिरे असून तेथेच असलेली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी हे लोकांचे प्रेरणास्थान व या परिसरातील उद्यान पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. या संगमाजवळच सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळ असून येथील पंताचा कोट या परिसरात सातवाहनकालीन वसतीचे अवशेष आढळले आहेत. अश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णेप्रमाणेच कोयनेच्याही या नदीखोऱ्यात आढळली आहेत.

कोयना नदीच्या खोऱ्यांत गाळाच्या सततच्या संचयनामुळे जाड थर असलेल्या सुपीक मृदा आहेत. सातारा, जावळी व पाटण या तालुक्यांतील कोयना नदी व कोयना धरण परिसरातील ४२४ चौ. किमी. संरक्षित वनक्षेत्र ‘कोयना वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित झाले आहे. तसेच नैसर्गिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पश्चिम घाटाच्या छायेखालील कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसर एकत्र करून स्वतंत्र ‘सह्याद्री वाघ्र प्रकल्प’ म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. या अभयारण्यातील दाट वनामध्ये बिबळ्या, गवा, रानडुकरे, अस्वल, सांबर, भेकर, महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू इत्यादी प्राणी आढळतात. येथील कोयनानगर, हुंबरळी, नेहरू उद्यान, नवजा, वझर्डे धबधबा ही नैसर्गिक पर्यटनस्थळे व जंगली जयगड, वासोटा, चकदेव पर्वत ही ऐतिहासिक पर्यटनस्थळे पर्यटकांचे आकर्षण बनली आहेत. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शिरोभागी असलेले तापोळा हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले आहे. कोयना नदी आणि धरण परिसरामध्ये पात, शिंगाडा, वाम, कलबासू, मरळ, मृगळ इत्यादी खाद्यमाशांची पैदास होते व त्यांची मासेमारी व त्यावर आधारित उद्योग हे परिसरातील छोट्या उद्योजकांचे उत्पन्नाचे साधन आहे.

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.