हिमनदीच्या झीज कार्याने तयार होणारे भूस्वरूप. हिमनदी हा क्षरण (झीज) कार्याचा शक्तिशाली घटक असून त्याने पृथ्वीवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूविशेष निर्माण केले आहेत. प्रथमतः हिमनदीच्या खणन कार्यामुळे तिच्या पात्रात आराम खुर्चीसारख्या अर्धगोलाकार खड्ड्यांची निर्मिती होते, त्यांना हिमगव्हर किंवा सर्क म्हणतात. परस्पर विरुद्ध बाजूला असलेल्या दोन हिमगव्हरांच्या मधोमध एक अरुंद, लांब व तीव्र उताराचा भाग बनतो, त्याला शुककूट किंवा तीक्ष्ण कटक म्हणतात. जेव्हा तीन किंवा अधिक हिमगव्हर मध्यवर्ती बिंदूवर एकत्रित होतात, तेव्हा उभ्या निमुळत्या भिंतींनी बनलेले पिरॅमिड आकाराचे शिखर तयार होते, त्यालाच ‘गिरीश्रृंग’ असे म्हणतात.

बर्फाच्छादित प्रदेशांत बर्फाच्या घर्षणाने पर्वत हे उताराच्या दोन्ही बाजूला तळाकडून शिखर भागाकडे अंतर्वक्र आकाराने झिजले जातात व पर्वताचे शिखर शिंगाकृती उंच सुळक्यासारखे दिसते. प्रथम पर्वताच्या चोहोबाजूनी हिमनदीच्या विदारण प्रक्रियेने हिमगव्हरांची निर्मिती होते व नंतर त्या हिमगव्हरांच्या पार्श्वभागाचे क्षरण होऊन ते पर्वत शिखराकडे झिजत जातात. त्यामुळे पर्वताचे शिखर निमुळते व टोकदार बनते व ते शिंगासारखे दिसते, म्हणून त्याला गिरीशृंग म्हणतात. श्रृंगाच्या सर्व बाजूंच्या झिजलेल्या पृष्ठभागांची संख्या शिखरांच्या निर्मितीमध्ये सामील असलेल्या हिमगव्हरांच्या संख्येवर अवलंबून असते व ती सामान्यत: तीन ते चार असते. स्वित्झर्लंडमधील पेनाइन आल्प्स पर्वतातील व्हाइसमीस पर्वत आणि बर्नीझ आल्प्स पर्वतातील मंक शिखर ही चारपेक्षा जास्त तोंडे असलेल्या गिरिशृंगाची उदाहरणे आहेत. चार सममित पृष्ठभाग असलेल्या शिखराला मॅटरहॉर्न म्हणतात. अनेकदा ओळीने असलेल्या हिमगव्हरांमुळे अशा शृंगांची मालिकाच निर्माण होते. कालांतराने सतत झीज होऊन गिरिशृंग तुटून पडते व तेथे सपाट प्रदेश तयार होतो, त्याला खिंड किंवा ग्रीवा म्हणतात.

गिरिशृंगाला कधीकधी हिमनदीचे शिंग म्हणतात. हे एक कोनीय, तीव्र टोकदार पर्वत शिखर असते व ते मध्यवर्ती बिंदूपासून अनेक हिमनद्यांच्या विचलनामुळे होणाऱ्या चक्रीय क्षरण कार्यामुळे निर्माण झालेले असते. गिरिशृंग ही बहुतेकदा ‘नुनाटक’ ची उदाहरणे असतात. नुनाटक हे ‘एकाकी पर्वत’ किंवा ’हिमनदीने वेढलेले डोंगर’ असतात किंवा हिमनदीच्या कडेला वा मध्यात असलेला उंच डोंगर किंवा शिखर असते, जे हिमनदीने पूर्णपणे वेढलेले नसते.

भारतात हिमालय पर्वतात बद्रीनाथजवळ शिवलिंग नावाचे, तसेच स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतात असलेले मॅटरहॉर्न नावाचे गिरिशृंग ही प्रमुख उदाहरणे आहेत. यांशिवाय किनर्ली (माँटॅना, अमेरिका), मुराटोव्ह (बल्गेरिया), किट्सटेनहॉर्न (ऑस्ट्रिया), माउंट असिनबॉइन (कॅनडा) ही जगातील काही प्रसिद्ध गिरिशृंगांची उदाहरणे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.