हिमालय पर्वतात असंख्य नद्यांची उगमस्थाने आहेत. अनेक हिमालयीन नद्या पूर्वप्रस्थापित स्वरूपाच्या व हिमालयापेक्षाही जुन्या आहेत. हिमालयाचे उत्थापन अगदी मंद गतीने होत होते. त्याच वेळी या नद्यांनी पात्राचे अधोगामी क्षरण करून आपला प्रवाहमार्ग कायम राखला. त्यामुळे या नद्यांनी हिमालयात खोल घळयांची निर्मिती केलेली आहे. गंगा, सिंधू व ब्रह्मपुत्रा (त्सांगपो) यांसारख्या जगातील प्रसिद्ध नद्यांचे व त्यांच्या उपनद्यांचे उगम हिमालय पर्वतप्रणालीतच होतात. अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या अशा त्यांच्या प्रमुख दोन नदीप्रणाली निर्माण झाल्या आहेत. त्यांपैकी पश्चिमवाहिनी नदीप्रणालींमध्ये सिंधू प्रणाली सर्वांत मोठी आहे. कैलास पर्वतात उगम पावणारी सिंधू नदी संपूर्ण हिमालय पार करून प्रथम भारतातून व त्यानंतर पाकिस्तानातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. मार्गात अनेक ठिकाणी तिने खोल घळया निर्माण केल्या आहेत. भारताच्या उत्तर भागातील काराकोरम, तिच्या पश्चिमेकडील हिंदुकुश आणि पूर्वेकडील लडाख या पर्वतश्रेण्यांमुळे सिंधू नदीचे खोरे मध्य आशियाई नद्यांच्या खोऱ्यांपासून अलग झाले आहे. तिच्या ज्या पाच उपनद्यांवरून पंजाब (पाच नद्यांमधील दुआब प्रदेश) हे नाव पडले आहे, त्या झेलम, चिनाब, रावी, बिआस आणि सतलज याही हिमालय पर्वतप्रणालीतच उगम पावतात.

हिमालयातील इतर बहुतांशी नद्या गंगा-ब्रह्मपुत्रा खोऱ्याकडे वाहत जातात. या खोऱ्यातील नद्यांमध्ये गंगा, यमुना व ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांचा आणि त्यांच्या अनेक उपनद्यांचा समावेश होतो. गंगा-ब्रह्मपुत्रा यांचा संयुक्त प्रवाह बंगालच्या उपसागराला मिळतो. गंगा, यमुना, काली, शारदा या नद्या हिमालयातील मध्यवर्ती हिमाच्छादित श्रेणीत उगम पावतात. पावसाळ्यात हिमालय परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे, तर उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे येथील नद्यांना बारा महिने भरपूर पाणी असते. नद्यांचे बारमाही स्वरूप आणि अनुकूल प्राकृतिक रचनेमुळे त्यांच्यात जलविद्युतशक्ती निर्मितीची खूप मोठी संभाव्यता आहे. प्रत्यक्षात क्षमतेच्या तुलनेत अतिशय अल्प प्रमाणात वीज निर्माण केली जाते. हिमालयीन नद्यांनी हिमालयातून वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे पश्चिमेस पंजाबपासून ते पूर्वेस आसामपर्यंत गाळाचे विस्तृत उत्तर भारतीय सुपीक मैदान तयार झाले आहे.

अंटार्क्टिका आणि आर्क्टिकखालोखाल सर्वाधिक हिम व बर्फाच्छादनाचा प्रदेश हिमालयातच आहे. हिमालयाचे अक्षवृत्तीय स्थान कर्कवृत्तापासून जवळ असून हिमालयातील कायम हिमरेषा जगात सर्वाधिक उंचीवर (सुमारे ५,५०० मी.) आढळते. हिमालयातील अधिक उंचीचे प्रदेश वर्षभर हिमाच्छादित असतात. त्यांमधून अनेक हिमनद्या उगम पावतात. हिमाच्छादित प्रदेश आणि हिमनद्यांमुळे येथे उगम पावणाऱ्या मोठमोठ्या नद्यांना बारमाही पाणीपुरवठा होतो. हिमालय पर्वतश्रेणीत सुमारे १५,००० हिमनद्या असून त्यांत सुमारे १२,००० घ. किमी. गोडे पाणी सामावलेले आहे. येथील गंगोत्री, जम्नोत्री (उत्तराखंड), खुम्बू (नेपाळ) आणि झेमू (सिक्कीम) या प्रमुख हिमनद्या आहेत. गंगोत्री या हिमनदीची लांबी सुमारे ३२ किमी. आहे. नेपाळमध्ये एव्हरेस्ट शिखराच्या परिसरातील खुम्बू हिमनदी प्रतिदिनी अंदाजे ३० सेंमी.ने, तर काराकोरम श्रेणीतील बालतोरो हिमनदी प्रतिदिनी अंदाजे दोन मीटरने पुढे सरकते.

समीक्षक : नामदेव गाडे