स्वीझी, पॉल (Sweezy, Paul) : (१० एप्रिल १९१० – २७ फेब्रुवारी २००४). एक प्रसिद्ध अमेरिकन नव-मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म न्यूयॉर्क राज्यातील न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांचे वडील न्यूयॉर्क येथील फर्स्ट नॅशनल बँकेचे उपाध्यक्ष होते. पॉल यांचे शालेय शिक्षण फिलिप्स एक्स्टर अकॅडमी, ॲन इलाइट न्यू इंग्लंड बोर्डिंग स्कूल येथे झाले. नंतर इ. स. १९३२ मध्ये हार्वर्ड विद्यापीठ (इंग्लंड) येथून बी. ए. या पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर ते एक वर्ष ‘लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये कार्य करू लागले. नव-सनातन अर्थशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा खास विषय होता. या काळात त्यांना जोन व्हायोलेट रॉबिन्सन सारख्या विचारवंत प्राध्यापकांचा सहवास लाभला. ते इ. स. १९३३ मध्ये अमेरिकेत परतल्यानंतर तेथील हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि ‘मोनोपोली अँड कॉम्पिटिशन इन द इंग्लिश कोल ट्रेड, १५५० – १८५०’ या विषयावर संशोधन करून इ. स. १९३७ मध्ये त्यांनी विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली. यासाठी त्यांना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ योझेफ आलोईस शुंपेटर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यावाचस्पती ही पदवी मिळाल्यानंतर पॉल यांनी हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनी भांडवली विकासाच्या सिद्धांतावर भरीव संशोधन केले. मक्तेदारीवादी स्पर्धेचे विश्लेषण करणे, मार्क्सियन विचारांना नव-मार्क्सियन अर्थशास्त्रात अद्ययावत करणे, अल्पजन मक्तेदारी (ऑलिगोपॉली) साठी ‘किंक्ड मागणी वक्र’ शोधणे आणि इंग्रजी कोळसा उद्योगाची मांडणी करणे यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या विश्लेषणात्मक साधनांच्या साह्याने त्यांनी पुराव्यासह अर्थशास्त्रीय दृष्टीकोनावर भर दिला. त्यांनी इं. स १९४० नंतर ‘कलेकीन व्हर्जन ऑफ मार्क्सिझम’ या अर्थशास्त्रीय विचारामध्ये मक्तेदारी उद्योगाचे बाजारपेठेवर नियंत्रण असते; परंतु न्युनतम गुतंवणुकीमुळे नफ्याच्या वसुलीचे पश्नही प्रमुख समस्या असतात, असे त्यांनी नमुद केले. त्याच बरोबर ‘मक्तेदारी भांडवलशाही ही भांडवलाची वाढती एकाग्रता व केंद्रीकरण, महाकाय सहकारितेचा उदय व विक्रीय नियंत्रण संघ आणि विश्वस्त व विलीनीकरण यांच्या वाढीद्वारे दर्शविली जाते’ असे मत व्यक्त केले. त्यांनी अनेक संघीय सरकारी संस्थांसाठी काम केले. फ्रँकलिन रूझवेल्टच्या नवीन कराराची अंमलबजावणी करण्यास त्यांनी सहकार्य केले. त्यांनी इ. स. १९४२ मध्ये लिहिलेल्या आपल्या थियरी ऑफ कॉपिटॅलिस्ट डेव्हलपमेंट या ग्रंथातून ‘आर्थिक व सामाजिक पश्नांच्या विश्लेषणासाठी मार्क्सच्या विचारांची उपयोगिता’ ही मार्क्सवादाची साधी-सरळ-स्पष्ट व्याख्या विषद केली. या सिद्धांतामुळे अनेक इंग्रजी भाषिक, तसेच जर्मन व ऑस्ट्रियन देशांतील मार्क्सच्या विचारांनी प्रभावीत झालेल्या विचारवंताना मार्क्सच्या संकल्पना व विचारांची माहिती मिळाली.

अमेरिकन साम्यवादी अर्थव्यवस्थेच्या विरोधातील विचार व कृती उदयास येत असताना पॉल हे कामगार पत्रकार लिओ ह्युबरमन यांच्या बरोबर ॲन इंडिपेंडन्ट सोशिॲलिस्ट मॅगझीन : मंथली रिव्हू या मासिकाच्या कार्यात सहभागी झाले. या मासिकात अनेक विचारवंतानी लेख लिहीले आहेत. पॉल व ह्युबरमन यांनी १९६० मध्ये क्युबा येथे शैक्षणिक विकासाचा अभ्यास, उद्योगधंद्याचे राष्ट्रीयीकरण व जमीन सुधारणा यांवर सखोल अभ्यास करून क्युबा ॲनॉटॉमी ऑफ रिव्होल्युशन हा विशेषांक पसिद्ध केला. या अंकास आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर पसिद्धी मिळाली. त्यांच्या लेखनामुळे ते एक उत्तम अमेरीकन विचारवंत म्हणून ओळखले जाऊ लागले. जॉन केनेथ गालब्रेथ या विचारवंतांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ‘मोस्ट नोटेड अमेरिकन मार्क्सिस्ट स्कॉलर’ अशा शब्दांत पॉल यांची प्रशंसा केली आहे.

पॉल यांनी १९६० मध्ये अविकसीत देशांच्या आर्थिक, राजकीय व पर्यावरण विषयक प्रश्नांच्या अभ्यासकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मते, ‘मुख्य (भांडवलशाही) विरोधाभास हा केवळ विकसित भागांत नसून तो विकसित आणि अविकसित या दोनही भागांत आहे’. त्यांनी १९७०-८० च्या दशकात जपान, अमेरिका, भारत व यूरोप खंडातील काही देशांमध्ये पर्यावरण या विषयावर व्याख्याने दिली. स्वंयचलीत मोटारींचा शहरांवर होणारा दुष्परिणाम, यावर वैशिष्ट्यपूर्ण लेख लिहून पर्यावरणीय जागृती निर्माण केली. त्यांचे मंथ्ली रिव्ह्यू या संशोधनात्मक वैचारिक मासिकात १०० हून अधिक लेख प्रसिद्ध झालेत. हे विचारधन इतके अनमोल होते की, त्या सर्व लेखांचा एकत्रीत असा ग्रंथ प्रसिद्ध झाला. पॉल यांनी मांडलेला ‘किंक्ड डिमांड कर्व्ह’ हा सिद्धांत – विचार आजही अनेक विद्यापीठांच्या सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासात शिकविला जातो. पॉल यांचा ‘डीन ऑफ रॅडिकल इकॉनॉमिस्ट’ असे संबोधून गौरव करण्यात आला आहे.

पॉल यांनी सुमारे १०० पेक्षा जास्त लेख आणि सुमारे २० ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांचे काही प्रसिद्ध ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत : द थिअरी ऑफ कॅपिटॅलिस्ट डेव्हलपमेंट, १९४२; सोशॅलिझम, १९४९; द ट्रान्झिशन फ्रॉम फ्युडॅलिझम टु कॅपिटॅलिझम, १९५०; द प्रेझेंट ॲज हिस्टोरी, १९५३; मोनोपोली कॅपिटल, १९६६; इंट्रोडक्शन टु सोशॅलिझम, १९६८; लेनीन टुडे, १९७०; ऑन द ट्रान्झिशन टु सोशॅलिझम, १९७१; द डायनॅमिक ऑफ यू. ए. कॅपिटॅलिझम, १९७१; मॉडर्न कॅपिटॅलिझम अँड अदर एसेज, १९७२; प्रेझेंट ॲज हिस्टोरी, १९७४; रिव्होल्युशन अँड काउंटर – रिव्होल्युशन इन चिली, १९७४; पोस्ट रिव्होल्युशनरी सोसायटी, १९८०; फोर लेक्चर्स ऑन मार्क्सिजम, १९८१ इत्यादी.

पॉल यांचे लॉर्चमाँट येथे निधन झाले.

समीक्षक : आर. वाय. माहोरे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.