साळुंखे, विश्वासराव : (०१ मार्च १९४७ – २ जून १९९९ ).  मराठवाड्यातील लोककला आणि नाट्यचळवळीतील प्रसिद्ध लोककलावंत. सर्वगुणसंपन्न नट अशी त्यांची ओळख होती. भद्रावती नदीच्या किनारी साक्रीच्या पूर्वेस शेवाळी (जिल्हा धुळे) या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नथू व आईचे नाव सीतामाई होते. विश्वासराव साळुंखे यांना लहानपणी सर्वजण आवडीने बापू म्हणत, लहानपणापासूनच त्यांना कलेविषयी आवड होती. गावात अनेक सण, कला, उत्सव साजरे व्हायचे, होळीच्या सणाच्या काळात होणाऱ्या लळीतातून सादर होणारे सोंगे हुबेहूब ते वटवित असत. त्यातूनच त्यांना नाट्याची आवड निर्माण झाली व तेथून त्यांचा खरा कलाप्रवास सुरू झाला.  त्यांचे वडील नथुदास भाऊ साळुंखे यांचे गावात भजनी मंडळ होते. तेथील अनेक गायक मंडळी यांचा  प्रभाव त्यांच्यावर पडला.  येथूनच विश्वासराव यांना गायनाची आवड निर्माण झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण शेवाळी गावात जीवन शिक्षण केंद्र येथे झाले, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल साक्री येथे, तर त्यांनी ड्रॉइंग टिचर डिप्लोमा कोर्स  यशवंत कला कला महाविद्यालय, औरंगाबाद येथे पूर्ण केले. नंतर मराठा शिक्षण संस्था, खुलताबाद या संस्थेत त्यांनी त्याला कला शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे एम.ए. मराठीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले, एम.ए. (व्यावसायिक शिक्षण)  कलासंचनालय महाराष्ट्र शासन येथे घेतले. तर एम.डी. लोकरंगभूमीचे पदव्युत्तर शिक्षण नाट्यशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पूर्ण केले. त्यानंतर ते मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानेश्वर विद्यालय, बेगमपुरा, औरंगाबाद येथे नोकरीस रुजू झाले.  ३३ वर्ष शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले.

लोककला लोकनाट्य आणि नाट्यरंगभूमीमध्ये काम करत असताना विश्वासराव साळुंखे यांचा लोकसाहित्याचा फार महत्त्वाचा व सिंहाचा वाटा लोककला आणि नाट्यकलेसाठी राहिलेला आहे. त्यांनी लोकनाट्य लिखाणास १९७२ साली सुरुवात केली. हौशी कलावंतांना बरोबर घेऊन त्यांनी १९८६ साली गमत्या ग्रुपची स्थापना केली. समाजातील प्रत्येक घटकातील समस्यांचे विचार करून त्यावर परखडपणे लिखाण करून विविध कलाप्रकार व नाटक संचाच्या माध्यमातून जनप्रबोधन करून प्रेक्षकांच्या काळजात त्यांनी घर केले होते, ते स्वतः सोंगाड्याची भूमिका करत.  विनोद तरी त्या सहजगतीने निर्माण करत की रसिक पोट भरून हसून दात देत असत.  हास्य विनोद निर्माण करून बसलेल्या प्रेक्षकांसमोर समाजातील प्रत्येक बाबींचे चित्रण ते करीत असत.  त्यांची संवादशैली तर अतिशय हजर जवाबी होती.  ऐन वेळेस कोणता संवाद कशा पद्धतीने फेकायचा आणि कशा पद्धतीने प्रेक्षकांवर पकड ठेवायची याची चांगली कला त्यांना अवगत होती. समाज प्रबोधनाबरोबरच अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करून, लोकनाट्यातून व नाटकांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली.

विश्वासराव साळुंखे यांनी  लिहिलेली व सादर केलेली नाटकं – कुटुंब या नाटकाचा विषय कुटुंब कल्याण होता.  हुंडाबंदीवर हुंडा पाहिजे, झरोक्या  (नैतिक शिक्षणावरील विषय), ठरले म्हणजे ठरले, वृक्षारोपण, पैश्याला अनेक वाटा असे अनेक वेगवेगळे विषय त्यांनी आपल्या लोकनाट्यातून जनमाणसांसमोर अगदी सहजरीत्या मांडले. त्यांच्या लोकनाट्यात मनोरंजन जागृती सोबत समाज प्रबोधन असा त्रिवेणी संगम आढळतो. त्यांना बदलत्या परिस्थितीचे भान होते. त्यामुळे समाज प्रवाहाची आपले नाते घट्ट करून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली. त्यांचा जीवनदृष्टीचा मुख्य उद्देश तळागाळातील जनतेला सुखी करणे, लोकशाहीच्या प्रवाहापासून ते अलिप्त किंवा वंचित राहिले आहेत त्यांना कलेच्या माध्यमातून समजावून सांगून त्यांचे मत परिवर्तन करणे, हा मुद्दा होता. म्हणूनच कष्टकरी शेतकरी यांचे जीवनातील व्यथा आणि कथा त्यांनी चित्रित केल्या, त्यांच्या जीवनातील सुखदुःख चित्रित केले त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे व कार्याचे वेगळेपण लक्षात येते. त्यांनी आपल्या लोकनाट्याचा रचनाबंद पूर्णपणे वेगळा बनवला. लोकनाट्यातून समाज प्रबोधन श्रेष्ठ मानून त्यांनी जनजागृतीचे कार्य केले.

पैशाला अनेक वाटा, सगळं बसवलं धाब्यावर, उठता लाथ बसता बुक्की, झगडा, कुटुंब, खाली डोकं वर पाय, अबला नव्हे सबला, नशा करी दशा, मृत्युदंड, अनाड्याचा गाडा यांसारखी १४ लोकनाट्य आणि ५० च्या वर लघुनाट्य लिहिली व सादर केली. यासोबतच त्यांनी अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लोकनाट्य, वाङ्मय या प्रकारांबरोबरच फार्स, एकांकिका गीते, टाकणी, लावण्या, पोवाडे अशा लोककला प्रकारातील कवणांची रचना देखील केली. लोकजीवनाशी संबंधित असणारी त्यांची रचना सामान्य व तळागाळातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून केलेली असायची, सोबतच दीन दलित शोषित समाजाची गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी जे क्रांतिकारी विचार समाजासमोर असायला हवे ते विचार त्यांनी आपल्या कृती, उक्ती आणि कलेच्या माध्यमातून मांडले. त्यात सामान्य माणूस, कष्टकरी, कामगार, शेतकरी असून रक्ताचे पाणी करणारा समाज व्यवस्थेचा खरा उपासक आहे. परंतु त्यास अजूनही उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. महागाई, दुष्काळ, अन्नधान्य टंचाई, इत्यादी मुळे त्यास पोटभर अन्नपाणी मिळत नाही म्हणून त्यांनी लोकांच्या जीवनातील नाट्य काव्यात्मक पातळीवर अविष्कृत केले.

जीवनातील अन्याय अत्याचार दूर व्हावे अशी प्रबळ इच्छा शाहीर विश्वासराव साळुंखे यांची होती. ज्ञानविद्या ही साक्षात देवता आहे, या विद्येमुळे अनेक संकट टळतात, मानवाची प्रगती होते, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अबला नव्हे सबला, या लोकनाट्यातील स्त्रियांच्या सबलीकरणावरील लावणी देखील त्यांनी लिहिली. या लावणीत स्त्रियांचे हक्क, साक्षरता , स्वातंत्र्य, समानता या सर्वांचा आढावा घेतला आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी  व कर्तुत्वाविषयी त्यांनी कथन केले. स्त्रियांबद्दल अभिमान व्यक्त करत स्त्री जातीची परंपरा, इतिहास, स्त्रियांची थोरवी, त्यांचे कर्तुत्व लोकांसमोर ठेवून स्त्री-पुरुष समानतेविषयी आदर्श त्यांनी मांडला.

आजच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित परिस्थितीला धरून कुटुंब या लोकनाट्यातील ही त्यांची टाकणी अगदी आजही नवीन वाटते…

“आनंद पुरगाव नदीकाठी सुंदर

 गुण्यागोविंदाने माणसे नांदती फार

पण निसर्गानं काय केला चमत्कार

पाऊस पाणी पडणा वेळेवर

जंगलाचा नाश झाला भरपूर

गावं झाल उदास सांगतो खरं ऐका…”

या टाकणी द्वारे कथेची पार्श्वभूमी त्यांनी सांगितली सोबतच प्रेक्षकांची या नाट्य संदर्भातील असलेली उत्सुकता ताणून धरण्यात देखील ते यशस्वी झाले. पैशाला अनेक वाटा या त्यांच्या लोकप्रिय लोकनाट्यातून प्रत्येक प्रसंगानंतर टाकणी येते.  जी आधीच्या व पुढच्या प्रसंगास जोडण्याचे व प्रेक्षकांवरील पकड कायम ठेवल्यास यशस्वी होते.  शाहीर विश्वासराव साळुंखे यांनी विविध लोकनाट्यांमध्ये टाकणीच्या रचना केल्या आहेत. लोकनाट्यातील कथानक आणि कथानकाला प्रसंगानुरूप लावणी, पोवाडे यांची सुंदर गुंफण त्यांनी केली.

विश्वासरावांनी शेतकऱ्यांनी शास्त्रीय आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढवावे, कष्ट करावे आणि  सुखी व्हावे असा संदेश दिला.  शेती व शेतकऱ्यांसाठी असणारी गाणी कवणे करून त्यांनी शेतकऱ्यांचे देखील प्रबोधन केले. दरबारी शहाणा या लोकनाट्यातून हुंडाबंदीवर आधारित लावणी सादर करून त्यातून पती-पत्नीच्या प्रेमाची उधळण त्यांनी गीताच्या माध्यमातून केली  आहे. यासोबतच त्यांनी भारुडांच्या देखील रचना करून सादरीकरण केले याद्वारे त्यांनी आपल्या स्वतःचे लोककलेतील एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

शाहीर विश्वासराव साळुंखे हे नाट्यकलेचे व लोककलेचे थोर उपासक होते भारुडातील लोकनाट्यातील त्यांचा अभिनय एवढा प्रभावी होता. भारत सरकार गीत व नाटक प्रभात गाणे आयोजित केलेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धेचे त्यांनी विजेतेपद पटकावले.  सोबतच महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतील अंतिम फेरीतील अभिनयाच्या रौप्य पदकाचे देखील ते मानकरी ठरले. साहित्य संमेलन, कामगार कल्याण,नाट्य महोत्सव अशा विविध ठिकाणी त्यांनी प्रयोग सादर केले वेगवेगळी पारितोषिके त्यांनी प्राप्त तर केलीच, पण अनेक पुरस्कार व मानसन्मान याचे देखील ते मानकरी ठरले. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख लोकमान्य लोककलावंत अशी होती.

त्यांनी मराठवाड्यातील लक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, आणि देशभरातील लोककलावंतांची कला ही प्रेक्षकांना पहावयास मिळावी, ह्या उदात्त हेतूने मराठवाड्याच्या सांस्कृतिक इतिहासात प्रथम मराठवाडा “लोकोत्सव” आणि “वसंतोत्सव” या दोन उपक्रमांचे यशस्वी प्रयत्न केले व यशस्वी ठरले.

पुण्याला एका कार्यक्रमासाठी जात असताना ०२ जून १९९९ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.