औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेचा आराखडा तयार करताना पुढील बाबींची माहिती घेतली जाते.

  • उपलब्ध जमीनीचे क्षेत्रफळ : ह्यावरून कोणती शुद्धीकरण प्रक्रिया वापरावी हे ठरवता येते.
  • माती : शुद्ध केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावावी ह्याचा अंदाज घेता येतो. (उदा., Zero liquid discharge).
  • भूजल : त्याची प्रत, मात्रा आणि जमिनीपासून खोली माहित असल्यास अडचणीच्या वेळी हे पाणी वापरता येईल का हे ठरवता येते.
  • उत्पादनाची पद्धत : असंतत किंवा संतत ह्यावरून सांडपाण्याचे नमुने घेण्याची पद्धत [जबडी डोल (Grab), संतत (Continuous) किंवा प्रवाह-समानुपाती (Flow-proportionate)] ठरवता येते, तसेच शुद्धीकरणाच्या यंत्रणेमध्ये समाकरण टाकीची (Equalization tank) आवश्यकता आहे का हे ठरवता येते.
  • सांडपाण्याची मात्रा : उत्पादित वस्तूंच्या प्रस्तावित संख्येवरून एकूण किती सांडपाणी उत्पन्न होईल ह्याचा अंदाज घेता येतो. ह्यावरून शुद्धीकरण यंत्रणेच्या आकाराचा तसेच त्यातील वेगवेगळ्या एककांची संख्या आणि प्रकार ठरवता येतात. (कारखाना उत्पादन करू लागल्यावर प्रत्यक्ष प्रवाहमापन करून सांडपाण्याची नेमकी मात्रा ठरवता येते.)
  • कारखान्याचा भविष्यातील विस्तार : उत्पादन वाढल्यामुळे वाढलेली सांडपाण्याची मात्रा, शुद्धीकरण यंत्रणेची क्षमता, शुद्धीकरण एकके वाढवायची असल्यास त्यासाठी लागणारी जमीन ह्यांचा अंदाज घेता येतो.
  • पाच R : पाणी वापरातील कपात (Reduction), पाण्याचा पुनर्वापर (Reuse), पाण्याचे पुनर्चक्रीकरण (Recycle), पाण्याची पुनर्प्राप्ती (Recovery), पाण्याला पर्याय (Replacement).
  • शुद्ध केलेल्या पाण्याची प्रत : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार शुद्ध केलेल्या सांडपाण्याची शुद्धता किती ठेवावी लागेल ह्यावरून शुद्धीकरण यंत्रणेचा प्रकार ठरतो.

प्रस्तावित कारखान्यांच्या संदर्भात वरील मुद्दे महत्त्वाचे ठरतात, परंतु अस्तित्वात असलेल्या कारखान्यांसाठी शुद्धीकरण आराखडा तयार करायचा असल्यास सांडपाण्याचे प्रवाहमापन, त्याचे प्रातिनिधिक नमुने घेवून आणि त्यांचे पृथक्करण करून शुद्धीकरणाची पद्धत ठरवावी लागते. तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कारखान्यांमध्ये अलग व्यवस्था केल्यास शुद्धीकरण यंत्रणेवर करण्याचा खर्च कमी होतो आणि पर्जन्यजल साठवून पाणीबचत करता येते.

संदर्भ :

  • Fair, G.M.; Geyer, G. C. Water Supply and Wastewater Disposal, New York, 1954.
  • Mahajan, S. P. Pollution Control in Process Industries, Tata McGraw Hill Book Co., New Delhi, 1998.
  • Patwardhan, A. D. Industrial Wastewater Treatment, 2nd ed., New Delhi, 2017.

समीक्षण : कार्यालयीन स्तरावर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.