मृदुकाय प्राणी, पक्षी, कीटक किंवा सस्तन प्राणी इ. भक्षकांपासून स्वसंरक्षण करण्याकरिता वनस्पती विविध अनुयोजनांचा अवलंब करतात.
अ) रासायनिक अनुयोजना : या प्रकारात शत्रूंपासून स्वसंरक्षण करण्यासाठी वनस्पती काही रासायनिक घटकांची मुद्दाम निर्मिती करतात. ही वनस्पतिनिर्मित रसायने त्यांना खाणाऱ्या भक्षकांकरिता एक प्रकारची विषेच असतात आणि त्यांचे सेवन केल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वाढ, विकास, प्रजननक्षमता आदी गोष्टींवर विपरीत परिणाम होतो. हा वनस्पतींच्या स्वसंरक्षणाचा प्रत्यक्ष/थेट मार्ग होय. तर अन्य काही वनस्पती हवेत विरणारी द्रव्ये प्रसारित करतात. त्यांच्या वासामुळे या भक्षकांचे शत्रू त्या वनस्पतीकडे आकर्षित होऊन भक्षकांचा नायनाट करतात. हा प्रकार म्हणजेच वनस्पतींची स्वसंरक्षणाची अप्रत्यक्ष अनुयोजना आहे.
आ) यांत्रिक अनुयोजना : यांत्रिक अनुयोजना प्रकारात वनस्पतीच्या बाह्यरचनेतील निरनिराळ्या बदलांमुळे त्यांच्यावर आक्रमण करणाऱ्या आणि त्यांचे भक्षण करणाऱ्या शत्रूंना रोखण्यास मदत होते. वनस्पतींना असणारे विविध प्रकारचे काटे, पानाची जाडसर किंवा बुळबुळीत त्वचा, लव किंवा पाने आणि खोडांवर साचणारे वालुकामय स्फटिक, चिकट स्राव, चीक, डिंक ही त्याचीच काही उदाहरणे आहेत.
इ) वर्तणुकीची अनुयोजना : काही वेळा वनस्पती त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून भक्षकांचा सामना करताना दिसून येतात. साध्या स्पर्शामुळे लाजाळूसारख्या वनस्पतीत तत्काळ होणारी हालचाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. याच प्रकारे काही वनस्पती आपल्या पानांचे रंग बदलतात, तर काही वनस्पतींमध्ये अशी पाने झडून गेल्याचे दिसून येते.
वनस्पती स्वसंरक्षणाच्या योजनांचे वर्गीकरण :
अ) नैसर्गिक अनुयोजना : स्वसंरक्षणाकरिता काही योजना (उदा., विविध प्रकारचे काटे, लव अथवा पर्णत्वचेतील बदल) या निसर्गत:च वनस्पतीत आढळून येतात. त्यासाठी त्यांच्यावर भक्षकांचा हल्ला होण्याची आवश्यकता असतेच असे मात्र नाही.
आ) प्रतिसादात्मक अनुयोजना : वनस्पतींद्वारे काही रासायनिक घटकांची निर्मिती किंवा पानांची हालचाल यासारख्या अनुयोजना या केवळ भक्षकांनी केलेल्या आक्रमणाला दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य होतात.
संदर्भ : स्वसंरक्षक अनुयोजना, वनस्पतींतील, खंड २० (पू), पृ. ५७१.
समीक्षक : डॉ.बाळ फोंडके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.