तांबे व कथिल यांच्या मिश्रधातूस कासे असे म्हणतात. कासे ही सर्वसामान्य संज्ञा आहे. तांबे व कथिल विशिष्ट प्रमाणात मिसळून तयार केलेल्या मिश्रधातूस बेल मेटल किंवा घंटेचा धातू असे म्हणतात. यामध्ये तांबे ७८ टक्के व कथिल २२ टक्के असे प्रमाण असते. कथिल मिसळल्याने धातूस कठीणपणा येतो. घंटेचा धातू चुंबकाकडे आकर्षित होत नाही. त्याची अन्नपदार्थाबरोबर रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे हा धातू घंटेबरोबर पूजेची थाळी, जेवणाची थाळी, अन्न शिजवण्याची भांडी यासाठीही वापरला जातो. या वस्तू बनविण्याचे काम हस्त कारागीर करतात. या कलेस ढोक्रा (Dhokra) कला असे म्हणतात. ओडिशा, आसाम, गुजरात या ठिकाणी या प्रकारचे कारागीर आहेत. ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षे या काळात पहिल्या घंटा तयार झाल्याचे पुरावे पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडले आहेत.

अगदी छोट्या घंटा फर्मा वितळ (Lost wax) पद्धतीने बनवल्या जातात. मोठ्या घंटा लोमपद्धतीच्या साचेकामाने बनवल्या जातात. हिंदू, बौद्ध या मंदिरांत घंटा वाजवल्या जातात. तसेच चर्चमध्येही घंटा वाजविण्यात येतात. घंटेच्या मध्यभागी एक सळी असते, तिला आघातक (Clapper) जोडलेला असतो. आघातकाने घंटेच्या आतील भागावर आघात केला असता उत्कृष्ट नाद निर्माण होतो. हेच या धातूचे वैशिष्ट्य आहे. घंटेचा आवाज जास्तीतजास्त चांगला यावा यासाठी घंटेचा आकार व मापे यावर भरपूर प्रयोग झालेले आहेत.

संदर्भ : Richard W. Heine; Carl R. Loper, Philip, C. Rosenthal, Principles of Metal Casting, Tata McGraw-Hill Education,  II edition, 2001.

                                                                                                 समीक्षक : प्रवीण देशपांडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.