भारतातील एक अनुसूचित जमात आहे. या जमातीस बिझिओ, ही जमात मुख्यत꞉ झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांत आढळून येते. छोटा नागपूर, दक्षिण लोहारगढ, पालामाऊ, गंगापूर, सलगुजा, पाटुआ, संबळपूर, सुंदरगड व क्योंझर या ठिकाणी ही जमात वास्तव्यास आहे. ही जमात विंध्य पर्वतरांगांमधून स्थलांतरित झाल्यामुळे त्यांना बिंझिया असे म्हणतात. बिंझिया जमातीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,८२,००० इतकी होती.

बिंझिया जमात द्रविड वंशीय असून त्यांच्या असुर बिंझिया, अगारीया बिंझिया, पहारीया बिंझिया आणि दांड बिंझिया अशा चार उपशाखा आहेत. नाग, भैरव, करटाहा, साहूल, अग्निहोत्री, उलामारिया, दादूल, कुलमार्थी, कासी ही त्यांची काही कुळे आहेत; तर कॅनसा, रुषा, कॅनसबा, अमृत, कपिल, लेले, भारद्वाज, कुंजुवार ही त्यांची विविध गोत्रे आहेत. प्रधान, गुंजवार, माझी इत्यादी त्यांची आडनावे असून ती त्यांच्या हुद्यावरून पडली आहेत.

बिंझिया जमातीचे लोक मजबूत बांध्याची असून रंग काळा आणि चेहरा पसरट असतो. त्यांची विशिष्ट अशी वेशभूषा आढळून येत नाही. या जमातीतील स्त्रियांना दागिने घालण्याची आवड असून त्या गळ्यात मण्यांच्या माळा, हातात चांदी व ब्राँझ या धातूचे कडे घालतात.

त्यांची मूळ भाषा बिंझिया किंवा बिंझवारी असून ती इंडो-आर्यन या भाषा प्रकारातील आहे. ही भाषा मुंडारी भाषेच्या जवळची आहे. तसेच ते ओडिशामध्ये ओडिशी भाषा, बिहारमध्ये सादरी भाषा आणि इतरांशी हिंदीमधून बोलतात.

त्यांचा पारंपारिक व्यवसाय शेती असून कोळसा खाणींमध्ये मजुरी करणे हा त्यांचा पूरक व्यवसाय आहे. तसेच भूमिहीन बिंझिया दुसऱ्याच्या शेतावर मजुरीही करतात. त्यांनी शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले आहे. हे लोक मांसाहारी व शाखाहारी आहेत. भात व ज्वारी हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. घासी, तुरी, डोंगरा, आहिर, लोहरा आणि ब्राह्मण या जमातींबरोबर ते अन्नधान्याची देवाण घेवाण करतात. या वस्तूविनिमयामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रीयांचा सहभाग अधिक असतो.

गावाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्यांची एक किंवा दोन खोल्यांची मातीची घरे असतात. घरांची छपरे कौलारू असतात. शौचालय आणि आंघोळीचे ठिकाण घरात नसते. बकरी व त्यांची करडे घरातच बांधतात. बिंझिया जमातीचे अनेक परिवार (डिबरिस) मिळून एक गाव (जामा), अनेक गावांचा एक छोटा समूह (खूमरी) आणि अनेक समूहांचे मिळून एक मोठा समूह (बरगा) तयार होतो. प्रदेशाच्या मुखीयाला गौतिया, गांजू असे संबोधतात.

जमातीमध्ये आंतरजातीय विवाह किंवा सारख्या गोत्रांचे विवाह अमान्य आहे. जमातीमध्ये लग्न ठरवून होत नाहीत. तरुणांना त्यांच्या आवडीने लग्न करण्यास परवानगी असते. मुले – मुली लग्नाच्या वयाची झाल्यानंतर लग्ने केली जातात; तर काही वेळा बालविवाह आढळून येते. वधुमूल्यास मान्यता असून लग्नाच्या वेळी वधूच्या परिवाराकडून धान्य, कपडे, काही पैसे वराकडील परिवारास दिले जाते. त्यांची लग्ने फक्त रविवारीच होतात. भांगात कुंकू भरणे (सिंदूर दान) आणि प्रातिनिधिक स्वरूपात आधी आंब्याच्या झाडाशी लग्न लावणे हे दोन लग्नातील प्रमुख लग्न विधी आहेत. लग्नाच्या काळात वधू किंवा वर मांसाहार करत नाही, तसेच इतर ठिकाणी अन्नग्रहण करत नाही. जमातीत घटस्फोटाला मान्यता आहे.

जमातीची मुख्य पारंपारिक देवता म्हणजे विंध्यवासिनी, जी स्त्रीच्या रूपातील दगडाची मूर्ती आहे. ती सर्व संकटांपासून आणि दुष्टांपासून त्यांचे संरक्षण करते, अशी त्यांची समजूत आहे. तसेच ते जगन्नाथाला मानतात. बुधराजा ही त्यांची ग्रामदैवत असून त्यास ग्रामश्री असे म्हटले जाते. तसेच त्यांची सरना, बांसा, समलाई मां इत्यादी कुलदेवता आहेत.

जमातीमध्ये पूर्वजांच्या सन्मानार्थ बैगा पुजाऱ्याच्या हातून पितृपूजा केली जाते. कालो, पाहन हेसुद्धा त्यांचे पुजारी आहेत. नवजात बाळाचा जन्म झाला की, बकरीचा बळी देण्याची प्रथा आहे. बाळाचे नामकरण एकविसाव्या दिवशी केले जाते. हे लोक तुळस वनस्पतीला विशेष महत्त्व देतात.

जमातीमध्ये कारम, जिथिया, सरहूल इत्यादी पारंपरिक सण व उत्सव साजरे केले जाते. यांव्यतिरिक्त दिवाळी, होळी, रामनवमी हे हिंदू सणसुद्धा साजरे केली जातात.

जमातीमधील काही लोक ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे. त्यांच्यात मृतांना पुरण्याची प्रथा असून वयस्क मृत व्यक्तीचे दहन करतात.

संदर्भ ꞉ Singh, K. S., People Of India, Oxford University Press, 1998.

समीक्षक ꞉ शौनक कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.