(धर्मचिन्हांकित भिंती किंवा पट). बायझंटिन परंपरेतील ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चमधील आडोशीपटाचा प्रकार. पूर्वी चर्चमधील वेदी (अल्टार) आणि लोक सभागृह (नेव्ह) यांना वेगळे करण्यासाठी दगड, लाकूड, धातू किंवा पारदर्शक पडद्याचा वापर केला जात असे. मूळ ग्रीक भाषेतील ऑयकॉन-स्टॅण्ड या अर्थाच्या शब्दावरून आयकॉनॉस्टॅसिस ही इंग्रजी संज्ञा तयार झालेली आहे.
बायझंटिन चर्चमध्ये वेदी आणि लोक सभागृह यांमध्ये पूर्वी जाळीदार आणि कमरेपर्यंत उंच असलेला कठडा उभारलेला असे. त्यामुळे भाविकांना वेदीवर सुरू असलेली प्रार्थना आणि धर्मवचन ऐकू येत असे. हळूहळू कठड्याच्या जागी स्तंभ उभारले गेले आणि नंतर त्या स्तंभाच्या शिरोभागी कमानी उभारल्या गेल्यात. पुढे या स्तंभामध्ये लाकडी किंवा संगमरवरी भिंती अथवा पट उभारले गेले. यावर वेगवेगळी ख्रिस्ती धर्मचिन्हे, संत, ख्रिस्त, कुमारी माता आणि बाळ येशू इत्यादींचे अंकन केले गेले. दहाव्या ते पंधराव्या शतकात यात बदल होऊन भिंतींची/ पटांची उंची वाढली आणि त्याचे मूळ सांकेतिक रूप लोप पावून रशियात त्याची जागा संपूर्ण अपारदर्शी अशा धर्मचिन्हांकित भिंत अथवा लाकडी पटाने घेतली.
धर्मचिन्हांकित पटाचे तीन भाग असून पहिल्या किंवा खालच्या भागात ख्रिस्ती धर्मसत्तेची अंकित चिन्हे, दुसऱ्या भागात लघुरूपातील चिन्हे तर तिसरा भाग हा शिरोभाग असतो. शिरोभागाच्या सर्वोच्च स्थानी क्रूस असतो. त्याखाली सर्पाकृती सैतान आणि डाव्या बाजूला कुमारी माता आणि उजवीकडे संत जॉन देवदूताच्या स्वरूपात दाखविलेले असतात. अनेकदा या पटाच्या वरच्या भागात कलाकाराचे आणि खालच्या भागात देणगीदाराचे नाव, निर्मितीची तारीख इ. कोरलेली आढळतात. वेगवेगळ्या ठिकाणाशी संबंधित आणि त्या त्या काळात प्रचलित असलेल्या कलाकुसरीच्या पद्धती अशा पटावर पाहायला मिळतात. कधीकधी या पटाच्या मध्यभागी असलेला मुख्य किंवा शाही दरवाज्याला दोन पाखे असतात, त्यावर सुरेख नक्षीकाम केलेले असते. हे द्वार पवित्र मानले जाते आणि अधिकृत धर्मगुरूखेरीज इतर कुणीही त्याचा वापर करू शकत नाहीत. या द्वारावर ख्रिस्ताचे त्याच्या सहकाऱ्यांबरोबर घेतलेले शेवटचे जेवण चित्रांकित केलेले असते. मध्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दरवाज्यांना धर्मोपदेशकांचे दार म्हणतात. मुख्य देवदूत मायकेल आणि गॅब्रिएल यांचे चित्रण या दारांवर असल्याने यांना देवदूताचे दरवाजे असेही म्हटले जाते.
आठव्या शतकात या धर्मचिन्हांकित पटाविरोधात ख्रिस्ती धर्मातच वादविवाद झाले, परंतु ख्रिस्ती धर्मसभेच्या दुसऱ्या जागतिक सभेने (इ.स. ७८७) याला मान्यता दिल्यामुळे पटांच्या निर्मितीला असलेला विरोध शमला. या धर्मचिन्हांकित पटापुढे जेव्हा भाविक नतमस्तक होतोत, तेव्हा तो प्रत्यक्ष ख्रिस्तालाच नमन करत असतो, या मूळ धर्मविचाराला अनुसरून असे चिन्हांकित पट अथवा भिंती उभारल्या जाऊ लागल्या. जेव्हा पूजाविधी चालू असतो; त्या वेळी या पटांना विशेष महत्त्व असते आणि जेव्हा त्या भिंतीतील दरवाजा उघडला जातो, त्या वेळी प्रत्यक्ष ख्रिस्त या जगात अवतरला आहे असे गृहीत धरले जाते. अशा प्रकारे हा पट स्वर्ग आणि मर्त्यलोक यांना सांधणाऱ्या ख्रिस्तावताराचे प्रतीक आहे.
संदर्भ :
- Vitto, Fanny, The Origin of the Iconostasis in Early Christian Churches in The Holy Land, accessed on July 16,2025.
- https://www.bai.org.uk/the-iconostasis-in-the-coptic-orthodox-church/ accessed on July 17,2025
- https://www.videobible.com/iconostasis accessed on July 27,2025
- https://theframeblog.com/2014/11/12/an-introduction-to-greek-orthodox-iconostases/ accessed on July 17,2025
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.