इसवी सन १९६० च्या दरम्यान यूरोपमध्ये झालेल्या सांस्कृतिक क्रांतीनंतर स्त्रियांना आपल्या हक्कांची प्रकर्षाने जाणीव झाली. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने केलेल्या अन्यायापासून मुक्त होण्याचे प्रयत्न पाश्चात्त्य स्त्री करू लागली. त्याचे प्रतिबिंब स्त्रीवादी साहित्यात पडू लागले. आज पाश्चात्त्य समाजात स्त्रीवादी चळवळीने विलक्षण गती घेतली असून स्त्रीवादी साहित्याने स्वतंत्र दालन उघडले आहे. जे जगात घडत होते, त्याचे पडसाद चर्चमध्येही उमटू लागले.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक स्त्रिया स्त्रीवादाच्या भूमिकेतून बायबलचे अध्ययन करीत होते. त्यांत प्रामुख्याने जे. शेरील एग्झूम, कॅरल एम. मायर्स, ॲडेला यार्ब्रो कॉलिन्स, लेटी एम. रसेल, फिलिस ट्रिबल, मेरी ॲन टॉलबर्ट, एलिझाबेथ शूस्लर फिओरेंझा, क्वोक पूई-लॅन (चीन), ज्युडिथ सार्जंट मरे, जारिना ली, गर्ट्रूड हांझलमन (जर्मनी), मेरी डेली (अमेरिका), मरिअन केटोप्पो (इंडोनेशिया), क्लॅरिस जे. मार्टिन, तेरेसा ओकुरे (आफ्रिका), रेनिटा व्हिम्स, आडा मरिया इसासी-दियास व एल्जा तामेझ (लॅटिन अमेरिका), रोझमेरी रॅडफोर्ड रॉयथर, हिसाको किनुकावा (जपान), ॲस्ट्रिड लोबो-गाजिवाला (भारत) अशी कितीतरी नावे घेता येतील.

स्त्रीवादाच्या भूमिकेतून बायबलचे वाचन-अध्ययन होत आहे; बायबलमधील काही वचनांचा नव्याने अन्वयार्थ लावला जात आहे. गृहित धरलेल्या किंवा दुर्लक्षित मजकुरांचे महत्त्व लक्षात आणून दिले जात आहे, ही शुभदायक गोष्ट आहे. त्यामुळे बायबलचे भाष्य अधिक संपन्न होईल आणि काही नवी आव्हानेही निर्माण होतील. त्यांना सामोरे जावे लागेल.

स्त्रियांनी धर्मशास्त्रांवर भाष्य करणे ही काही अद्भुत बाब नाही. इझ्राएलमध्ये धर्मशास्त्राचा विकास होण्यापूर्वी सुमेरियन संस्कृतीतील स्त्री-याजक एनहेडूआना हिने आपल्या देवतेसंबंधी भक्तिगीते रचली होती. मोझेस यांची बहीण मिरियम (इ.स.पू. १२५०) आणि संदेष्ट्री देबोरा (इ.स.पू. ११२५) यांचे लेखन ‘जुन्या करारा’त अंतर्भूत केले गेले आहे. गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत स्त्रिया आपल्या हक्कांसंबंधी अधिक धिटाईने बोलू-लिहू लागल्या. प्रवचने देण्याचा अधिकार स्त्रियांनाही आहे, असा आग्रह धरून प्रवचने देणाऱ्या झांग झुजान या गेल्या शतकातल्या पहिल्या चिनी स्त्री होत्या. येशू ख्रिस्त हे पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही तारणारे होते, असे सांगणाऱ्या जारिना ली या आफ्रिकेतील पहिल्या स्त्री-प्रवचनकार होत्या, असे क्वोक पूई-लॅन यांनी आपल्या लेखनात नमूद केले आहे.

ख्रिस्ती स्त्रिया बायबलचा संदर्भ घेऊन आपल्या प्रश्नांची मुक्तपणे चर्चा करीत आहेत. बायबलने स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला वाव दिला आहे की अडसर घातला आहे? बायबलचे बहुतेक लेखन पितृसत्ताक समाजातील पुरुषांनी केले आहे. त्यांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोण उदार होता की संकुचित होता? येशू ख्रिस्त यांनी स्त्रियांचा उदार आदर केला. त्याची कदर नंतर राखली गेली का? स्त्री-पुरुष समान आहेत, हे सूत्र बायबलच्या उत्पत्ती (Genesis) या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात मान्य करण्यात आले आहे. त्याप्रमाणे स्त्रीला इतिहासात आणि वर्तमानकाळात वागणूक देण्यात आली आहे का? चर्चमधील निर्णयप्रक्रियेत स्त्रियांना उचित स्थान मि‌ळते का? आदी प्रश्नांची मीमांसा स्त्रीवादी विचारवंत करू लागले, ही स्वागतार्ह बाब आहे. १९९४ साली जर्मन विचारवंत गर्ट्रूड हांझलमान यांनी वी आर सायलेंट नो लॉंगर; वुमन एक्स्प्रेस देमसेल्व्ह्ज अबाऊट द सेकंड व्हॅटिकन कौन्सिल (Zurich : Inter-feminas Veslag) हा ग्रंथ प्रकाशित केला. मेरी डेली या अमेरिकन विदुषीने १९६८ साली द चर्च अँड द सेकंड सेक्स हा ग्रंथ लिहिला. त्यांनी १९७३ साली प्रकाशित केलेल्या बियॉंड गॉड द फादर : टुवर्ड्स अ फिलॉसॉफी ऑफ वुमन लिबरेशन या ग्रंथाने जगभर खळबळ माजवली. या ग्रंथात त्यांनी अगदी टोकाची भूमिका घेताना म्हटले की, “बायबलमधून पितृसत्ताक साहित्य वगळायचे ठरवले, तर बायबलचे स्वरूप एका पुस्तिकेइतके संकुचित होईल. जो देव केवळ पिता आहे आणि ज्याचे मुलगे होणे हेच परमभाग्य मानले जाते, असा देव नको रे बाप्पा!”

इसवी सन १९८० नंतर बायबलप्रणीत स्त्रीवादाचे लोण यूरोप-अमेरिकेतून आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका या खंडांत पसरले. उत्तर अमेरिका आणि कॅनडा येथील आदिम जमातींतील स्त्रिया या विषयावर मतप्रदर्शन करू लागल्या. १९७९ मध्ये इंडोनेशियातील मरिअन केटोप्पो यांनी कम्पॅशनेट अँड फ्री : ॲन एशियन वुमन्स थिऑलॉजी हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १९८२ पासून इन गॉड्स इमेज हे आशियाई ख्रिस्ती स्त्रियांचे नियतकालिक सुरू झाले. त्यानंतर प्रकाशित झालेल्या पुढील महत्त्वाच्या पुस्तकांची यादी कॅरोलीन प्रेसलर यांनी दिली आहे.

बायबल हा देवाचा शब्द आहे. देवाने स्त्रियांसंबंधी आपले मानस त्यातून व्यक्त केले आहे. म्हणून बायबलचा शब्दश: अन्वयार्थ लावला पाहिजे, अशी एक टोकाची भूमिका आहे; तर बायबलमधील लेखन स्त्रीविषयक पूर्वग्रहातून झाले आहे म्हणून ते पूर्णपणे त्याज्य आहे, अशी दुसरी टोकाची भूमिका आहे. या दोन्ही भूमिकांचा स्वीकार करता येणार नाही. ऐतिहासिक-टीकात्मक या आधुनिक अभ्यासपद्धतीनुसार बायबलमधील स्त्रीविषयक संदर्भांचे विश्लेषण व्हावे, अशीही एक भूमिका आहे. संहितेचे वस्तुनिष्ठ वाचन करून अर्थ लावला जावा, ही भूमिकाही स्त्रियांना न्याय देऊ शकणार नाही; कारण संहितेला काळाच्या आणि पुरुषप्रधानतेच्या मर्यादा आहेत. कॅरोलीन प्रेसलर या बायबलकडे पाहण्याचा मध्यममार्ग सूचवतात. बायबलमुळे स्त्रियांवर जुलूम झाला आहे, तसेच त्यांच्या मुक्तीसाठी बायबलने प्रेरणाही दिली आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन बायबलचा अन्वयार्थ लावला पाहिजे, असे त्या सांगतात. त्यांनी सर्वंकष टीका (Critique) आणि बांधणी (Constuction) ही पद्धत सूचवली आहे. या पद्धतीनुसार बायबलचा अभ्यास करताना पितृसत्ताकता, पुरुषप्रधानता, स्त्रीला गौणत्व देण्याची रीत, लिंगभेद, वांशिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वर्चस्व आदी घटक विचारात घेऊन जरूर तिथे टीका केली जाते.

दुसऱ्या बाजूला ज्यू संस्कृती, त्यांचे साहित्य, प्रारंभीची चर्चसंस्था यांच्यात आढळणाऱ्या स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या आणि गौरवाच्या कथांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रकाशझोत टाकून नव्याने बांधणी केली जाते. उदा., ‘जुन्या करारा’त देवाला मातेची, दायीची, ज्ञानाची उपमा दिलेली आहे. या प्रतिमा देवाला लागू करून स्त्रीजन्माचा सन्मान केला गेला आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधता येते. मिरियम, देबोरा, जेएल, ज्युडिथ आदी स्त्रियांनी असामान्य कर्तृत्व गाजवून पुरुषांपुढेही शौर्याचा आदर्श ठेवला आहे.

“देवाने गर्विष्ठांना धडा शिकवला आहे, उन्मत्त सत्ताधाऱ्यांना पायउतार होण्यास लावले आहे, भुकेलेल्यांना मिष्टान्नाने तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकाम्या हाताने पाठवून दिले आहे” असे शब्द माता मरिया यांच्या ओठी आहेत (बायबल : ‘लूक’ १ : ५१–५३). असे जाज्वल्य उद्गार काढणारी स्त्री शूर नव्हती, असे कोण सांगेल? आज जगभर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या स्त्रियांना मरिया यांच्या या गीतातून प्रेरणा मिळत आहे.

आरंभीच्या चर्चमंडळीत स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. त्या प्रवचने करीत असत, प्रेषितांबरोबर प्रचारकार्यात सहभाग घेत असत. फीब आणि ज्युनिया यांचा संत पॉल यांनी सन्मानाने उल्लेख केला आहे. (बायबल : ‘रोमकरांना पत्र’ १६).

काही आक्षेप : बायबलच्या लेखनामागे दैवी प्रेरणा निश्चितच आहे. त्यामुळेच बायबलला देवाचा शब्द म्हटले जाते. मात्र तो शब्द लिहिण्याचे काम मानवाने केले आहे. त्यामुळे मानवी दुर्बलतेच्या काही खुणा, काही न्यूनत्व बायबलमध्येही आढळले, तर त्यात काही आश्चर्य नाही.

स्त्रीचा अधिक्षेप करणाऱ्या बायबलमधील काही संदर्भांकडे स्त्रीवादी लेखक-लेखिकांनी आपले लक्ष वेधले आहे. उदा., देवाने आज्ञा केली आणि आब्राहाम यांनी आपला एकुलता एक पुत्र आयझॅक याला बळी म्हणून अर्पण करण्यासाठी मोरिया डोंगरावर घेऊन गेले. आब्राहाम यांनी या प्रकरणी आपली पत्नी सारा हिच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा संवाद साधल्याचा, तिला विश्वासात घेतल्याचा उल्लेख बायबलमध्ये नाही. तिला पूर्णपणे अंधारात ठेवले गेले. पुरुषप्रधान कुटुंबात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात असे, त्याचा हा पुरावा आहे. आब्राहाम यांनी आपली पत्नी सारा हिला विश्वासात घेतले नाही आणि तिनेही काही म्हटले नाही, ही गोष्ट तत्कालीन समाजरीतीप्रमाणे झाली. आज परिस्थिती पालटली आहे. बायबलवर भाष्य करताना प्रवचनकारांनी हे भान ठेवावे, असा स्त्रीवाद्यांचा आग्रह आहे.

‘शास्ते पर्वा’त जेफ्ताहची कथा सांगितली गेली आहे. देवाने आपल्याला विजय मिळवून द्यावा म्हणून जेफ्ताहने ‘लढाईवरून घरी परतल्यावर जी व्यक्ती मला प्रथम भेटेल, तिचा मी तुला बळी देईन’ असा नवस केला. तो विजयी होऊन घरी आला, तेव्हा त्याला भेटण्यासाठी त्याची मुलगीच धावतधावत आली. जेफ्ताह दु:खाने विव्हळला. त्याने मुलीला नवसासंबंधी सांगितले, तेव्हा वडिलांनी देवाला शब्द दिला आहे म्हणून ती बलिदानासाठी तयार झाली आणि त्याप्रमाणे करण्यात आले. येथे असा प्रश्न उपस्थित होतो की, नवस पूर्ण करण्यासाठी एका अश्राप मुलीचा बळी द्यावा का? देवाला मानवी बळी लागतो, हा समज चुकीचा नाही का? बळी देण्यासाठी नेलेल्या आयझॅकचे नाव सर्वांना माहीत आहे. जेफ्ताहच्या मुलीची नावनिशाणीही नाही. ती स्त्री म्हणून तिचे नाव वगळले गेले आहे का? असे प्रश्न स्त्रीवादी समीक्षक विचारतात.

त्याशिवाय ‘शास्ते पर्वा’त सॅमसन आणि दिलायला यांचीसुद्धा कथा आढळते, ती अशी : सॅमसनच्या अंगी अक्षरश: दहा हत्तींचे बळ होते. त्यामुळे तो लढाईत नेहमी अजिंक्य ठरत असे. फिलिस्तिनी या शत्रूपक्षाच्या समाजात दिलायला नावाची एक रूपवती होती. सॅमसन तिच्या प्रेमात पडतो. सॅमसनच्या बळाचे रहस्य त्याच्या लांबलचक केसांत दडलेले असून, त्याची माहिती इतर कोणालाही नसते. तेव्हा फिलिस्तीनच्या पाच राजांनी त्याची प्रेयसी दिलायला हिला विश्वासात घेऊन सांगतात की, “तू सॅमनसनच्या असामान्य ताकदीचे रहस्य खुबीने शोधून काढ, आम्ही तुला प्रत्येकी अकराशे रौप्य मोहरा देऊ”. राजांच्या आग्रहाला बळी पडून दिलायला खूप लाडीगोडी करून सॅमसनकडून त्याचे रहस्य काढून घेते. या कृत्याबद्दल विश्वासघातकी म्हणून तिची कुख्याती झाली. मात्र तिला आमिष दाखवणारे आणि पतीचा विश्वासघात करण्यास तिला प्रोत्साहन देणारे हे पुरुष होते, ही गोष्ट नजरेआड केली गेली. याबद्दल स्त्री-अभ्यासकांनी आक्षेप घेतला आहे.

राजा डेव्हिडचा पुत्र अम्नोन याने आपली सावत्र बहीण तामार हिच्यावर बलात्कार करून तिचा कौमार्यभंग केला. या भयानक कृत्याबद्दल त्याला कुठलेही शासन झाले नाही. राजा डेव्हिडने त्याला साधी समजही दिली नाही. स्वत: राजा डेव्हिडने आपला सरदार उराया याची पत्नी बाथशिबा हिला नादी लावले आणि तिचा संसार उद्ध्वस्त केला. पुरुषी वर्चस्वामुळे ही प्रकरणे दडपली गेली आहेत, असा आरोप स्त्रीवादी करतात.

संदेष्ट्यांनी (Prophets) मूर्तिपूजक इझ्राएल देशाला आणि जेरूसलेम नगरीला व्यभिचारिणीची उपमा दिली आहे. जेरूसलेम नगरीच्या निष्ठाहीनतेचे केलेले वर्णन अश्लीलतेच्या जवळ जाणारे आहे. काही ठिकाणी देवाच्या तोंडी स्त्रीचा अधिक्षेप करणारी भाषा घालण्यात आली आहे. उदा., मूर्तिपूजा करणाऱ्या जेरूसलेम नगरीला उद्देशून देव म्हणतो “तू वस्त्रहीन होऊन आपल्या जारांबरोबर विषयसुखात रमलीस म्हणून तुझ्या सर्व जारांना मी एकत्र करीन. मी तुझ्याभोवती त्यांचे कोंडाळे करीन आणि त्यांच्यामध्ये तुला उभी करीन. मी तुला नग्न करीन आणि त्यांना तुझी अब्रू पाहायला लावीन. तुझ्या व्यभिचाराबद्दल (मूर्तिपूजा) आणि तू केलेल्या खुनांबद्दल (नरबळी) मी तुला शासन करीन. तुला देहदंड देईन… ते तुझे जडजवाहीर लुटतील, तुझ्या अंगावरची वस्त्रे फाडतील…”(बायबल : ‘इजिकिएल’ १६ : ३७-३८).

पुरुष असलेल्या देवाच्या तोंडी ही आक्षेपार्ह भाषा घातल्यामुळे आणि त्याने कृती केल्याचे दाखवल्यामुळे स्त्रियांवरील अत्याचारांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळते, असा आरोप शेरिल एक्झूम या लेखिकेने केला आहे. अशा वर्णनात देव पुरुषांचे प्रतिनिधित्व करीत आहे म्हणून अशा देवाच्या प्रतिमेची चिकित्सा झाली पाहिजे, असा आग्रह दान्ना नोलन फेवेल आणि डेव्हिड गन यांनी धरला आहे.

‘नव्या करारा’त संत मार्क यांच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना सुगंधी तेलाने माखन करणाऱ्या स्त्रीचा संदर्भ आहे. तिने तेलाची विनाकारण नासाडी केली म्हणून मेजावर बसलेल्या ज्युडास यांनी तिची निंदा केली, तेव्हा येशू ख्रिस्त यांनी त्यांना सांगितले “तिने माझ्या उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला सुगंधी द्रव्य लावले आहे. जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल”. इतके मोठे कार्य करणाऱ्या स्त्रीचे नाव मात्र संत मार्क यांनी वगळले म्हणून स्त्रीवादी अभ्यासक खंत व्यक्त करतात.

येशू ख्रिस्त यांनी भाकऱ्यांचा चमत्कार करून लोकांची भूक भागवली. त्या प्रसंगाचे वर्णन करताना ‘भाकरी खाणारे पाच हजार पुरुष होते’, असे संत मार्क यांनी नमूद केले आहे. ‘जेवणारे पाच हजार पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होतीच’, असे संत मॅथ्यू यांनी म्हटले आहे. स्त्रियांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या प्रकाराला ‘वगळण्याचे राजकारण’ (Politics of Omission) असे क्लॅरिज जे. मार्टिन यांनी म्हटले आहे.

स्त्रीला वगळून शुभवर्तमानाची यथार्थपणे घोषणा करता येईल का? सामाजिक व्यवहारात स्त्रियांना त्यांचे मानाचे स्थान नाकारणाऱ्या प्रवृत्तीचे येथे दर्शन घडत नाही का? अशा प्रकारच्या संदर्भांमुळे स्त्रियांकडे दुर्लक्ष करण्यास चर्चमध्ये प्रोत्साहन मिळाले आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बायबलच्या लेखनाला काळाच्या मर्यादा आहेत. त्या लेखनावर पुरुषप्रधान समाजरचनेचा प्रभाव आहे, हे खरे आहे. तरीही बायबलने स्त्रियांच्या कर्तृत्वाची कशी नोंद घेतली आहे, याचा आढावा फिलिस ट्रिबल या बायबलच्या अभ्यासिकेने घेतला आहे. स्त्रीच्या प्रतिष्ठेसंबंधीचे अनेक संदर्भ बायबलमध्ये आहेत. उत्पत्ती या पहिल्या पुस्तकात आदाम आणि एवा या आद्य मातापित्यांची कथा आहे. आदाम आणि एवा यांची निर्मिती कशी झाली, हा कथेचा आनुषंगिक भाग आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोघांचा उत्पन्नकर्ता एकच देव असून त्याने त्यांना स्त्री आणि पुरुष असे निर्माण केले आहे. दोघेही देवाची प्रतिमा आहेत. स्त्री ही पुरुषाची दासी नसून त्याची सहचारिणी आहे. (बायबल : उत्पत्ती १ : २७).

बायबलमध्ये देवाला केवळ पुरुषाचीच उपमा दिलेली नाही, तर देवामधील स्त्रीत्वाचे आणि मातृत्वाचे दर्शनही घडवले आहे, याकडे फिलिस ट्रिबल यांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. देव आई होतो आणि मानवाला जन्म देतो. अनुवाद (Deuteronomy) या पुस्तकात देव म्हणतो “मी ज्या लोकांना जन्म दिला, त्यांना माझा विसर पडला आहे” (बायबल ३८ : १८). आयजया हे कविहृदयाचे संदेष्टे होते. त्यांनी देवाच्या तोंडी पुढील शब्द घातले आहेत “वेणा देणाऱ्या स्त्रीसारखा मी आक्रोश करीन… मी सुस्कारे टाकीन” (बायबल  २१ : ३; ४२ : १४; ६६ : ९). मानवी दु:खवेदनेपासून देव अलिप्त नाही, मातेप्रमाणे तोही भोग भोगतो, असे त्यांनी अधोरेखित केले आहे.

आयजया यांनी देवाला माउलीची उपमा दिली आहे. ते आपल्या भक्ताला म्हणतात “मातेला आपल्या छातीवर दूध पिणाऱ्या बाळाचा विसर पडेल का? आपल्या उदराच्या बाळाबद्दल तिला करुणा वाटणार नाही का? कदाचित माता आपल्या अर्भकांना विसरतील; परंतु मी तुला विसरणार नाही”. या ठिकाणी देव परममाता झाला आहे. (बायबल : ‘आयजया’ ४९ : १५).

स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या कितीतरी कथा बायबलमध्ये सांगितलेल्या आहेत. मोझेस यांची बहीण मिरियम हिने आपल्या भावाबरोबर लोकांचे नेतृत्व केले. शास्त्यांच्या पुस्तकात सेनापती सिसरा याची गोष्ट सांगितली आहे. तो दहा हजारांची फौज घेऊन इझ्राएली लोकांवर चालून आला होता. तेव्हा देबोरा या स्त्रीच्या मार्गदर्शनाखाली बाराक या सेनापतीने त्याच्यावर हल्ला केला. सिसराच्या सैन्याचा धुव्वा उडाला आणि त्याने रणभूमीवरून पलायन केले. याच देबोराने रचलेले गीत हे हिब्रू साहित्यातील एक लेणे समजले जाते. मोझेस यांची बहीण मिरियम ही गीतकार होती. देबोराच्या गीताप्रमाणे तिच्याही गीताचा बायबलमध्ये समावेश करण्यात आला आहे. देबोरा आणि मिरियम यांचे काव्य हे बायबलमधील इ.स.पू. तेराव्या-बाराव्या शतकांतील प्राचीनतम साहित्य आहे. बायबलच्या आद्य कवयित्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

जेएल नावाच्या स्त्रीने सिसराला आश्रय देऊन लपवून ठेवले. तो झोपी गेला असता तिने हाती मेख आणि हातोडा घेतला. पाय न वाजवता ती सिसराच्या जवळ गेली आणि सर्व धैर्य एकवटून तिने त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. ही जेएल शूर होती म्हणूनच तिने असे धैर्य दाखवले ना? (बायबल : ‘शास्ते-जज्जेस’ ५ : १७–२२).

वश्ती ही पर्शियाचा राजा अर्तशेर्शज याची पट्टराणी. ती रूपाने अतिशय देखणी होती. एकदा राजाने मोठी मेजवानी आयोजित केली. राणीने साजशृंगार करून राजमहालात येऊन पाहुण्यांना आपल्या सौंदर्याचे दर्शन घडवावे म्हणून राजाने तिला बोलावणे पाठवले. तेव्हा राजाचा कोप होण्याची भीती असूनही तिने देहप्रदर्शन करण्यास बाणेदारपणे नकार दिला. त्यामुळे राजाने तिची राणीपदावरून उचलबांगडी केली; परंतु तिने त्याची पर्वा केली नाही. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला जपणारी स्वाभिमानी राणी वश्ती हिला स्त्रीमुक्तीची प्रणेतीच म्हणावी लागेल. (बायबल : ‘एस्तेर’ १ : ११-१२).

ज्यूंना छळणाऱ्या सेनापती होलोफर्नेस याच्या छावणीत ज्युडिथ या विधवा स्त्रीने चतुराईने प्रवेश मिळवला. मोठ्या खुबीने तिने त्याचे मन जिंकले आणि तो बेसावध असताना तिने त्याचे मुंडके धडावेगळे केले आणि आपल्या लोकांना मोठ्या संकटातून वाचवले. ती रूपसुंदर होती. तिचा गैरफायदा घेतला जाण्याचा धोका होता, तरीही तिने साहस केले. (बायबल : ‘ज्युडिथ’ १३).

एस्तेर ही ज्यू होती. तिचा पर्शियाच्या राजाबरोबर विवाह झाला. हामान हा राजाचा प्रधानमंत्री होता. तो ज्यूद्वेष्टा होता. त्याने राजाचे कान फुंकले. त्यामुळे ज्यू लोकांचा छळ होऊ लागला. आपला चुलता मोर्डेकाय याच्या सल्ल्यावरून एस्तेरने राजाचे मन वळवले आणि एका मोठ्या हत्याकांडातून ज्यू लोकांची सुटका केली. ती निश्चितच धोरणी आणि मुत्सद्दी होती. (बायबल : ‘एस्तेर’ २७).

ग्रीक राजा अँटायओकस याने ज्यू लोकांना त्यांच्या धर्माचाराविरुद्ध वर्तन करण्याची सक्ती चालवली, तेव्हा राजाच्या आज्ञेचे पालन करण्यापेक्षा देवाशी एकनिष्ठ राहण्यास प्रोत्साहन देणारी आणि आपल्या सातही मुलांच्या हौतात्म्याची साक्षी असलेली मक्काबीची आई शमुनी ही दुर्बल होती, असे कोण सांगू शकेल? असा प्रश्न ट्रिबल विचारतात.

संदर्भ :

  • Brown, Raymond and Others, The New Jerome Biblical Commentary, Bangalore, 1997.
  • Elza, Tames, Ed., Through Her Eyes : Women’s Theology from Latin America, New York, 1989.
  • Fabella, Virginia; Oduyoye, Mercy Amba, Eds., With Passion and Compassion : Third World Women Doing Theology, New York, 1988.
  • Farmer, William; LaCocque, Andre; Levoratti, Armando; Dungan, David, Eds., The International Bible Commentary, Minnesota, 1998.
  • Pui-lan, Kwok, Chinese Women and Christianity : 1860-1927, Oxford, 1992.
  • Virginia, Fabella; Sun Ai Lee Park, Eds., We Dare to Dream : Doing Theology as Asian Women, New York, 1989.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया