भारतातील एक अनुसूचित जमात. मुख्यत꞉ ही जमात ओडिशा राज्याच्या कोरापूट व कलहांडी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असून आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाम या ठिकाणीसुद्धा ते काही प्रमाणात आढळतात. यास परजा असेही म्हणतात. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ३,७४,६२८ एवढी होती.
या जमातीचे नाव प्रजा या संस्कृत शब्दापासून परोजा पडल्याचे प्रचलित आहे. सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर यांची अनेक कुळे आहेत. उदा., डांगरु, कुई, बरका, नाग इत्यादी. या जमातीची मोठा किंवा बडा परोजा आणि पेंगो किंवा सना परोजा या दोन वर्गांत विभागणी झाली आहे. मोठा परोजामध्ये सोदिया परोजा, झोडिया परोजा, बडा झोडिया परोजा या उपजमाती येतात; तर पेंगो परोजामध्ये कोंडा परोजा, बारेंग झोडिया परोजा, सेलिया परोजा, छेलिया परोजा या उपजमातींचा अंतर्भाव होतो.
यांचा सर्व सामन्यांप्रमाणेच शारीरिक बांधा असून रंगाने हे लोक काळे-सावळे आहेत. पूर्वी पुरुष फक्त कमरेभोवती लंगोट गुंडाळायचे; मात्र आता धोतर व बनियन किंवा बंडी वापरत आहेत. स्त्रिया चोळी व वेगवेगळ्या रंगांची साडी नेसतात आणि केसांभोवती रंगीत कापडी पट्टया लावतात. हातात रंगीबेरंगी बांगड्या, दंडावर बाजूबंद, बोटात अंगठी, पायाभोवती जेत्रा आणि पैंजण घालतात. कानात, गळ्यात, नाकात, डोक्यावर विविध प्रकारचे चांदी किंवा साध्या धातूचे दागिने घालतात. स्त्रियांना अंगावर विविध नक्षीकाम गोंदवायला आवडते. आता या जमातीतील तरुण – तरुणी आधुनिक वस्त्रांचा वापर करत आहेत.
हे लोक द्रविडीयन भाषाकुलाच्या प्रभावाखालील गोंडी भाषेच्या जवळची पारजी व इंडो आर्यन भाषाकुलातील देसिया या भाषा परस्परांत बोलतात. ओडिया आणि तेलुगू या स्थानिक भाषासुद्धा हे लोक बोलतात.
यांची घरे उतरत्या छपरांची असतात. घर बांधण्यासाठी माती, चिखल, शेण, बांबू, लाकूड इत्यादी वस्तुंचा वापर करतात. पावसाळ्यात घराजवळ पाणी साठवू ते पाणी वर्षभर पुरेल अशी सोय केलेली असते. वेळोवेळी आपल्या घराच्या भिंती सारवणे, त्याला लाल रंग किंवा गेरू लावणे ही कामे ते करत असतात. वर्षातून एकदा गवताच्या काड्यांपासून किंवा बांबूपासून ते छप्पर पुन्हा बांधतात. घराचे दरवाजे हे लहान असून त्याला रंगीत नक्षीकाम रेखाटून सजवतात. त्यांचे घर सामान्यपणे दोन खोल्यांचे असते.
या लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. बदली पिकांची लागवड करणे, शिकार करणे, पशुसंवर्धन करणे, मोह, गवत गोळा करून ते विकणे यांसारखे जोडधंदेही ते करतात. स्त्रियांचा सर्व व्यवसायात खूप मोठा सहभाग असतो. हे लोक शाखाहारी व मांसाहारी आहेत. त्याचे मुख्य अन्न भात, मका, नाचणी हे असून ते मासे, खेकडा, साप, पाल, उंदीर, डुक्कर, बैल इत्यादी प्राण्यांचे मांस खातात. तांदळापासून बनविलेली दारू पितात.
जमातीमध्ये आईच्या नात्यात लग्नास मान्यता असून आत्याच्या मुलीशीही लग्न मान्य आहे. विधवा विवाहास, पुनर्विवाहास मान्यता असते. मुलीकडून रोख रक्कम, वस्तू, पाळीव प्राणी या स्वरूपात हुंडा घेतला जातो.
परोजा लोकांचा त्यांच्या पारंपरिक देवदेवतांवर विश्वास असतो. त्यांचा पत्राबुडा देव हा मोठ्या झाडाच्या सावलीत विस्थापिलेला असतो, असे ते मानतात. तसेच निशान हे त्यांचे ग्रामदैवत असून तो गावाच्या मध्यभागी असतो. त्याची पुजा करण्यासाठी जानी नावाचा पुजारी असतो. या ग्रामदैवाताची आधी पूजा करूनच नंतर त्यांचे सण, समारंभ, विधी शांतपणे व कोणतीही समस्या न उद्भवता पार पाडले जातात; असे केले नाही, तर काही तरी विघ्न येईल, अशी परोजा जमातीची श्रद्धा आहे. तसेच निसर्ग, जंगल, झरे, नद्या, पर्वत या सर्व गोष्टींना ते महत्त्व देतात. याच बरोबर काही परोजा लोक शंकर-पार्वती, लक्ष्मी या देवांनाही पूजतात.
हे लोक त्यांच्या सर्व सण व समारंभांच्या वेळी पारंपरिक लोकनृत्य करून, लोकसंगीत गाऊन साजरे करतात. ढेमसा हे त्यांचे लोकनृत्य असून ढोलाच्या तालावर आणि ढोल संगीताच्या सुरांवर हे लोक आनंदाने त्याचे सण-समारंभ साजरा करतात. या जमातीच्या स्त्रीया राजकीय आणि सांस्कृतिक विषयांत क्वचितच सहभागी होताना दिसतात. या जमातीची पारंपरिक कुळ पंचायत असून या ठिकाणी परस्परांतील सर्व समस्यांचे निराकरण होते.
मृत व्यक्तीला हळद लावून आंघोळ घालतात व नवीन कपडे घालतात. मृत व्यक्तीवर संस्कार करून त्याचे दहन करतात. मृताच्या सर्व वस्तू त्याच्या बरोबर दहन करतात. तीन किंवा पाच दिवसांचा दुखवटा पाळतात.
संदर्भ ꞉ Singh, K. S., People Of India, Oxford University Press, 1998.
समीक्षक ꞉ लता छत्रे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.