भारतातील मध्य प्रदेशातील विशेषतः मंडला, विलासपूर, बालाघाट दुर्ग, दिंडोरी, शाहडोल, सिद्धी, कटनी, सिंग्रौली, अनुपूर या जिल्ह्यांत आढळणारी एक अनुसूचित जमात. मध्य प्रदेशमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगढ भागातील बैगा-चाक हे जमातीचे मूळ ठिकाण असून याव्यतिरिक्त झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांतही या जमातीचे लोक आढळून येतात. मध्य प्रदेशात २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ४,१४,५२६ इतकी, तर भारतात ५,५२,४९५ इतकी होती.
बैगा जमातीच्या अनेक दंतकथा आहेत. विश्वाच्या निर्मिती वेळी ब्रह्मदेवाने एका निर्वस्त्र व्यक्तीला कुऱ्हाड दिली. ज्याला ‘नंगा बैगा’ असे संबोधले जाऊन तोच बैगा जमातीचा पूर्वज बनला असे मानतात. त्यांची उत्पत्ती निश्चित नसून वांशिक दृष्ट्या मुंडा किंवा कोलारियन वंशाची ती शाखा असावी, तर काहींच्या मते ते भूमिया किंवा भुईया या गटांशी संबंधित एक वेगळा गट असू शकतो. बैगा जमातीच्या सात शाखा असून त्या विविध भूविभागांत राहतात. प्रत्येकामध्ये स्थानिक वैशिष्ट्ये आढळतात.
बैगा दिसायला सुंदर, काळे केस, कसदार शरीरयष्टीचे, लांबट मस्तिष्काचे व मेहनती स्वभावाचे आहेत. बैगा पुरुषांचा पोशाख धोतर व सदरा असून लुगडे व चोळी हा स्त्रियांचा पारंपरिक वेष आहे. स्त्रीया चांदीचे, बीडचे व ऐपतीनुसार सोन्याचे दागिने घालतात आणि अंगावर विशेषता कपाळावर विशिष्टपद्धतीने गोंदवून घेतात. पुरुषांजवळ धनुष्यबाण आणि एक लहान कुऱ्हाड दिसून येते. आज अनेक बैगा लोक आधुनिक प्रकारचा पोशाख परिधान करताना दिसतात.
हे लोक इतर समाजापासून दूर मुख्यत꞉ घनदाट जंगलात २०-२५ घरांच्या वसतीने राहतात. बदलत्या शेतीपद्धतीमुळे ते टिकाऊ घरे न बांधता कुळामातीच्या भिंती व मातीची जुनी कवेलू असलेल्या छपरांची घरे बांधतात. त्यांचा शेती व पशुपालन हा मुख्य व्यवसाय असून भूमिहीन बैगा इतरांच्या शेतात मजुरी करतात. तसेच ते शिकार व तेंदुपत्ता गोळा करतात. शेतात मका, ज्वारी, भात, कोडो, कुटकी, सावा, राई, तिवडा, रामटिला, मूग इत्यादी पिके घेतात. आज अनेक बैगा लोक उच्चशिक्षित असून सरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी करत आहेत. ते शाखाहारी व मांसाहारी असून कुटकीची पेज, भात, मासे, हंगामी फळे इत्यादींचे सेवन करतात.
बैगा जमात विविध गोत्रांची एक जात असून ती अनेक अंतर्जात उपजातींमध्ये विभागलेले आहेत. त्यांची पितृसत्ताक समाजरचना असून ते पितृसत्ताक सामाजिक संरचना पाळतात; मात्र स्त्रीयांना स्वायत्तता व स्वातंत्रता आहे. जमातीमध्ये बालविवाह प्रचलित असून मुलगा १४ ते १८ आणि मुलगी १२ ते १६ हा लग्नाचा वयोगट दिसून येतो; परंतु आता शासनाच्या नियमानुसार प्रौढविवाहसुद्धा होताना दिसून येत आहेत. ते आंतरवैवाहिक, तर गोत्रे बहिर्वेवाहिक असून आते-मामे भावंडांचा विवाह, विधवाविवाह व सेवाविवाह यांस अधिमान्य आहे. त्यांच्यात बहुपत्नीत्वसुद्धा दिसून येते. जमातीच्या पंचांसमोर गवताची काडी मोडून स्त्री किंवा पुरुष काडीमोड (घटस्फोट) घेऊ शकतात.
जमातीमध्ये बाळंतपण, लग्न व मृत्यू यांवेळी पारंपरिक विधी पाळल्या जातात. नूतन अर्भकाच्या रूपाने कुटुंबातील पूर्वजच आले, असे समजून चांदीचा तुकडा पाण्यात बुडवून त्या पाण्याने त्याचे पाय धुतात आणि तीर्थ म्हणून ते पाणी पितात. जावळाचे वेळी मामाकडून बालकाच्या नामकरणविधी करतात.
ही जमात दसरा, छठी, होळी, पोळा, नवखाई, बिद्री पूजा, कर्म पूजा इत्यादी सण; तर हरळी देवीचा उत्सव साजरा करतात. बैगा जमातीचा पारंपरिक पोशाख, नृत्य आणि विधी हे त्यांची विशिष्ट संस्कृती व वैविध्यपूर्ण पैलू दर्शविते. सण–उत्सवाच्या वेळी ते कर्मा, लहकी, रीना, सैला इत्यादी पारंपरिक नृत्य करतात आणि लोकगीते म्हणतात. ते निसर्गाला देव मानतात. तसेच मनपती माई, खैरमाई, बडादेव (उंबराचे झाड), ठाकूर देव (गावची जमीन व सीमा), नारायण देव, दुनहादेव (रोगराई व अपघात) व भीमसेन (पाऊस) यांचे पूजन करतात.
बैगा जमातीत भूतबाधा व जादूटोण्यामुळे मृत्यू येतो, अशी समजूत आहे. भूमका हा देवतांसाठी पुजारी आणि भूतांसाठी भूतबाधा दूर करणारा म्हणून काम करतो. वाघाच्या हल्ल्यामुळे मृत्यू आल्यास मृतास शांती मिळावी, तसेच तो वाघ परत कोणावर हल्ला करू नये म्हणून खास विधी करतात.
हे लोक मृताला दफन करतात व त्याच्या शेजारी कोयता, सुप, फावळा, भोपळा इत्यादी ठेवतात. घुबडांचा बळी देऊन त्याचे मांस शिजवतात व त्यातून मृताच्या नावाचा वाटा काढून बाकीचा खातात.
संदर्भ : https://museum.tribal.gov.in/tribes-of-mp.html
समीक्षक ꞉ आरती नवाथे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.