चिटणीस, एकनाथ वसंत : (२५ जुलै १९२५). भारतीय अवकाशशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला. वडील पुण्याच्या कँप परिसरात वैद्य असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. पुढे वाडिया महाविद्यालय येथून रसायनशास्त्र आणि एस. पी. महाविद्यालयातून भौतिकी विषयाची पदवी संपादन केली. भौतिक विषयात आवड निर्माण झाल्याने त्यांनी रेडिओ संपर्कशास्त्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून इलेक्ट्रॉनिकी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर ते अहमदाबाद येथे डॉ. विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेल्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटेरीत (भौतिक अनुसंधान प्रयोगशाला; पीआरएल) आपल्या कादकिर्दीची सुरुवात केली.
पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताजवळ विश्वकिरणे येत असतात. पृथ्वीचे चुंबकीय विषुववृत्त हे चाळणीसारखे काम करीत असून इतर बारीक कण बाजूला सारून त्यातून फक्त ऊर्जित कण पृथ्वीच्या वातावरणात येत असतात. १९५०—६० च्या दशकात चिटणीस यांनी या विश्वकिरणांसंबंधी संशोधन केले, तसेच तमिळनाडू येथील कोडाईकानल येथे जाऊन सखोल निरीक्षण केले. विश्वकिरणांच्या वर्षाव (extensive air showers) संबंधीच्या विषयांत त्यांनी आपली पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी केलेल्या निरीक्षणांच्या पुढील संशोधनाकरिता ते अमेरिकेच्या मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे तीन वर्षांकरिता गेले. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी अवकाश संशोधन आणि क्ष-किरण या विषयांवरील संशोधनकडे आपले लक्ष केंद्रित केले.
चिटणीस यांनी थुंबा (केरळ) येथील इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनचे स्थान आणि उपग्रह प्रक्षेपणासाठी साराभाई यांच्या मदतीने श्रीहरीकोटा या जागेची निवड केली. अंतरिक्ष विज्ञान आणि रॉकेट सायन्स या विषयाचे महत्त्व अधोरेखित झाल्याने डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली इन्कॉस्पार (इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च; आताचे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन; इस्रो) समितीची स्थापना करण्यात आली (२३ फेब्रुवारी १९६२). या समितीचे साराभाई अध्यक्ष आणि प्रा. चिटणीस सचिव होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदात भारताचे प्रतिनिधत्व केले.
१९७० च्या दशकात उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग शेती, शिक्षण, हवामान, आरोग्य, दूरसंपर्क, मनोरंजन इत्यादींसाठी करण्याकरिता सॅटेलाईट इंस्ट्रक्टशनल टेलिव्हिजन एज्युकेशन (साइट) यांसारखे कार्यक्रम प्रा. चिटणीस यांनी नासाच्या सहकार्याने राबविले. त्यामुळे दुर्गम ठिकाणी त्यांना या कार्यक्रमांमुळे पोहोचणे शक्य झाले. उपग्रह तंत्रज्ञानाचा हा सर्वांत मोठा सामाजिक उपक्रम असून याद्वारे १९७५-१९७६च्या कालावधीत बिहार-राजस्थान-उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात हा उपक्रम राबविण्यात आला. या यशस्वी प्रकल्पामुळे पंतप्रधान पंडित नेहरूंचे टेलिव्हिजन विषयी मतपरिवर्तन झाले व त्यांनी या उपक्रमाला उत्तेजन दिले.

चिटणीस यांची अहमदाबाद येथील स्पेस रिसर्च सेन्टरचे (सध्याचे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर; अंतरिक्ष उपयोग केंद्र) संचालक म्हणून नेमणूक झाली (१९८१ – ८५). पुढे सेवानिवृतीनंतर दोन वर्षांसाठी त्यांची त्याच संस्थेत सल्लागार म्हणून विशेष नेमणूक करण्यात आली. इन्सॅट मालिकेतील उपग्रहाच्या आखणीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. नाईकेॲपोची या अग्णिबाणाचे प्रक्षेपणही त्यांच्या काळात करण्यात आले. त्या काळात त्यांनी अनेक तरुण शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले. त्यांनीच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची निवड व नेमणूक केली. त्यांनी दूरसंचार व उपग्रह तंत्रज्ञानाचा शेती, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या सामाजिक व राष्ट्रीय समस्यांवर तोडगा काढण्याची उपयुक्तता पुढे आणली. १९८७ नंतर चिटणीस पुणे येथे स्थायिक झाले. त्यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठात शैक्षणिक मल्टिमीडिया केंद्र स्थापण्यात पुढाकार घेऊन विद्यापीठाच्या उपक्रमांना नवी दिशा दिली.
चिटणीस यांना पुढील काही मानसन्मान आणि पदकांनी सन्मानित करण्यात आले : ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे आर्यभट्ट पारितोषिक (१९९७), एल.एन.गुप्ता पुरस्कार (१९८३), फाय फाउंडेशन पुरस्कार, विज्ञान व समाज यांची सांगड घालणाऱ्या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विशिष्ट पारितोषक. भारतीय अंतराळ संस्थेतर्फे दूरसंपर्क क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल विशेष पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि इंजिनियरींग़ क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना १९८५ मध्ये भारत सरकारतर्फे पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार (२०२५) त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
संदर्भ :
- सहयाद्री वाहिनी मुलाखत, विज्ञानम जनहिताय २६ जुलै २०२५.
समीक्षक : अ. पां. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.