भारतातील एक अनुसूचित जमात. यांची वसती मुख्यत꞉ बिहार राज्यातील छोटा नागपूर, रांची, हजारीबाग, गुमला, लोहारडगा, सिंगभूम आणि धनबाद या जिल्ह्यांमध्ये असून पश्चिम बंगाल तसेच ओडिशामधील मयूरभंज व सुंदरगढ या ठिकाणीसुद्धा वास्तव्यास आहे. यांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार बिहारमध्ये १,५५,०२३, झारखंडमध्ये १,५२,६६३, पश्चिम बंगालमध्ये ८१,५९४ आणि ओडिशामध्ये १८,६२५, भारतात सुमारे ४,६६,००० एवढी होती.
महाली जमातीला मुंडा व संथाल जमातींचा सहवास लाभला असल्यामुळे एकमेकांत सांस्कृतिक साम्य दिसून येते. हे लोक द्रविडियन वंशातील असून जमातीच्या बनसफोर महाली, पतार महाली किंवा घासी महाली, सुलुंखी महाली, तंटी महाली आणि महाली मुंडा अशा एकूण पाच उपशाखा आहेत. केशरीयार, हंसदा, डुंगरी, काथेरगाच, सरेन, मुर्मू, हेमरोन या त्यांच्या काही कुळी आहेत. डुमरिआर (जंगली उंबर), केरेकट्टा (एक पक्षी), महुकल (एक पक्षी), गुंड्ली (एक धान्य), भुक्तुआर, तुरू, तिर्की, तुंडुआर, लँद चेनरे इत्यादी त्यांची कुलचिन्हे आहेत.
या जमातीतील लोकांची अंगकाठी व राहणीमान सर्वसामान्यांसारखे आहे. पुरुष धोतर व बंडी घालतात, तर महिला लुगडे किंवा साडी-चोळ परिधान करतात. अनेक लोक आधुनिक पोशाखसुद्धा वापरतात. त्यांची घरे सामान्यत: मातीच्या भिंती असलेले आणि छत गवताचे किंवा फरशांचे आढळून येतात; मात्र आता काहीजण पक्के घरे बांधून राहत आहेत. त्यांची भाषा ही इंडो-आर्यन प्रकारात मोडते. परंस्परांमध्ये ते सादरी, मुंडारी आणि संथाली भाषा बोलतात; तर इतरांसोबत बंगाली, हिंदी आणि ओडिया या भाषांचा वापर करतात.
बांबूंपासून उत्तम हस्तकलात्मक वस्तू बनविणे हा या जमातीचा पारंपरिक व्यवसाय असून बांसफोर महाली हे बांबूपासून वस्तू बनविणे, पातर महाली किंवा घासी महाली हे शेती व टोपल्या बनविणे, सुलुंखी महाली हे शेतमजुरी, तंटी महाली हे पालखी, मेणा तयार करून वाहणे आणि महाली मुंडा हे शेतमजुरी असा व्यवसाय करतात. जमातीतील अनेक मुलेमुली शिक्षण घेऊन सरकारी व खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरी करत आहेत. हे लोक शाखाहारी व मांसाहारी आहेत.
हे लोक स्वायत्त आदिवासी धर्म मानतात. विविध राज्यांतील महाली लोक विविध देवदेवतांची पूजा करतात. मारंग बुरू ही या लोकांची पारंपरिक देवता असून ते बाना कुआनरी, मनरेइको तुरेइको, बाबाजी, बाद चंडी आणि रंग चंडी, सुरजी (सूर्य देव), बर पहाडी (डोंगर देव) मनसा देवी, जहेरीरा इत्यादी देवदेवतांची पूजा करतात. पश्चिम बंगालमध्ये महाली लोक मोठ्या प्रमाणात वैष्णव असल्याचे आढळतात.
हे लोक फेब्रुवारी ते मार्च (फाल्गुन) या महिन्यांत गावाच्या कल्याणासाठी नाया पिऱ्हा ही पूजा करतात, त्यास ‘बाहा’ असे म्हणतात; ऑक्टोबर ते नोव्हेंबर (कार्तिक) या महिन्यांत गावाच्या बाहेर पक्ष्यांचा बळी देतात, त्यास ‘शरई’ म्हणतात; जानेवारी ते फेब्रुवारी (माघ) या काळात कापणी करणे, नवीन फळे, पाने, जंगली गवत यांचा वापर करणे, लाकूड कापणे व गोळा करणे इत्यादी कार्य नव्याने करतात, त्यास ‘मा–माने’ असे म्हणतात. महाली लोक कारम, तुसू, अशारिया, बंदाना, रज्जा, माघी, परब, रथयात्रा, होळी, दिवाळी इत्यादी सण साजरे करतात. याशिवाय बांगरी, हरीयारी, नवाखानी हे त्यांचे मूळ उत्सवही ते साजरे करतात. सण व उत्सवांच्या वेळी हे लोक पारंपरिक नृत्य व लोकगीते म्हणतात.
या जमातीची पारंपरिक जात पंचायत असते. यात नाया, पुजारी, माझी, गडीत इत्यादींचा समावेश असून सर्व सामाजिक निर्णय या पंचायतीत घेतले जातात. यांचे नागबसी आणि राजपूत यांच्याशी जमीनदार, भाडेकरी असे नाते असते. नवीन आर्थिक सुधारणा आणि सरकारी विकास यांबद्दल यांचा सकारात्मक दृष्टीकोन असतो.
जमातीत बाल व प्रौढ विवाह दोन्ही प्रचलित आहेत. यांची लग्ने उपशाखेतल्या समूहांत होतात. वधुमूल्य प्रथा प्रचलित आहे. पुनर्विवाह, विधवाविवाह आणि घटस्फोटाला परवानगी आहे. नवीन मुल जन्म घेतलेल्या घरात सुरुवातीचे नऊ दिवस शौच पाळण्याची परंपरा या जमातीत आहे.
महाली लोक सामान्यतः मृतांना दफन करतात, तर काही लोक अग्नी देतात.
संदर्भ ꞉ Singh, K. S., People Of India, Oxford University Press, 1998.
सममीक्षक ꞉ लता छत्रे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.