भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात राजस्थानमधील एक मोठी जमात असून ते जयपूर, अलवार, भरतपूर, सवाई माधोपूर, टोंक, बुंडी, दौसा, नाईन, कैरोली, धुंधर, कोटा, झलवार, भवरगृह, चोपाली, भिलवाडा, उदयपूर इत्यादी भागांत विखुरलेली आहे. उत्तर-पश्चिम राजस्थानमधून काही मीना लोक हरियाणात प्रामुख्याने गुडगाव, महेंद्रगढ, हिस्सार आणि रोहतक या जिल्ह्यांमध्ये आढळतात; तर काही मध्यप्रदेशात स्थलांतरित झाले आहेत. त्यांना मीन, मिनंद किंवा मेना या नावांनीही ओळखले जाते. त्यांची २०११ च्या जनगणनेनुसार राजस्थनमधील लोकसंख्या ४३,४५,५२८ इतकी होती; तर सुमारे ५०,००,००० पेक्षा अधिक लोकसंख्या भारतात आढळून येते.

मीना जमातीच्या लोककथेनुसार विष्णुच्या मत्स्यावतारापासून यांची व्युत्पत्ती झाली असून मत्स्य राजवटीत यांचे वंशज होते. म्हणून यांचे नाव माशापासून झालेले ते ‘मीना’ असे आहे. नईन, कैरोली, धुंधर, कोटा, झलवार इत्यादी ठिकाणी त्यांची स्वतःची राजवट होती. जयपूरमधल्या राजपूत घराण्याचे ते वंशज आहेत, असाही काहींचा समज आहे. यजुर्वेद, मत्स्यपुराण, अग्निपुराण, मनुस्मृती आणि संस्कृत साहित्यात मीना जमातीचा उल्लेख आढळतो. मीना जमातीपासून मेओ ही जमात वेगळी झाल्याचे त्यांच्या सारख्या परंपरा व संस्कृतीवरून दिसून येते.

मीना जमातीचे काही प्रकार आहेत. जमीनदारी किंवा शेतकरी, पहारेकरी (चौकीदार), परिहार, गुज्जर, रावत, भिल्ल, ठाकूर राजपूत असे त्यांचे उपप्रकार आहेत. परिहार मीना ही सर्व उपजमातीत सगळ्यांत वरच्या स्थानावर आहे. यांच्या एकूण बारा उपजमाती, बत्तीस कुळी व गोत्र असून भारवल, चोपाला, पपपाती, गोमलहादा, सिरा, बागारी, बोया, गारवाल, मोरजाल अशी त्यांच्या गोत्रांची नावे आहेत. राजपूत, जाट, यादव आणि सैनिक अशा काही उपशाखाही आहेत. पहारेकरी मीना हे खूप विश्वासू असतात.

मीना जमातीचा पुरुष सर्वसाधरणपणे पायाच्या घोटीपर्यंत धोतर, कुर्ता किंवा बंडी व डोक्यावर पगडी (पोटिया) बांधतात. ते मुरकी नावाचा चांदीचा दागिना कानात घालतात. महिला पायाच्या घोटीपर्यंत पल्ला घागरा, विविध पद्धतीने सजवलेली कुर्ती किंवा कंचली व ओढणी परिधान करतात. पोशाखाबरोबर दागिने परिधान करणे हा त्यांचा अविभाज्य भाग समजला जातो. बोरला हा त्यांचा महत्त्वाचा दागिना असून त्या कानात तिमनीया, नाकात, नथ, गळ्यात हंसली, हातात बांगड्या – पोंची – चुडा, दंडाला बाजूबंद, पायात कडी – पाजेब इत्यादी चांदीची दागिने घालतात. मीना पुरुष व स्त्रीया दोघेही हातावर  आणि चेहऱ्यावर गोंदवून घेतात. आज जमातीमधील स्त्री – पुरुष आधुनिक वस्त्रे परिधान करीत आहेत.

जमातीत एकाच कुटुंबाची घरे सामान्यत꞉ एकाच खोलीची, परंतु एकापेक्षा अधिक असतात. ती मातीची, खिडकी नसलेली व एकच दरवाजा असलेली, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी घराला पर्यावरणपूरक छत म्हणजेच गवताचे छत असते. आर्थिक दृष्ट्या समृद्ध असलेले मीना लोक पक्के घरे बांधून राहत आहेत. हे लोक एकमेकांशी मेवाडी, धुंदरी, मारवाडी, भिली, हरौती, गढवाली, मालवी या भाषांत बोलतात; तर इतरांशी हिंदी या भाषेत संवाद करतात.

हे लोक शेती, पहारेकरी, पशुपालन इत्यादी व्यवसाय करतात. त्याच बरोबर जमातीतील अनेक लोक आज उच्च शिक्षण घेऊन सरकारी व खाजगी नोकरीत कार्यरत आहेत. हे लोक शाखाहारी व मांसाहारी आहेत. त्यांचे मुख्य अन्न गहू, बाजरी, मका यांपासून बनविलेली बेखमीर भाकरी (रोटी) व दाळीचे वरण असून ते भाजीपालाही खातात.

मीना जमातीची संस्कृती व परंपरा मोठी आहे. हे लोक आपल्या पूर्वजांना देवासमान मानून धार्मिक विधी करतात. शेकडो वर्षांपासून विष्णूच्या नावाने मीन जयंती साजरी करण्याची परंपरा यांच्यात दिसून येते. सामाजिक, धार्मिक प्रसंगी तसेच सण-समारंभांच्या वेळी हे लोक गाणी, संगीत व नृत्य करतात. विशेषत꞉ नवरात्रीतील सातव्या दिवशी हे लोक आपापली कला, नृत्य, संगीत, गीत सादर करून उत्सव साजरा करतात. तसेच घराच्या भिंतींवर, जमिनीवर विविध चित्रे काढून आनंदाने सण साजरे करतात.

मीना जमातीची गाव आणि शहर पातळीवर समिती असते. या समितीत यांच्या समाजाचे निर्णय आणि सर्व व्यवस्थापन केले जाते. यांच्यात काही प्रमाणात बालविवाह दिसून येतो. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न करतात. लग्न मुलीच्या घरी लावण्याची प्रथा आहे. यांच्यात पुनर्विवाहास मान्यता असून विधवा विवाह नवऱ्याच्या लहान भावाशी लावण्यास प्राधान्य असते. मुली कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक कार्यक्रमांत सहभागी असतात. मुलाच्या जन्मानंतर विशेष कार्यक्रम ठेवतात.

मृत्युनंतर मृत व्यक्तीला दहन करतात आणि बारा दिवसांचा दुखवटा पाळतात.

संदर्भ ꞉ Singh, K. S., People of India, Oxford University Press, 1998.

समीक्षक ꞉ लता छत्रे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.