(इ. स. पू. सु. २८७ —२१२). सुप्रसिद्ध प्राचीन ग्रीक गणिती व संशोधक. त्यांनी भूमिती, यामिकी (बलांची वस्तूंवर होणारी क्रिया आणि त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) व अभियांत्रिकी या त्रिविध क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी केली. त्यांचा जन्म सिसिलीमधील सेरक्यूज येथे झाला. सेरक्यूजचा राजा दुसरा हीरो व त्यांचा मुलगा गेलो यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. त्यांचे सर्व शिक्षण ॲलेक्झांड्रिया येथे झाले. तेथे कॉनन नावाच्या गणितज्ञाशी त्यांचा परिचय झाला. शिक्षण संपल्यावर आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी गणिताचा अभ्यास पुढे चालू ठेवला. उपलब्ध असलेल्या त्यांच्या लेखांवरून त्यांच्या सखोल कार्याची कल्पना येते. त्यांचे काही लेख जवळजवळ दोन हजार वर्षांपर्यंत प्रमाणभूत मानले गेले आहेत.
आर्किमिडीज यांनी वर्तुळ, अन्वस्त आणि सर्पिल या वक्रांच्या क्षेत्रमापनासाठी वापरलेली ‘निःशेष पद्धत’ बऱ्याच बाबतीत अर्वाचीन समाकलनाच्या [ → अवकलन व समाकलन ] विवरणाशी सदृश असलेली आढळते. वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्या गुणोत्तराचे (π चे) मूल्य २२३/७१ आणि २२/७ त्यांच्या दरम्यान असल्याचे त्यांनी सिद्ध केले. दंडगोल आणि गोल यांची क्रमश: उंची आणि व्यास सारखाच असेल, तर गोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ दंडगोलाच्या पृष्ठफळ आणि घनफळाच्या दोन तृतीयांश असते, हे त्यांनी दाखवून दिले.
शांकवाचे [वक्राचा एक प्रकार; शंकुच्छेद] क्षेत्रफळ किंवा शांकव अक्षाभोवती फिरवून येणाऱ्या प्रस्थाच्या (घनाकृतीच्या) पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किंवा त्या प्रस्थाचे घनफळ तुलनात्मक रीतीने मांडता येते, असे त्यांनी दाखविले. अंक मोजण्याच्या ग्रीक पद्धतीत त्यांनी सुधारणा केल्या.
आर्किमिडीज यांनीच तरफेचा शोध लावला. ‘योग्य टेकू मिळाल्यास मी पृथ्वीसुद्धा तरफेचा साहाय्याने उचलून दाखवीन’ असे त्यांनी उद्गार काढले होते. ‘पदार्थाचे पाण्यात केलेले वजन हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा त्याने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजनाइतके कमी असते’ हे तत्त्व ‘आर्किमिडीज तत्त्व’ या नावाने सुप्रसिद्ध आहे. सोनाराने बनविलेल्या मुकुटात चांदीची भेसळ असल्याचा राजा हीरो यांस संशय आला आणि त्याची शहानिशा करण्याचे काम आर्किमिडीज यांच्याकडे सोपविण्यात आले. प्रश्नाचा विचार करीत असतांना ते पाण्याने भरलेल्या टबात उतरले. बाहेर पडलेल्या पाण्यावरून भेसळ शोधण्याचा उपाय त्यांना सापडला. उत्साहाच्या भरात ते ‘यूरेका! यूरेका! (सापडले!) असे ओरडत धावत सुटले. या घटनेतूनच या तत्त्वाचा शोध लागला.
आर्किमिडीज यांनी पाणी उपसून काढण्याकरिता शोधून काढलेल्या यंत्रास ‘आर्किमिडीज स्क्रू’ असे नाव प्राप्त झाले आहे आणि ते ईजिप्तमध्ये वापरातही होते. त्यांनी मोठ्या आकाराच्या स्क्रूचा वापर करून शत्रूंच्या जहाजाला वर उचलून बुडविण्याची यंत्रणा विकसित केली. तसेच अंतर्गोल आरशांचा वापर करून सूर्यप्रकाश केंद्रित करून शत्रूंच्या जहाजांना आग लावण्याचे तंत्र विकसित केले. गोफणीतून ज्याप्रमाणे दगड फेकता येतात त्याच धर्तीवर मोठेमोठे दगड फेकण्याचे यंत्र त्यांनी तयार केले होते. रोमन सेनापती मार्सेलस् यांनी समुद्रमार्गे सेरक्यूजवर केलेली स्वारी राजा हीरोनी या यंत्राच्या जोरावर परतविली. तथापि खुष्कीच्या मार्गाने येऊन मार्सेलस् यांनी सेरक्यूज काबीज केले आणि त्यांच्या सैन्यातील सैनिकाने आर्किमिडीज यांचा शिरच्छेद केला.
आर्किमिडिज यांच्या तत्त्वानुसार द्रवात पूर्णतः किंवा अंशतः बुडलेल्या एखाद्या वस्तूवर कार्य करणारे उर्ध्व बल हे द्रवाची घनता, बाजूस सारलेल्या द्रवाचे घनफळ आणि गुरुत्वाकर्षण यांवर अवलंबून असते. त्याचे उपयोजन दैनंदिन व्यवहारात होत असल्याची अनेक उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत : जहाजांची क्षमता आणि आकार ठरवितांना, सागरी किनाऱ्यावर निरनिराळ्या खेळांसाठी वापरल्या जाणाऱ्या चेंडूची निर्मितीमध्ये, पाणबुडीला विशिष्ठ पातळीवर ठेवण्यासाठी, जलतरणपटू पाणी बाजूस सारण्याकरिता पायांना झडपांचा उपयोग करीत असतांना, द्रव पदार्थांची घनता मोजण्याऱ्या उपकरणात, खडकांची घनता मोजण्यासाठी, द्रवकाटा वापरामध्ये, दूधकाटा वापरात इत्यादी. बर्फ पाण्यावर तरंगतो कारण बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते, त्यामुळे आर्किमिडीज तत्त्व येथेही लागू पडते. उडणाऱ्या मोठ्या फुग्यांचे नियंत्रणही उष्ण हवेचे प्रमाण नियंत्रित करून केले जाते, यामध्येही याच तत्त्वाचा वापर केला जातो. माशामधे पोहण्यासाठी पिशवीतील हवा कमी-जास्त करून पाण्याच्या वर किंवा खाली जातात, येथे सुद्धा आर्किमिडीज तत्त्वाचा वापर होतो.
टॉरेली यांनी १७९२ मध्ये व हाइबेर्ग यांनी १८८० मध्ये आर्किमिडीज यांच्या सर्व लिखाणाचे संपादन केले. त्यानंतर १८९७ मध्ये हीथ यांनी वर्क्स ऑफ आर्किमिडीज या ग्रंथात आर्किमिडीज यांचे लेख आधुनिक चिन्हे व खुणा वापरून प्रसिद्ध केले.
कळीचे शब्द : #यूरेका #तरफ #कप्पी
संदर्भ :
- https://studiousguy.com.physics
- https://www.wordhistory.org.azc
- https://mathshistory.st.andrews.ac.uk
- https://www.famousscientists.org.ar
समीक्षक : सुधीर पानसे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.