इवानिएच, हेन्रिक : (९ ऑक्टोबर १९४७).

पोलिश-अमेरिकन गणितज्ञ. त्यांचे अंकशास्त्रातील संशोधन मुख्यतः अविभाज्य संख्यांसाठीची चाळणी पद्धती आणि संमिश्र विश्लेषणातील मूलभूत पद्धती यांबद्दलचे आहे. वैश्लेषिक अंकशास्त्रातील (Analytic Number Theory) फ्रेडलँडर-इवानिएच प्रमेय यांद्वारे त्यांनी गणिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

इवानिएच यांचा जन्म एल्ब्लोंक, पोलंडमध्ये झाला. त्यांनी वॉर्सा विद्यापीठातून (University of Warsaw) पीएच.डी. पदवी संपादन केली (१९७२). त्यानंतर त्यांनी पोलिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या गणितविषयक संशोधन संस्थेत (Institute of Mathematics of the Polish Academy of Sciences) विविध पदांवर काम केले. नंतर अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या (University of Michigan) प्रगत अध्ययन संस्थेत आणि कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठात (University of Colorado Boulder) अभ्यागत-प्राध्यापक म्हणून काही काळ काम केल्यानंतर १९८७ मध्ये त्यांची नियुक्ती गणिताचे प्राध्यापक म्हणून न्यूजर्सीच्या रट्गर्झ विद्यापीठात (University of Rutgers) झाली.

इवानिएच यांनी अविभाज्य संख्यांच्या अभ्यासात पायाभूत मानल्या जाणाऱ्या काही अंकगणिती फलांसाठीच्या अपगामीसूत्रांमध्ये (Asymptotic formulae for arithmetic functions) महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांनी अंकगणिती श्रेढीतील अविभाज्य संख्यांवरही (Prime numbers in arithmetic progression) संशोधन केले. वैश्लेषिक अंकशास्त्रातील (Analytic Number Theory) फ्रेडलँडर-इवानिएच प्रमेयाद्वारे (Friedlander-Iwaniec Theorem) असे सिद्ध होते की, (a2+b4) या नमुन्यात अनंत अविभाज्य संख्या मिळतात. पीटर सारनाक (Peter Sarnak) यांच्यासमवेत काम करून रीमान गृहीतावर (Riemann Hypothesis) नवीन प्रकाश टाकणारे काही सांख्यिकी निष्कर्ष त्यांनी प्रस्थापित केले.

इवानिएच यांनी लिहिलेली टॉपिक इन क्लासिकल ऑटोमॉर्फिक फॉर्म्स (Topics in Classical Automorphic Forms), स्पेक्ट्रल मेथड्स ऑफ ऑटोमॉर्फिक फॉर्म्स (Spectral Methods of Automorphic Forms) आणि लेक्चरर्स ऑन दि रीमानझीटा फंक्शन्स (Lectures on the Riemann Zeta Function) ही पुस्तके अंकशास्त्र आणि संमिश्र विश्लेषण या शाखांच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आहेत.

इवानिएच यांना अनेक प्रतिष्ठेचे मानसन्मान व पुरस्कार मिळाले. त्यात ऑस्ट्रोवस्की पारितोषिक (Ostrowski Prize)-२००१, विश्लेषक अंकशास्त्रातील पायाभूत योगदानासाठी अंकशास्त्रासाठीचे कोल पारितोषिक (Cole Prize)-२००२, अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे गणितातील लक्षणीय संशोधनपर लेखनासाठी दिले जाणारे स्टील पारितोषिक (Steele Prize)-२०११, अंकशास्त्रातील दीर्घकाळ अनुत्तरित असलेले गणिती प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विकसित केलेल्या अभिनव पद्धतींसाठी हाँगकाँग येथील शॉ पारितोषिक (Shaw Prize)- गेर्ड फाल्टिंग्स (Gerd Faltings) या जर्मन गणितज्ञासह विभागून देण्यात आले -२०१५. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेसचे तसेच अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे सदस्यत्व इवानिएच यांना प्राप्त झाले. जॉन फ्रेडलँडर यांच्यासह लिहिलेल्या आणि अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या ओपेरा दि क्रिब्रो (Opera de Cribr, Colloquium Publications Volume 57, 2010) या अविभाज्य संख्यांवरील पुस्तकासाठी एएमएस जोसेफ एल. डूब पारितोषिक (AMS Joseph L. Doob Prize) इवानिएच यांना मिळाले.

संदर्भ:

समीक्षक – विवेक पाटकर

प्रतिक्रिया व्यक्त करा