भूगर्भातील शिलारस (मॅग्मा) भूकवचाला विभंग न होता वरच्या दिशेने ढकलतो, तेव्हा भूकवचाला वरच्या दिशेने बाक येऊन त्याला घुमटाचा आकार प्राप्त होतो, त्यालाच घुमटी किंवा घुमटाकार पर्वत असे म्हणतात. इतर पर्वतांसारखे हे जास्त उंचीचे किंवा तीव्र उताराचे नसले, तरी त्यांना एक अद्वितीय आकार प्राप्त होतो. हे पर्वत गोलाकार व मंद उताराचे असतात. वली पर्वतांसारखे हे केवळ भूपट्टांच्या सीमा भागातच आढळतात असे नाही, तर ते इतर कोणत्याही स्थानी निर्माण झालेले आढळतात. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे भूगर्भातील तप्त शिलारस प्रावरणामधून भूकवचाकडे वर येताना भूपृष्ठाखाली प्रचंड दाब निर्माण होतो, याला जलस्थित प्रेरणा असे म्हणतात. हा दाब जेथे जास्त पडतो, तेथे पृथ्वीचा पृष्ठभाग वर ढकलला जातो; परंतु तेव्हा भूकवचात विभंग होत नाहीत. विशेषत: गाळाच्या खडकांच्या (स्तरित खडकांच्या) थरांत हा दाब खालून वर येत असल्यामुळे भूकवच वरच्या दिशेने फुगत जाते, त्यामुळे तेथे उंच घुमटाकार पर्वतीय भूविशेष निर्माण होतो. तेथील लाव्हारस दीर्घकाळपर्यंत अतिशय सावकाश थंड होऊन त्याचे कठिण खडकात रूपांतर होते. कालांतराने विदारण व क्षरण या क्रियांमुळे माथ्यावरचे आच्छादनाचे खडक झिजून आतले गाभ्याचे अग्निज खडक किंवा रूपांतरित खडक डोंगर माथ्याच्या रूपात उघडे पडतात.
घुमटी पर्वताचे पुढीलप्रमाणे पाच प्रकार पडतात. सामान्य घुमटी पर्वत, लाव्हा घुमटी पर्वत, बॅथोलिथीय घुमटी पर्वत, लॅकोलिथीय घुमटी पर्वत आणि लवणी घुमटी पर्वत. भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल पर्वत रांगेतील केदार घुमटाकार पर्वत शिखर हे घुमटी पर्वताचे एक उदाहरण आहे. संयुक्त संस्थानातील साउथ डकोटा राज्यातील ब्लॅकहिल्स हे डोंगर आजूबाजूच्या सखल मैदानी प्रदेशापेक्षा खूप उंचावलेले असून ते लांबट घुमटाच्या आकाराचे आहेत. त्यांची लांबी १६० किमी. व रुंदी ८० किमी. आहे; मात्र हा घुमट लॅकोलिथ (छत्रक शैल) प्रकाराचा नाही. त्याचा उघडा पडलेला गाभ्याचा भाग ग्रॅनाइट व पेग्मटाइट खडकांचा बनलेला असून रॉकी पर्वताच्या गाभ्यातील अंतर्वेशनाशी त्याचा संबंध असल्याचे दिसते. तसेच दक्षिण उटामधील हेन्री पर्वत छत्रक शैलांच्या अंतर्वेशनामुळे तयार झालेले आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या वायव्य भागात असलेला राउंड पर्वत हा घुमटी पर्वत आहे.
संदर्भ : Lake, Philip, Physical Geography, London, 1959.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.