राजभोज, पांडुरंग नाथुजी : (१५ मार्च १९०५ – २९ जुलै १९८४). महाराष्ट्रातील एक सामाजिक-राजकीय नेतृत्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. ‘बापूसाहेब’ या नावानेही परिचित. गाव नाशिक जिल्ह्यातील कनाशी ( ता. कळवण). मूळ गाव मध्य प्रदेशातील धार. आईचे नाव रेऊबाई. वडील नाथूजीबुवा हे शेती व पारंपरिक चामड्याशी निगडित व्यवसाय करीत. पांडुरंग राजभोज यांचे शालेय शिक्षण कनाशी, कळवण व नंतर धुळे येथील गरुड हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा विवाह गोमाजी गंगाराम पाटोळे यांची मुलगी भोगुबाईशी यांच्याशी झाला. अल्पावधीतच भोगुबाईंचे निधन झाले. पुढे त्यांच्याच लहान बहिणीशी त्यांचा दुसरा विवाह झाला.
राजभोज यांनी सरकारी नोकरीतील जातीयतेला कंटाळून राजीनामा दिला (१९२५). ते पुण्यातील अस्पृश्यता निवारक मंडळाचे सदस्य व चर्मकार परिषदेचे चिटणीस होते (१९२६). महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, तसेच ‘मनुस्मृती’ दहन करण्याच्या ठरावाला त्यांनी पाठिंबा दिला (१९२७). पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला, त्या वेळी झालेल्या दगडफेकीत ते गंभीर जखमी झाले होते (१९२९). पुढे त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात दक्षिण दरवाजाचे नेतृत्व केले (१९३०). याबद्दल त्यांना अटकही करण्यात आली होती.
राजभोज यांनी १९३१ साली पुण्यात ‘भारत दलित सेवाश्रम’ ही संस्था स्थापन केली. त्याचवर्षी नाशिक येथे भरलेल्या मुंबई इलाखा चर्मकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. १९३०-३३ या काळात ते महात्मा गांधींच्या सहवासात आले. इतिहासप्रसिद्ध पुणे करारावर सही करणाऱ्या नेत्यांपैकी राजभोजही एक होते. १९३७ साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या वेळी काँग्रेसने राजभोज यांना आंबेडकरांच्या विरोधात उभे केले, परंतु ते पराभूत झाले. पुढे काँग्रेसमधून ते आंबेडकरांच्या पक्षात सामील झाले. आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनची नागपूरला स्थापना केली (१९४२). राजभोज या फेडरेशनचे सचिव होते. आंबेडकरांच्या प्रयत्नांनी सरकारने राजभोज यांची सहायक भरती अधिकारी (असिस्टंट रिक्रुटिंग ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली (१९४८). मद्रास (चेन्नई) येथे शे. का. फेडरेशनच्या वतीने त्यांना मानपत्र देण्यात आले (२८ ऑगस्ट १९४९). कोलंबो येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत आंबेडकर यांचेसोबत ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी भारतीय बौद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना केली. सोलापूर विभागातील लोकसभेच्या राखीव जागेतून राजभोज यांचा ३५,००० मतानी विजय झाला (२० जानेवारी १९५२). पुढे त्यांनी टोकियोतील (जपान) जागतिक बौद्ध परिषदेत सहभाग घेतला (१९५२). तसेच १९५४ मध्ये कोरिया, जपान, सिलोन (श्रीलंका) व थायलंड येथील बौद्ध परिषदांमध्येही ते सहभागी झाले. त्यांनी ‘दलित बंधू’, ‘समता’ हे मराठी व ‘इंडियन स्टेट्स’ हे इंग्रजी साप्ताहिक चालवले.
राजभोज यांनी १३ एप्रिल १९५५ रोजी फेडरेशनचा राजीनामा देऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५७ मध्ये त्यांनी थायलंडमधील बँकॉक येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. १९५७-१९६२ या काळात आंबेडकरांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी राज्यसभेवर काँग्रेस पक्षातर्फे त्यांची नियुक्ती झाली. १९७४ साली महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, चर्मोद्योग केंद्र, मुलींसाठी ‘कमला नेहरू वसतिगृह’ सुरू केले. दलित व बौद्धांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी अनेक वेळा उपोषणे केली. कोलंबो येथील जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला (१९८२). ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन, व्यक्ती, विचार आणि कार्य’, ‘गांधींच्या कचाट्यातून अस्पृश्यवर्गाची सुटका’, ‘अखिल भारतीय दलित परिषदेचा अहवाल’, ‘सैन्यभरती’ हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत.
पुणे येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- ‘दलित बंधू’, २१ मे १९५१, पुणे.
- फडके, य. दि., ‘आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह’, सुगावा प्रकाशन, पुणे, २०००.
- लोखंडे एन. एस., संपा., ‘श्री बापूसाहेब राजभोज यांचे जीवन व कार्य’, बापूसाहेब राजभोज सत्कार समिती, पुणे, १९५६.
समीक्षक : लहू गायकवाड
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.