संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. वैशिष्ट्यपूर्ण रचना व ऐतिहासिक महत्त्व असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध रंगमंदिर अथवा नाट्यगृह. ते कोल्हापूर या शहरात आहे. केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजेच पूर्वीचे ‘पॅलेस थिएटर’ होय. या नाट्यगृहाचे बांधकाम कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती यांच्या कारकीर्दीत १९१५ मध्ये पूर्ण झाले. १९०२ साली इंग्लडंचे राजे सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहणानिमित्त कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज लंडनला गेले होते. त्यावेळी यूरोपच्या दौऱ्यामध्ये त्यांनी इटलीमधील प्रसिद्ध रोम हे ऐतिहासिक शहर पाहिले. तेथे असलेले रोमन शैलीचे भव्य कॉलॉसिअम (पशूंबरोबरच्या खेळासाठीचे बांधीव प्रेक्षागार) आणि संगीतकांचे नाट्यगृह (ऑपेरा थिएटर) यांची रचना आणि तंत्रज्ञान पाहून अशाप्रकारची इमारत आपल्याकडेही असावी, ही संकल्पना त्यांच्या मनात रूजली.
यथावकाश छत्रपती शाहू महाराजांनी रोमन शैलीचे कलात्मक भव्य नाट्यगृह आणि मध्यभागी सहज दिसू शकेल असे कुस्तीचे मैदान बांधण्यासाठी स्वत:च्या मालकीची कोल्हापूरातील रावणेश्वर तलावाजवळची जागा निश्चित केली. जलपर्णीने भरलेला रावणेश्वर तलाव या बांधकामासाठी बुजवण्यात आला. यासाठी कागलचे पर्यवेक्षक (ओव्हरसीयर) जिवबा कृष्णाजी चव्हाण यांच्याकडून तंत्रशुद्ध आराखडा करवून घेतला आणि बाळकृष्ण गणेश पंडित यांना हे नाट्यगृह बांधण्याचे काम देण्यात आले. अशारीतीने ९ ऑक्टोबर १९१३ रोजी या नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली. यासाठी लागणारे लोखंडी बहाल (गर्डर) त्यांनी परदेशातून आणले. भिंतीचे दगड इथल्याच काळवत्री दगडाचे घडविण्यात आले आणि खिडक्यांचा वरील भाग अर्धगोलाकार ठेवण्यात आला. दोनही मजल्यावरच्या या मोठ्या आकारांच्या खिडक्यांमुळे वायुवीजन सहज होई. याचे छप्पर मंगलोरी कौलांचे आणि त्याला आतून लाकडी पातळ फळ्यांचे आवरण घातलेले होते. ३० फूट × २४ फूट आकाराचा लाकडाचा मजबूत रंगमंच बांधण्यात आला. त्या रंगमंचाखाली साधारण १० फूट खोल खड्डा ठेवून त्यात प्रयोगाच्या वेळी पाणी भरण्यात येत असे; यामुळे रंगमंचावरील कलाकाराचा आवाज नाट्यगृहातील प्रत्येक बाजूस स्पष्ट ऐकू येई. ही पाणी भरण्याची व त्यातील पाणी बाहेर सोडण्याची व्यवस्था पाटाच्या आधारे केलेली होती. या रंगमंचाच्या मागील बाजूस दोन रंगपटगृहेही बांधण्यात आली.
रंगमंचासमोरील जागेत खाशा लोकांसाठी खुर्च्यांच्या रांगा होत्या. त्यांचा अडथळा होणार नाही, अशा तऱ्हेने उंचीवर ओटा बांधून पीट (बैठकव्यवस्था) तयार केले गेले. तेथे सतरंजीवर पुरुष प्रेक्षक व मुलांची बैठकव्यवस्था करण्यात आली. वरच्या बाजूला दोन सज्जे (गॅलरी) बांधण्यात आले. सज्जामध्ये दोनही बाजूला स्त्रियांसाठी राखीव चष्मे (खोल्या) होते. हे इंग्रजी U आकाराचे लाकडी सज्जे दोनही बाजूने रंगमंचाच्या (स्टेजच्या) दिशेने पुढे आलेले होते. या सज्जांच्या मध्यभागी विशिष्ट कोन साधून बाहेरच्या बाजूने मोठे आरसे लावलेले होते. त्यामुळे मंचावरील कलाकार त्या आरश्यांमध्ये कार्यक्रम चालू असताना बहुतांशी रंगमंचाचे प्रतिबिंब पाहू शकत असे. रंगमंचावरील कलाविष्कार पाहताना रसभंग होऊ नये म्हणून या प्रेक्षागारात मध्येच असा एकही खांब येणार नाही अशाप्रकारे त्याची बांधणी करण्यात आली. या नाट्यगृहाच्या मागील बाजूस नाटक मंडळीच्या लोकांच्या निवासासाठी म्हणून एक प्रशस्त बंगला बांधण्यात आला. १४ ऑक्टोबर १९१५ ला या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले. या नाट्यगृहाचे नाव ‘पॅलेस थिएटर’ असे ठेवण्यात आले आणि त्याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या रात्री केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ या संस्थेचा ‘संगीत सौभद्र’ या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला. सर्व खाशा स्वाऱ्या, सरदार, जहागीरदार, इनामदार अशी सर्व प्रतिष्ठित मंडळी या नाटकाला हजर होती. ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा प्रयोग पहाटेपर्यंत रंगला. उद्घाटनाच्या दुसऱ्या रात्री ‘किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी‘च्या ‘संगीत मानापमान’ या नाटकाचा प्रयोग झाला. या नाट्यगृहामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व राजांची पसंती मिळवण्यासाठी हक्काची जागा मिळाली. त्यावेळी वीजेची सोय नसल्याने नाट्यगृहाचा रंगमंच खोबरेल तेलाच्या दिव्यात प्रकाशमान होई. त्यानंतर रॉकेल तेलाच्या मोठ्या चिमण्या वापरात आल्या. त्याहीनंतर एका विंगेपासून दुसरीपर्यंत कापडाची पट्टी ओढून त्यावर आरगिनी आणि डिटमार यांच्या प्रकाशात नाटके होत असत. ही प्रकाशयोजना सुरुवातीस बाबूराव व गणपतराव सासने बंधूद्वय पुरवित असत. आनंदराव पेंटर, बाबूराव पेंटर, शंकरराव गायकवाड, सदाशिवराव जाधव या प्रसिद्ध कलाकारांनी या नाट्यगृहातील रंगभूमीचे नेपथ्य बराच काळ सांभाळले होते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान १ मार्च १९४९ रोजी मुंबई प्रांतात विलीन झाले आणि नाट्यगृह शासनाकडे हस्तांतरित झाले. अनेक वर्षे या नाट्यगृहाचे संवर्धन व व्यवस्थापन ही जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडून सांभाळली जात होती. चित्रपटाचा काळ सुरू झाला, तसे संगीत नाटकांचे प्रेक्षक कमी झाले आणि नाट्यगृह तोट्यात गेले. याच्या देखभालीचा खर्च प्रशासनाला परवडेनासा झाला म्हणून हे नाट्यगृह विक्रीला काढण्यात आले. यावेळी ‘करवीर नाट्य मंडळी’ ही संस्था, महाराष्ट्रातील रंगभूमीचे कलावंत, लेखक, रसिक तसेच गोविंदराव टेंबे, पु. ल. देशपांडे यांसारखे दिग्गज यांनी याविरुद्ध आवाज उठविला. तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्तक्षेपाने हे अरिष्ट टळले.
१५ ऑगस्ट १९५७ रोजी ‘पॅलेस थिएटर’चे ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ असे नामांतर करण्यात आले. यथावकाश हे नाट्यगृह कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील बहुतेक दिग्गज कलाकारांनी या नाट्यगृहात नाटकांबरोबरच गायन, वादन, नृत्य, एकपात्री प्रयोग असे इतरही कलाविष्कारांचे सादरीकरण केले आहे. काळ गेला त्याप्रमाणे या नाट्यगृहाची वेळोवेळी डागडुजी करण्यात आली आणि त्यात याची काही वैशिष्ट्येही नामशेष झाली. दुर्दैवाने ८ ऑगस्ट २०२४ रोजी या नाट्यगृहाला आकस्मिकपणे लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी हा ऐतिहासिक ठेवा पडला. आज या ठिकाणी पुन्हा नाट्यगृहाची उभारणी सुरू आहे.
संदर्भ :
- तळवलकर, गोविंद संपा., केशवराव भोसले जन्मशताब्दी विशेषांक, महाराष्ट्र टाइम्स, १९९०.
- पवार, जयसिंगराव संपा., राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, कोल्हापूर, २००१.
- मराठी नाट्य परिषद, करवीरची नाट्य परंपरा, ५१ वी स्मरणिका, मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूर.
- लोंढे, लक्ष्मणराव शंकरराव, संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले, नाशिक.
- Keer, Dhananjay, Shahu Chhatrapati, A Royal Revloutionary, Bombay, 1976.
- Latthe, Annasaheb , Memoirs of His Highness Shri Shahu Chhatrapati Maharaja, Kolhapur, 1924.
समीक्षण : सुधीर पोटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.