ब्रॉडवेवरील नाट्यगृहे

न्यूयॉर्क शहरातील लोकप्रिय नाट्यगृहांच्या समूहास / परिसरास (डिस्ट्रिक्ट) दिलेली संज्ञा. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ते एक व्यावसायिक रंगभूमीचे प्रमुख केंद्र आहे. तसेच न्यूयॉर्क शहरातील ते एक सर्वांत मोठे पर्यटनस्थळ असून शहराच्या अर्थव्यवस्थेचा मोठा स्रोत आहे. ब्रॉडवे म्हणजे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील सर्वात लांबलचक दक्षिणोत्तर रस्ता असून तो मॅनहॅटनमधून निघून ब्रॉडवे ब्रिजवरून ब्राँक्सपर्यंत जातो. जवळजवळ २१ किमी. मॅनहॅटनमध्ये आणि ३ किमी. ब्राँक्सपर्यंतचा भाग तो व्यापतो. यातील ४१ / ४२ ते ५३ क्रमांकाच्या मार्गावर आणि पश्चिमेकडील ६ व्या ते ८ व्या अव्हेन्यूमध्ये असलेल्या सु. ४० नाट्यगृहांनी हा परिसर भरलेला आहे. त्यामुळेच अमेरिकन रंगभूमीचे माहेरघर अशी ब्रॉडवेची ख्याती आहे आणि त्यांतून ५०० किंवा अधिक प्रेक्षकांकरिताची व्यवस्था आहे.

न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन टाईम्स स्क्वेअरचा भाग ब्रॉडवेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जगभरातील प्रवासी इथे टाईम्स स्क्वेअर बरोबरच प्रामुख्याने ब्रॉडवेवरची नाटके बघायला येत असतात. ह्या परिसरामध्ये जगभर गाजणाऱ्या संगीतिका आणि नाटकांचे प्रयोग होतात. एकेकाळी हा परिसर डच लोकांची व्यापारी पेठ होती. त्याकाळी इथे नाट्यप्रयोगांवर किंवा एकूणच मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंदी होती. न्यूयॉर्कमध्ये ‘बेगर्स ऑपेरा’ नावाची पहिली व्यावसायिक संगीतिका (ऑपेरा) १७५० साली सादर झाली. तोपर्यंत न्यूयॉर्कमध्ये नावाजलेले असे नाट्यगृह नव्हते, तेव्हा अभिनेते-व्यवस्थापक वॉल्टर मरे आणि टॉमस कीन यांनी नॅसऑ पथावर (स्ट्रीट) निवासी नाटक कंपनी काढली. त्यांनी काही शेक्सस्पिरियन नाटके आणि संगीतिका सादर केल्या. पुढे रंगभूमीच्या चळवळीला चालना मिळून रिचर्ड रॉजर्स व आस्कर हॅमरस्टाईन यांनी तिचा चित्रपट निर्मितीसाठी उपयोग केला. त्यानंतर १८४८ साली ‘पार्क थिएटर’ हे न्यूयॉर्कमधील पहिले मान्यताप्राप्त नाट्यगृह सुरू झाले. १८६६ साली सुरू झालेल्या ‘निब्लो गार्डन’ ह्या  ३२०० आसने असलेल्या नाट्यगृहाचे व्यवस्थापक विल्यम व्हिटले यांना ब्रॉडवे संगीतिकांचा जनक मानतात. ब्रॉडवे परिसर म्हणजे रंगभूमीच असे समीकरण झाल्यामुळे नाट्यव्यावसायिकांचा तो अड्डाच झाला. तेव्हापासून तिथे व्यावसायिक नाटके आणि संगीतिका मोठ्या दिमाखात सुरू आहेत. नाट्यविषयक स्तंभलेखकाने १९०१ मधील येथील बर्फाच्या वादळानंतर ब्रॉडवे मार्गाला धवलमार्ग ही संज्ञा दिली. त्यामुळे ब्रॉडवेचे टोपणनाव ‘ग्रेट व्हाईट वे’ असे झाले. अमेरिकन रंगभूमीवरील यूजीन ओनील, आर्थर मिलर, टेनेसी विल्यम्स यांसारख्या महत्त्वाच्या नाटककारांची नाटके येथे नेहमीच केली जातात.

ब्रॉडवे ही अमेरिकेची मुख्यधारा रंगभूमी मानली जाते. इथे जगभरातल्या मान्यताप्राप्त नाटककारांची आणि दिग्दर्शकांची नाटके होतात. हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये अभिनय करून लोकप्रिय झालेले अभिनेते वेळात वेळ काढून येथील नाटकात काम करतात, यावरूनच ब्रॉडवेची लोकप्रियता ध्यानात येते.

समीक्षक : सु. र. देशपांडे