गट किंवा विभंग पर्वत. दोन खचदऱ्यांच्या मधला भाग की, ज्याचे कडे उंच असतात व माथा सपाट असतो, अशा भूविशेषाला किंवा खचदरीच्या दोन बाजूंस उंच कडे असणाऱ्या भूविशेषाला ठोकळ्या किंवा गट पर्वत म्हणून ओळखले जाते. भूकवचात दाब निर्माण झाल्यामुळे वली पर्वत निर्माण होतात, तर ताण निर्माण झाल्यामुळे ठोकळ्या पर्वताची निर्मिती होते. ही एक भूशास्त्रीय रचना असून भूसांरचनिक बलांमुळे कठिण खडकयुक्त भूकवचात ताण निर्माण होऊन असे पर्वत निर्माण होतात. भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार सामान्यपणे दोन भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा भूकवचात ताण निर्माण होऊन तेथे विभंग (प्रस्तर) होतात. तसेच इतर ठिकाणीही भूसांरचनिक बलामुळे भूकवचात ताण निर्माण होऊन विभंग होतात. भूककवचात विभंगरेषेवर उत्थान आणि विचलनाची (कलतेपणाची) क्रिया घडून येते. उत्थान क्रियेमुळे निर्माण झालेल्या पर्वताचे दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात आणि त्यांचे माथे सपाट असतात; तर विचलन क्रियेमुळे गट पर्वताचा खचदरीच्या दिशेने असणारा भाग कड्यासारखा उभ्या उताराचा असून त्याच्या विरुद्ध बाजूस सौम्य उतार असतो. कित्येक मोठे पर्वत खडकातील विभंग क्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेले आहेत. कधीकधी भूकवचातील जवळजवळच्या ठिकाणी दोन समांतर विभंग निर्माण होऊन दोन्ही विभंगप्रतलांमधला भाग वर उचलला जातो किंवा खाली सरकतो वा खचतो. मधला भाग वर येऊन तयार झालेल्या लांबट कटकाला ठोकळ्या पर्वत किंवा हॉर्स्ट (उंचावलेला भूभाग) आणि मधला भाग खाली खचला असल्यास त्या भागास खचदरी (ग्रॅबेन) असे म्हणतात. ग्रॅबेन म्हणजे दोन समांतर विभंगांच्या दरम्यानचा खाली खचलेला भाग, तर हॉर्स्ट म्हणजे दोन समांतर विभंगांच्या दरम्यानचा जमिनीचा उंचावलेला भाग होय. तीव्र उतार आणि सपाट किंवा पठारी माथा ही गट पर्वताची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

ठोकळ्या पर्वताची निर्मिती तीन प्रकारे होत असते. दोन सामान्य विभंगांच्या मधला भाग वर उचलला गेल्यामुळे हॉर्स्टची निर्मिती होते. अशा ठोकळ्या पर्वताचा माथा सपाट असतो आणि दोन्ही बाजूचे उतार तीव्र स्वरूपाचे असतात. काही वेळा विभंगाच्या दोन्ही बाजूंचे भाग खाली खचतात व मधला भाग पर्वताच्या स्वरूपात तसाच स्थिर राहतो. तसेच दोन विभंगांच्या मधला भाग खाली खचतो आणि बाजूचे भाग हॉर्स्ट किंवा ठोकळ्या पर्वताच्या स्वरूपात तसेच उंच राहतात. मधला खचलेला भाग म्हणजे खचदरी होय. काळाच्या ओघात विदारण आणि क्षरण (झीज) क्रियेमुळे मूळ ठोकळ्या पर्वताचे स्वरूप बदलून जाते.

भारतात विंध्य आणि सातपुडा या दोन पर्वतांच्या (हॉर्स्टच्या) दरम्यान असलेले नर्मदा नदीचे खोरे म्हणजे एक खचदरी आहे. दक्षिण भारतात पश्चिम किनारी मैदानाचा काही भाग असाच जमीन खचून तयार झालेला आहे. त्यामुळे त्यालगतचा सह्याद्री पर्वत हाही गट पर्वत मानला जातो.

आफ्रिकेतील ‘ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली’ (ईस्ट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली) ही जगातील सर्वांत विस्तृत खचदऱ्यांपैकी एक असून तिची लांबी सुमारे ६,४०० किमी. आणि सरासरी रुंदी ४८ ते ६४ किमी. आहे. विभंगप्रतल तिरपे असल्यास वर सरकणारे खडकांचे गटही तिरपे झालेले असतात. संयुक्त संस्थानांच्या कॅलिफोर्नियातील सिएरा नेव्हाडाच्या पर्वतरांगा तिरप्या असून त्यांची लांबी ६५० किमी. आणि रुंदी ८० ते १२० किमी. आहे. या ठोकळ्याची पूर्व बाजू उंचावली जाऊन त्याचा माथा समुद्रसपाटीपेक्षा ४,००० मी. उंच गेला आहे. हा ठोकळा मुख्यत: या प्रदेशात पूर्वी अंतर्वेशित झालेल्या ग्रॅनाइटाचा बनलेला असला, तरी मूळच्या सिएरा नेव्हाडाच्या पर्वतरांगा ज्या भूद्रोणीतील गाळांच्या वलीकरणाने तयार झाल्या, त्या थरांचे अवशेषही त्याच्यात दिसून येतात. आफ्रिका आणि आशिया मायनर येथील खचदऱ्या व त्यांच्या दोन्ही काठांवरचे डोंगर, यूरोपातील ऱ्हाईन नदीची खचदरी व तिच्या काठावर असणारे ब्लॅक फॉरेस्ट व व्होजेस पर्वत हे गट पर्वताचे प्रातिनिधिक उदाहरण आहेत.

संदर्भ : Monkhouse, F. J., Principle of Physical Geography, New York, 1970.

समीक्षक : शंकर चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.