शिवतरकर, सीताराम नामदेव : (१५ जुलै १८९१ – २९ मार्च १९६६). महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. ‘शिवतरकर गुरुजी’ म्हणूनही परिचित. मूळ गाव सातारा जिल्ह्यातील शिवथर. सीताराम शिवतरकर यांनी व्हर्नाक्युलरची (स्थानिक प्रादेशिक भाषा) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर (१९०९) परळ (मुंबई) येथील एका शाळेत मुख्य शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांना मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली (१९२६). पुढे ते सेवानिवृत्त झाले (१९४९). त्यांना विठाबाई आणि वेणूबाई या त्यांच्या दोन सहचारिणींची मिळून चार मुले आणि दोन मुली अशी एकूण सहा अपत्ये होती.
शिवतरकर हे दलित चळवळीतील एक महत्त्वाचे शिलेदार होते. राजर्षी शाहू महाराजांनी शिवतरकरांना पत्र लिहून अस्पृश्य समाजाविषयी आपले विचार व्यक्त केले होते (१९१९). नागपूर येथील अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचे शिवतरकर प्रमुख आयोजक होते (१९२०). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी व खाजगी चिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले (१९२२-२३). तसेच ‘मूकनायक’ या पाक्षिकाचे ते व्यवस्थापक आणि बहिष्कृत हितकारिणी सभेचे मुख्य सचिव होते (१९२४). आंबेडकरांनी त्यांचा पंचमंडळात देखील समावेश केला होता. महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहात ते सहभागी होते (१९२७). चवदार तळ्याचे पाणी प्राशन केल्यामुळे आंबेडकरांच्या बरोबरीने ज्या चार लोकांवर खटला भरला होता, त्यांमध्ये शिवतरकरांचा समावेश होता. समाज समता संघातर्फे चालवलेल्या कौटुंबिक सहभोजन या उपक्रमाचा भाग म्हणून शिवतरकर यांच्या घरी महार, मराठा, कायस्थ, ब्राह्मण इ. जातींतील लोकांनी सहभोजन केल्यामुळे चांभार जातीच्या लोकांनी घातलेल्या बहिष्काराला त्यांना सामोरे जावे लागले (१९२८).
शिवतरकर हे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह व कोषाध्यक्ष होते. तसेच बेळगाव जिल्हा बहिष्कृत सामाजिक परिषद अधिवेशनाचे ते पहिले अध्यक्ष होते (१९२९). महात्मा गांधी-आंबेडकर भेटीचे प्रत्यक्षदर्शी व पुणे कराराचे ते साक्षीदार होते (१९३२). वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषद (अकोला, ६-७ मे १९३३) आणि कापुसतळणी येथील वऱ्हाड चांभार परिषदेचे ते अध्यक्ष होते (९ मे १९३३). मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथे पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी सभा घेतली होती (१० मे १९३३). पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना तिकीट (उमेदवारी) न मिळाल्याने व अंतर्गत कलहांमुळे ते दलित चळवळीपासून दूर गेले (१९३७). पुढे काँग्रेस पक्षातर्फे मुंबई विधानसभेवर ते निवडून आले (१९५२).
शिवतरकर यांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’ या तीन वर्तमानपत्रांतून अस्पृश्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर न्याय हक्कासंबंधी अनेक लेख लिहिले. पंढरपूर येथील लक्ष्मण कृष्णाजी पेवेकर धर्मशाळेच्या ट्रस्टचे सदस्य, तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टमध्ये ते कार्याध्यक्ष होते. त्यांनी रोहिदास समाज पंचायत संघाची स्थापना केली (१९५२). या संघाचे १९५२ ते १९६३ पर्यंत ते अध्यक्ष होते. त्यांनी मुंबईमध्ये रोहिदास पंचायत संघाच्या सर्वत्र शाखा स्थापन केल्या, तसेच समाज शिक्षण समिती, प्रौढ साक्षरता प्रसार, आर्य समाज आणि हरिजन सेवक संघाचे कार्य अत्यंत तळमळीने केले.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- खैरमोडे चां. भ., ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’, खंड : २, सुगावा प्रकाशन, पुणे, २०१७.
- शिवतरकर, शंकर, ‘सीताराम नामदेव शिवतरकर’, प्रदीप प्रकाशन, मुंबई, १९९१.
- सावंत, इंद्रजीत; पाटील, देविकाराणी, ‘राजर्षी शाहू छत्रपती : रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र’, सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र, कोल्हापूर, २०१४.
समीक्षक : प्रशांत गायकवाड
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.