देवरुखकर, बाळकृष्ण जानुजी : (३० ऑक्टोबर १८८४ ?- ८ जानेवारी १९४७) महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते. त्यांचा जन्म खडकी येथे झाला. त्यांचे वडील जानुजी तानुजी देवरुखकर हे लष्कराच्या आठव्या पलटणीत अधिकारी होते. सामाजिक क्षेत्रात शिवराम जानबा कांबळे यांच्यासोबत अस्पृश्य समाजामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. चांभार समाजामध्ये आधुनिक विचार रुजविण्यासाठी जानुजी देवरुखकर सातत्याने प्रयत्नरत होते. हा सामाजिक कार्याचा वारसा बाळकृष्ण देवरुखकरांना कुटुंबातूनच मिळाला. त्यांना मराठी व इंग्रजीतून शिक्षण मिळाले. पुढे ते लष्कराच्या १२८ व्या पलटणीत मुख्य लिपिक (हेड क्लार्क) पदी रुजू झाले. कालांतराने या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली.

देवरुखकर यांनी १९२६-२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. कम्युनिस्ट चळवळीतही ते सक्रिय होते. गिरणी कामगारांच्या प्रचंड मोठ्या संपात ते अग्रभागी होते (१९२८). काँग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनात त्यांचा सहभाग होता (१९२८). कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग घेऊन देवरुखकरांनी खादीचा स्वीकार केला. भुलाभाई देसाई व इतर काँग्रेस सहकाऱ्यांसोबत आर्थररोड कारागृहात त्यांनी तुरुंगवास भोगला (१९३१). पुन्हा सत्याग्रह करून ते तुरुंगात गेले (१९३२). चांभार समाजाच्या सामाजिक उत्कर्षासाठी ‘मुंबई इलाखा चर्मकार परिषद’ भरविण्यात त्यांचा सहभाग होता, त्या परिषदेचे ते चिटणीस होते (१९३२). राजा-मुंजे करार घडवून आणण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती (१९३२). अस्पृश्य समाजाचा उत्कर्ष काँग्रेस करील, असा त्यांना विश्वास होता. महात्मा गांधी व पंडित नेहरू यांना मानपत्र दिले. ? काँग्रेस पक्षातील काही नेत्यांसोबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला.

देवरुखकर यांनी १९३६ ते १९३९ पर्यंत स्वतंत्रपणे सार्वजनिक क्षेत्रात काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात  त्यांनी मुंबई असेंब्लीची निवडणूक लढवली; तथापि ते पराभूत झाले (१९३७). नंतर आंबेडकरी चळवळीत प्रवेश करून त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनतर्फे निवडणूका लढवल्या व निवडून आले. १९३९ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षातर्फे त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डिलाईल रोड भागातून लढविली. मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी शिक्षण, सुधारणा आणि बाजार या समित्यांवर चांगले कार्य केले. ५ एप्रिल १९४० साली मुंबई महानगरपालिकेच्या निरनिराळ्या खात्यातील आठ हजार लोकांनी संप पुकारला होता. यामध्ये देवरुखकर यांचा उल्लेखनीय सहभाग होता.

देवरुखकर यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून विविध विषयांवर लेखन केले. त्यांनी ‘बहिष्कृत मित्र’ नावाचे वृत्तपत्र काढले. तसेच ‘भारत’ नावाचे मराठी साप्ताहिक सुरू केले. त्याचा काही भाग गुजराती भाषेत प्रसिद्ध होत असे. ‘धर्माचे जीवित’ (‘भारत’ ,२६ सप्टेंबर १९३२), ‘कलेक्टर- कारकून अस्पृश्य मतदारांना ओळखणार कसे?’, देशांतर, नामांतर आणि धर्मांतर केलेले अस्पृश्य बंधू (‘नवा काळ’, २८ ऑगस्ट १९३५), डॉ. आंबेडकर यांची जयंती (‘भारत’, १७ एप्रिल १९३२), ‘पंढरपूरचा विठोबा कोण आहे ?’ (‘भारत’, ४ डिसेंबर १९३२), ‘चांभार लोक बौद्ध धर्म स्वीकारणार’, ‘माझे मनोराज्य’, ‘आंबेडकर सैन्य’ इत्यादी विविध विषयांवर त्यांनी केलेले लेखन प्रसिद्ध आहे.

देवरुखकर यांनी मुंबईमध्ये कामगारांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. ते स्त्रीवादी विचारांचे कार्यकर्ते असल्यामुळे कामगार स्त्रियांचे प्रश्न ते अत्यंत सहानुभूतिपूर्वक हाताळत होते. कामगारांच्या वस्त्यांमध्ये जाऊन शेड्युल कास्ट फेडरेशनचा प्रचार आणि प्रसार करण्याचे त्यांनी मोठे कार्य केले.

मुंबई येथे त्यांचा खून झाला. दलित चळवळीत त्यांचा मृत्यू दिन ‘हुतात्मा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

संदर्भ :

  • केळशीकर, वि. ल., ‘हुतात्मा देवरुखकर’, मुंबई. १९४८.
  • खैरमोडे, चां. भ., ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’, खंड : ३, सुगावा प्रकाशन, पुणे, २०१३.

समीक्षक : प्रशांत गायकवाड


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.