निसर्ग संवर्धनाची प्राचीन परंपरागत पद्धत. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी भटकी जीवनशैली सोडून मानव जेव्हा शेती करू लागला; त्या वेळी जंगलतोड जास्त प्रमाणात होऊ लागल्यामुळे वस्ती व गावाजवळील जंगलाचा काही भाग राखून ठेवण्यात आला. या भागालाच लोक श्रद्धेने देवराई (Sacred Groves) संबोधू लागले. लोकांनी देवावरच्या श्रद्धेने, देवाचा कोप होण्याच्या भीतीने या जंगल क्षेत्रांना संपूर्ण संरक्षण दिले. त्यामुळे शेकडो वर्षे हे जंगलांचे तुकडे संरक्षित राहून निसर्ग संरक्षण साधले गेले.

डॉ. धर्मानंद कोसंबी यांनी देवरायांचा पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र आणि भारतविज्ञान या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. देवरायांमधील देवता या मातृदेवता असतात.  उदा., कालकाई, कालिकामाता, वाघजाई, मरीआई, जुनाई, भैरवीदेवी इत्यादी. कधीकधी नरदेवही पाहायला मिळतात. उदा., भैरोबा,  शंभू,  भैरवनाथ. देवराई  हे गावाचे  सांस्कृतिक  केंद्र असून गावाचे / देवीचे उत्सव सार्वजनिकरित्या देवराईमध्ये साजरे केले जातात.

वीरगळ : प्राचीन काळी निसर्गात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या दोन टोळ्यांमध्ये लढाई, भांडणे होत. ह्यात एखाद्या टोळीचा सेनापती धारातीर्थी पडे,  बहुतांशी मारले जात. अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कोरलेली शिळा /स्मारक शिळा म्हणजे वीरगळ. वीरगळावरील मानवी आकृत्या ओबडधोबड असतात. असे वीरगळ देवराईच्या ठिकाणी, युद्धभूमी ठिकाणी, ज्या गावात ते वीर राहत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. भारतात सुमारे १. ५ लाख देवराया आहेत. जवळपास प्रत्येक राज्यात त्या आहेत. सगळ्यात जास्त देवराया हिमाचल प्रदेशात असून त्यानंतर कर्नाटक व  महाराष्ट्र आढळून येतात. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व देवराया सह्याद्री परिसरात, कोकण आणि मावळ भागांत तसेच घाट माथ्यावर आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (१९९९) अहवालानुसार  महाराष्ट्रात सु. ३६०० च्या वर देवराया नोंदविल्या आहेत. देवराईचा विस्तार हा एका झाडाच्या देवराईपासून ते एक ते शंभर एकरपर्यंत असू शकतो. सर्वसाधारण गावाच्यामध्ये /सीमेवर असलेली देवराई लहान असते.

देवराईचे महत्त्व तिच्या आकारमानापेक्षा त्यात आढळणाऱ्या प्रजातींवर अवलंबून असते. ती एक शिखर परिसंस्था (Climax Ecosystem) आहे. ज्या परिसरात देवराई असेल त्या परिसरातील ती सर्वोच्च प्रकारची नैसर्गिक अवस्था असते. ती एक जनुक पेढी (gene bank), बीज पेढी (seed bank) आणि जल पेढी (तोय निधी; water bank) सुद्धा आहे. तिथे बरेच उगम पावणारे झरे, जलप्रवाह बारमाही असतात. काही प्रकारच्या वनस्पती तसेच प्राणी आता केवळ देवरायांतच आढळतात. देवराई ही समृद्ध वनश्री वारसा आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य देवराया निमसदाहरित आणि आर्द्र पानझडी (semi evergreen and deciduous) जंगल प्रकारच्या आहेत.

निम सदाहरित जंगल प्रकारांमध्ये आंबा, जांभूळ, हिरडा ,बेहडा, सातवीण, लोध्र, फणसाडा, कळंब, हेदू, ऐन, काटेसावर, वावळ, चारोळी, मोह, पायर, उंबर, वारंग, भेर्ली माड, वारस, शिवण, पळस, पांगारा, बाहवा, आपटा, बिब्बा, गोळ, मोई, असाणा हे वृक्ष आहेत.  देवरायांमध्ये प्रचंड वाढलेले महावेल उदा., कांचनवेल, पळसवेल, गारंबी, सोनजाई, पिळूक मडवेल, शिकेकाई, करंजवेल, करवंदवेल, पेटकूळ पाहायला मिळतात. तसेच झुडूपवर्गीय माकड-लिंबू, काळा कुडा, पांढरा कुडा, रामेठा, फांगळी, कारवी, अमृता, निचर्डी, बामणीसुद्धा आढळतात.

डोंगराच्या तीव्र उतारावरील जागेत जिथे वृक्ष फारसे वाढू शकत नाहीत, अशा ठिकाणी धायटी, कारवी उगवतात. चिल्हार, शिकेकाई व शतावरी अशा काटेरी दाट्या तयार होतात. हा छोटे प्राणी व पक्ष्यांचा सुरक्षित आसरा असतो.

औषधी वनस्पती : हिरडा, बेहडा, आवळा, बाहवा, नरक्या, मंजिष्ठ, शतावरी, कुडा, रामेठा, कळलावी, डिकेमाली, टेटू, राळधूप, देवसावर व  गुळवेल देवरायांमध्ये आढळतात.

काही प्रदेशनिष्ठ आणि नामशेष होण्याचा धोका असलेल्या वनस्पती फक्त देवरायांमध्ये आढळतात. कंदमुळे, गवताच्या जाती, जमिनीवरील वनस्पती, बुरशीचे प्रकार, ऑर्किड्सचे प्रकार, तसेच प्राणी पक्षी कीटक फुलपाखरे यांच्या अनेक दुर्मीळ जाती केवळ देवराईत पाहायला मिळतात. हा नैसर्गिक वारसा जतन करण्यासाठी शास्त्रीय निकषांनुसार त्यांचे महत्त्व पटवून द्यायला हवे.

संदर्भ :

  • Deshmukh and others, Conservation and Development of Sacred Groves of Maharashtra, B. N. H. S., Mumbai, 1999.
  •  Kosambi, D. D., Myth and Reality : Studies in the Formation of Indian Culture, Pune, 1962.
  •  Malhotra Kailash and others, Sacred Groves in India, New Delhi, 2007.
  • Vartak, V. D., Gadgil, Madhav, Focus on Sacred Groves and Ethnobotany, Mumbai, 2004.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content