देवराई म्हणजे स्थानिकांनी श्रद्धेने, भीतीने, देवाच्या नावाने, वर्षानुवर्षे राखलेलं निसर्गनिर्मित जंगल. असा समृद्ध नैसर्गिक वारसा पिढ्यान् पिढ्या जतन केला गेला आहे. त्याचे पावित्र्य देवराईत गेल्यावर अनुभवायला मिळते. वृक्षवेलींची गर्द दाटी, वैशिष्ट्यपूर्ण प्राणिपक्ष्यांची उपस्थिती, पाण्याचा स्रोत, देवदेवता, वीरगळ अशी काही वैशिष्ट्ये पाहावयास मिळतात.

परंतु, सध्या विविध कारणांमुळे, विकासाच्या रेट्यामुळे, होत असणाऱ्या नैसर्गिक र्‍हासाच्या पार्श्वभूमीवर या देवरायांना धोका निर्माण झाला आहे. त्या-त्या प्रदेशांतील जैवविविधता तिथे दिसली तरी तिथे  होत असलेला नाशसुद्धा पाहण्यात येतो. देवरायांभोवतीचा प्रदेश उघडाबोडका झाल्याने आतील प्राणी पक्ष्यांना ये-जा करण्यासाठी लागणारे हरितपट्टे (कॉरिडॉर्स) नाहीसे झाले आहेत. देवराईचे क्षेत्रही हळूहळू घटत चालले आहे. अशा वेळी त्या राखून त्यांना पुनरुज्जीवित करणे गरजेचे आहे.  त्याचे शास्त्रीय महत्त्व व उपयुक्तता पटवून देऊन त्याचे जतन करणे स्थानिक लोकांमार्फत शक्य होईल. याचा फायदा स्थानिक लोकांना होईल. विविध प्रकारच्या पर्यावरणीय सेवा मानवाला देवराईमुळे वर्षानुवर्षे मिळत आहेत. भूजल पुनर्भरण, वर्षभर वाहणारे झरे, अनेक रोगांवर औषध पुरविणाऱ्या वनस्पती, शेतातील किडे, उंदीर यांवर नियंत्रण ठेवणारे साप व  घुबड यांसारखे प्राणी, भात खाचरांसाठी लागणारा पालापाचोळा म्हणजे राब इत्यादी अनेक फायदे मानवाला या देवराया पुरवित असतात. तापमान नियंत्रण करण्याचे  अत्यंत महत्त्वाचे काम देवरायांमुळे शक्य होते.

इतकी वर्षे जतन केलेला वारसा यापुढेही शास्त्रीय आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून जपावा, यांसाठी चर्चा व बैठका, शिबिरे भरविण्यात यावीत, रोपवाटिका तयार करण्यात याव्यात.

देवराई संरक्षण :१. बांबू व काही जंगली काटेरी झाडे, अडुळसा, निरगुडी वापरून कुंपण तयार करावे,२. देवराईच्या बाहेरील मोकळ्या जागेत (बफर झोनमध्ये) देवराईत असलेल्या झाडांची लागवड करावी,३. लोकसहभागातून सामाजिक कुंपणही तयार व्हायला हवे म्हणजे नेहमी वापरात असलेल्या देवराई मधून जाणाऱ्या तीन-चार पायी वाटांपैकी एकीचाच वापर करावा. गुरांपासून तसेच वणवा व आगीपासून देवराईला सह-संरक्षण मिळावे.

देवराईतील माती व पाणी संधारण : उतारावर दगडी  बांध घालून, दगडी चर बांधून, गरज पडतील तसे छोटे बांध घालावेत. त्याच्या भोवताली झाडांची लागवड करावी,  त्यामुळे चरांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा या रोपांना फायदा होईल. गवत लावल्यास गवताच्या मुळांनी माती पकडून जमिनीची धूप कमी होईल. त्यामुळे दगडांच्या प्रत्येक ओळीमागे माती साचेल व त्यांमध्ये गवताचे बी अडकून राहील व तिथे रुजेल. पावसाचे पाणी मुरण्यास सुरुवात होईल. बीज अंकुरण्याची क्षमता वाढेल तसे कीटक, सरडे, पक्षी इतर प्राण्यांची व पक्ष्यांची संख्या हळूहळू वाढेल. अशा तऱ्हेच्या सोप्या पद्धती वापरून लोकसहभागातून देवराईचे पुनरुज्जीवन करता येऊ शकते.

देवराई स्वच्छता  अभियान : देवराईमध्ये वनस्पतीच्या पुनर्निर्मितीला (regeneration) खूप महत्त्व आहे. देवराईमध्ये टाकलेल्या मानवनिर्मित कचऱ्याने पुनर्निर्मिती खंडित होते, त्यामुळे देवराईमध्ये उत्सवाच्या दरम्यान किंवा इतर कारणांनी मानवनिर्मित कचरा होऊ न देणे व झाल्यास तो वेळच्या वेळी काढून टाकणे आवश्यक आहे.

वारसा स्थळ : जैवविविधता कायद्याद्वारे देवराई हे वारसा स्थळ (हेरिटेज साईट) म्हणून घोषित करावे. असे झाल्यास देवराईतील प्राणी, पक्षी, दुर्मीळ वनस्पती, औषधी वनस्पती आणि इतर घटक यांना अभय मिळेल. देवराईचा होत असलेला ऱ्हास थांबायला मदत होईल  आणि त्या चिरंतन वापरासाठी सुयोग्य होतील.

संदर्भ :

  • Malhotra, Kailash and others, Sacred Groves in India, New Delhi, 2007.
  • Kosambi, D. D., Myth and Reality : Studies in the Formation of Indian Culture, Pune, 1962.
  • Vartak, V. D., Gadgil Madhav, Focus on Sacred Groves and Ethnobotany, Mumbai, 2004.
  • D. K. Kulkarni, Journal of Asian Agri-History Volume 14, Devrahati : An Asiant Concept of Biodiversity Conservation, Pune, 2010.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा