वार्ष्णेय, उमेश : (२६ ऑक्टोबर १९५७). भारतीय रेणवीय जीवशास्त्रज्ञ. त्यांना भारताच्या सर्वोच्च सन्मानांपैकी वैज्ञानिकांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कांपैकी विज्ञान श्री या पुरस्काराने २०२४ रोजी सन्मानित करण्यात आले आहे. ई कोलायमधील प्रथिन संश्लेषण आणि डीएनए दुरुस्ती तसेच मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली यांचे तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.
वार्ष्णेय यांचा जन्म उत्तर प्रदेश येथे झाला. जिवाजी विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली (१९७५). जी बी पंत ॲग्रिकल्चर ॲड टेक्नॉलॉजी विद्यापीठातून पदव्युत्तर केल्यावर (१९७९) ते संशोधनासाठी कॅनडाला गेले. तेथे आल्बर्टा हेरिटेज फाउण्डेशन फॉर मेडिकल रिसर्च येथे पदवीधर अध्यापन सहाय्यकपदी असताना त्यांनी कलगेरी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली (१९८५). त्यानंतर त्यांनी जॉन हॅन्स लॅबोरेटरी व्हान डे सॅन्डे येथील विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन केले. भारतात परतल्यावर ते भारतीय विज्ञान शिक्षण संस्था, बंगळुरुमधील सूक्ष्मजीवशास्त्र आणि पेशी जीवविज्ञान विभागात सहायक प्राध्यापक पदावर रुजू झाले. नंतर तेथेच त्यांना सह प्राध्यापक (१९९७) आणि प्राध्यापक (२००२) अशी वरिष्ठ पदे देण्यात आली. तसेच ते जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड रिसर्चचा कार्यभारही सांभाळत आहेत.
वार्ष्णेय यांच्या प्रयोगशाळेत प्रथिन संश्लेषण आणि डीएनए यांच्या यांत्रिक पद्धतीवर संशोधन केले जाते. प्रथिन संश्लेषणात रायबोसोम पुनर्वापर प्रथिन तयार झाल्यावर रायबोसोम संदेशवाही आरएनएला (mRNA) जोडलेले असते. याला प्रथिन समाप्ती समन्वय (Post termination complex) असे नाव आहे. रायबोसोम पुनर्वापर होताना दंडाणू (eubacteria) मध्ये रायबोसोम पुनर्वापर घटक (RRF) आणि विस्तार घटक (elongationfactor) यांच्या संयुक्त येण्याने रायबोसोम मुक्त होतो. प्रथिन संश्लेषणातील विविध पर्यायांवर या प्रयोगशाळेत संशोधन केले जाते. रचना आणि कार्यवाहक आरएनए (tRNA) सहसंबंध दंडाणूमधील वाहक आरएनएचा प्रति संकेताबरोबर असलेला संबंध शोधण्यात वार्ष्णेय यांच्या प्रयोगशाळेने महत्त्वाचे संशोधन केलेले आहे.
सस्तन प्राण्यांच्या तंतुकणीकेतील तीन घटक दंडाणूंमधील कार्य यांवरील त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरलेले आहे. त्यातील एका घटकामध्ये ३७ ॲमिनो आम्ले घटकाऐवजी दंडाणूमध्ये सामावली जातात, असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलीचा जीनोम G+C ने समृद्ध आहे. त्यामुळे त्यातील सायटोसीन निसर्गत: यूरासीलमध्ये बदलले जाते. या बदललेल्या यूरासीलची दुरुस्ती होते. या प्रकारास न्यूक्लिओटाईड एकक्सिऑन रीपेअर म्हणण्याची पद्धत आहे. या पद्धतीचा अभ्यास झाल्यावर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलीच्या विरुद्ध नवी उपाययोजना आणि प्रतिबंधक लस बनवणे शक्य होईल असा वार्ष्णेय यांचा विश्वास आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून त्यांना जे.सी.बोस नॅशनल अधिछात्रवृत्ती मिळाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रीय मासिकामधून त्यांनी सहाहून अधिक शोधनिबंध केवळ क्षयरोगाच्या जीवाणूवर प्रसिद्ध केलेले आहेत.
इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी याचे ते सदस्य आहेत. त्यांना नॅशनल बायोसायन्स ॲवार्ड फॉर करियर डेव्हलपमेंट, शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक, जी.एन.रामचंद्रन सुवर्णपदक,पी.एस.शर्मा मेमोरियल ॲवार्ड आणि नोव्हो नॉर्डिस्कचे लाइफ सायन्स रिसर्च ॲवार्ड मिळाले आहेत. सध्या ते भारतीय विज्ञान शिक्षण संस्थेच्या जीवविज्ञान विभागाचे अध्यक्ष आहेत.
कळीचे शब्द : #प्रथिन संश्लेषण # डीएनए #यांत्रिक पद्धती
संदर्भ :
- https://amp.en.google-info.in/52018729/1/umesh-varshney.html
- https://en.wikipedia.org/wiki/Umesh_Varshney
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.