कॅरिबियन समुद्रातील वेस्ट इंडीज बेटांपैकी अँटिलीस द्वीपसमूहातील आकाराने सर्वांत मोठ्या बेटांचा समूह. अँटिलीस द्वीपसमूहाचे ग्रेटर अँटिलीस व लेसर अँटिलीस असे दोन भाग आहेत. ग्रेटर अँटिलीस बेटे संयुक्त संस्थानांच्या आग्नेय भागात व कॅरिबियन समुद्राच्या उत्तर भागात आहेत, तर लेसर अँटिलीस बेटे कॅरिबियन समुद्राच्या पूर्व भागात आणि दक्षिण अमेरिकेच्या जवळ आहेत.

या बेटांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे सुमारे १८° उ. ते २५° उ. अक्षांश आणि ६०° प. ते ८५° प. रेखांश यांदरम्यान आहे. या द्वीपसमूहात क्यूबा, जमेका, हिस्पॅनीओला आणि प्वेर्त रीको या चार मोठ्या बेटांचा समावेश होतो. यांपैकी हिस्पॅनीओला बेट राजकीय दृष्ट्या डोमिनिकन प्रजासत्ताक आणि हैती अशा दोन देशांमध्ये विभागले आहे. वेस्ट इंडीज बेटांच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९०% क्षेत्र ग्रेटर अँटिलीस बेटांनी व्यापले आहे. क्यूबा हे त्यातील सर्वांत मोठे व सर्वांत पश्चिमेकडील बेट असून ग्रेटर अँटिलीस द्वीपसमूहाच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र त्याने व्यापले आहे. जमेका हे बेट क्यूबाच्या दक्षिणेस वसले आहे. हिस्पॅनीओला बेटाच्या पश्चिम भागात हैती, तर पूर्व भागात डोमिनिकन प्रजासत्ताक हे देश आहेत. क्यूबा, जमेका, डोमिनिकन प्रजासत्ताक व हैती हे स्वतंत्र देश आहेत. प्वेर्त रीको हे यांतील सर्वांत पूर्वेकडील बेट असून ते संयुक्त संस्थानांचे अश्रेणीसत्ताक राज्य आहे. ग्रेटर अँटिलीसपासून जवळ असल्यामुळे केमॅन बेटे (ब्रिटिशांचा सागरपार प्रांत) यांचा समावेशही नेहमी याच द्वीपसमूहात केला जातो. जमेका आणि हिस्पॅनीओला यांदरम्यान असलेले आणि संयुक्त संस्थानांनी हक्क सांगितलेले नव्हॅसा या छोट्याशा बेटाचा समावेशही काही वेळा या द्वीपसमूहात केला जातो. संयुक्त संस्थानांचे फ्लॉरिडा राज्य ही ग्रेटर अँटिलीसची सर्वांत जवळची मुख्य भूमी आहे.

वेस्ट इंडीज बेटे म्हणजे इतिहासपूर्व काळात उत्तर व दक्षिण अमेरिकेला जोडणाऱ्या सागरांतर्गत पर्वतश्रेणींचाच एक भाग आहे. दोन मुख्य पर्वतश्रेण्यांमुळे वेस्ट इंडीज बेटांची निर्मिती झालेली असून त्यांपैकी पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या पहिल्या श्रेणीमुळे ग्रेटर अँटिलीस बेटांची निर्मिती झालेली आहे. भूशास्त्रीय दृष्ट्या ही बेटे लेसर अँटिलीस बेटांपेक्षा वेगळी आहेत. ग्रेटर अँटिलीस बेटे उष्ण कटिबंधात येतात. विषुववृत्ताजवळच्या स्थानामुळे आणि समुद्रसान्निध्यामुळे या बेटांवरील हवामान उष्ण कटिबंधीय सागरी स्वरूपाचे आहे.

संदर्भ : Monkhouse, F. J., Principles of Physical Geography, New York, 1970.

समीक्षक : सुरेश फुले


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.