कॅरिबियन समुद्रातील वेस्ट इडीज बेटांपैकी अँटिलीस द्वीपसमूहातील लहान बेटांची वक्राकार द्वीपमालिका. उत्तरेस व्हर्जिन बेटांपासून ते दक्षिणेस ग्रेनेडापर्यंत उत्तर-दक्षिण दिशेत
पसरलेली ही प्रमुख द्वीपमालिका आहे. याशिवाय इतरही अनेक बेटांचा समावेश लेसर अँटिलीस बेटांमध्ये होतो. त्यांत प्रामुख्याने व्हेनेझुएलाच्या ईशान्य किनाऱ्यावरील त्रिनिदाद व टोबॅगो बेटे, तसेच व्हेनेझुएलाच्या उत्तर किनाऱ्यावरील पूर्वेस मार्गारीटापासून पश्चिमेस आरूबा बेटापर्यंत पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या सर्व बेटांचा समावेश लेसर अँटिलीसमध्ये केला जातो. पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेली ही बेटे प्राकृतिक दृष्ट्या दक्षिण अमेरिकन सागरमग्न खंडभूमीचा भाग असला, तरी त्यांचा समावेश लेसर अँटिलीसमध्येच केला जातो.
या बेटांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे सुमारे १०° उ. ते १८° उ. अक्षांश आणि ५९° प. ते ८५° प. रेखांश यांदरम्यान आहे. कॅरिबियन समुद्राचा पूर्वेकडील विस्तार लेसर अँटिलीस द्वीपमालिकेने सीमित केलेला आहे. लेसर अँटिलीस बेटांचे दोन गट मानले जातात. त्यांपैकी उत्तरेकडील गटाला लीवर्ड बेटे, तर दक्षिणेकडील गटाला विंडवर्ड बेटे असे संबोधले जाते. या दोन्ही गटांतील बेटे सामान्यपणे उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली आहेत. यूरोपीयन पहिल्यांदा येथे आले, तेव्हा या बेटांवर कॅरिब लोक राहत होते. पंधराव्या शतकाच्या अखेरीस स्पॅनिश वसाहतकरी या बेटांवर आले होते. नेहमी वाहणाऱ्या ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या संदर्भात या बेटांची विभागणी लीवर्ड व विंडवर्ड अशा दोन गटांत केली जाते. उत्तरेस डोमिनिकापासून दक्षिणेस ग्रेनेडापर्यंतच्या बेटांना विंडवर्ड बेटे म्हणून ओळखले जाते, तर उत्तरेस व्हर्जिन बेटांपासून दक्षिणेस ग्वादलूप बेटांपर्यंतची बेटे लीवर्ड बेटे म्हणून ओळखली जातात. काही वेळा विंडवर्ड बेटांपैकी डोमिनिका बेटाचा समावेश लीवर्ड बेटांमध्ये केला जातो. विंडवर्ड बेटांच्या तुलनेत लीवर्ड बेटांवर ईशान्य व्यापारी वाऱ्यांचा किंवा पूर्व-पश्चिम प्रचलित वाऱ्यांचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच व्यापारी वाऱ्यांपासून लीवर्ड बेटे संरक्षित राहिली असल्यामुळे त्यांना लीवर्ड बेटे असे संबोधले जाते. स्पॅनिशांनी सुरुवातीला लेसर अँटिलीस द्वीपसमूहाच्या संपूर्ण गटाचा विंडवर्ड बेटे असा उल्लेख केलेला होता आणि ग्रेटर अँटिलीसमधील बेटांच्या गटाला लीवर्ड बेटे असे नाव दिले होते.
लीवर्ड बेटांमध्ये ब्रिटिश व्हर्जिन बेटे, अमेरिकन व्हर्जिन बेटे, अँग्विला, अँटिग्वा-बारबूडा, सेंट कीट्स व नेव्हिस बेटे, ग्वादलूप बेटे इत्यादी बेटांचा समावेश होतो. लीवर्ड बेटे प्रामुख्याने ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झाली असून ओबडधोबड कटक व शंकू यांच्या स्वरूपात ती सागरपृष्ठावर आलेली दिसतात. यातील व्हर्जिन बेटे म्हणजे ग्रेटर अँटिलीसमधील इतर बेटांप्रमाणेच पर्वतश्रेणींचा निमज्जन झालेला भाग आहे. विंडवर्ड बेटांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे डोमिनिका, मार्तीनीक बेटे (फ्रान्सचा सागरपार प्रांत), सेंट लुसीया, सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ, ग्रेनेडा या बेटांचा समावेश होतो. सेंट व्हिन्सेट व ग्रेनेडा यांदरम्यानच्या लहान लहान बेटांच्या मालिकेला ग्रेनेडीन्झ म्हणून ओळखले जाते.
भूशास्त्रीय दृष्ट्या त्रिनिदाद व टोबॅगो ही बेटे दक्षिण अमेरिकेच्या मुख्य भूमीचा विस्तारित भूभाग असला, तरी त्यांचा समावेश विंडवर्ड बेटांमध्ये केला जातो. व्हेनेझुएलाच्या ईशान्य किनाऱ्यावरील मार्गारीटा, कोचे व कूबाग्वा ही तीन छोटी आणि इतर सुमारे ७० बेटे ही व्हेनेझुएलाच्या नुएव्हा एस्पार्टा या द्वीपीय राज्याचा भाग असून त्यांतील बहुसंख्य बेटांवर वस्ती नाही. व्यापारी वाऱ्यापासून पडणारा पाऊस विंडवर्ड बेटांवरच पडून बाष्पविरहीत कोरडे वारे लीवर्ड बेटांकडे वाहत येतात, त्यामुळे लीवर्ड बेटांवरील हवामान शुष्क राहते.
लेसर अँटिलीसमधील अंतर्गत द्वीपसमूहाच्या पूर्वेस कमी उंचीची प्रवाळ बेटे आढळतात, तो लेसर अँटिलीसमधील दुसरा द्वीपसमूह होय. बार्बेडोस, ग्वादलूपचा पूर्वेकडील अर्धा भाग, अँटिग्वा, बारबूडा व अँग्विला बेटांचा यात समावेश होतो. याशिवाय इतरही अनेक बेटांचा यात समावेश होतो. त्यांमध्ये दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्य किनाऱ्याजवळ असलेली त्रिनिदाद व टोबॅगो बेटे येतात. बार्बेडोस, त्रिनिदाद व टोबॅगो या बेटांचे स्थान मुख्य मालिकेत नसले, तरी त्यांचा समावेश लेसर अँटीलीसमध्ये केला जातो. सामान्यपणे दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्यालगत पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या द्वीपमालिकेला काही वेळा लीवर्ड अँटिलीस म्हणून ओळखले जाते.
लेसर अँटिलीसमधील बहुतांश बेटे ज्वालामुखी क्रियेतून, तर उर्वरित बेटे वारा व पाऊस यांच्या विदारण क्रियेमुळे पर्वतशिखरांची झीज होऊन निर्माण झाली आहेत. ती प्रामुख्याने प्रवाळ व चुनखडीयुक्त आहेत. अनेक बेटांच्या अंतर्गत भागात पर्वतीय प्रदेश, तर किनाऱ्यावर सुपीक व सखल किनारपट्ट्या व पांढऱ्या रेतीच्या पुळणी आढळतात. काही बेटांवर गाळाची सुपीक जमीन आहे. काही प्रवाळद्वीपे समुद्रसपाटीपासून थोड्याच उंचीची आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गवत व तुरळक वनस्पती आढळतात. मार्तीनीक बेटांवरील माँ पले व सेंट व्हिन्सेंटवरील मौंट सूफ्रीएअर हे जागृत ज्वालामुखी आहेत.
लेसर अँटिलीस बेटे ऊष्ण कटिबंधात येतात. विषुववृत्ताजवळच्या स्थानामुळे व समुद्रसान्निध्यामुळे येथील हवामान ऊष्णकटिबंधीय सागरी स्वरूपाचे आहे. ऋतुनुसार हवामानात विशेष बदल होत नाही. हवामान उष्ण कटिबंधीय असले, तरी अटलांटिक महासागर व त्यावरून वर्षभर वाहणारे ईशान्य व्यापारी वारे यांमुळे येथील उष्णतेची तीव्रता कमी होते. त्यामुळे वर्षभर येथील हवामान सौम्य असते. बाष्पयुक्त व्यापारी वाऱ्यांमुळे वातसन्मुख बाजूकडील बेटांवर जोरदार पर्जन्यवृष्टी होते. वर्षभर सापेक्ष आर्द्रता जास्त राहते.
या द्वीपमालिकेतील काही बेटे स्वतंत्र देश आहेत, तर काही इतर देशांचे सागरपारप्रांत आहेत.
संदर्भ : Monkhouse, F. J., Principles of Physical Geography, New York, 1970.
समीक्षक : सुरेश फुले
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.