वेस्ट इंडीज बेटांपैकी लेसर अँटिलीसमधील दक्षिणेकडील वक्राकार द्वीपमालिकेला विंडवर्ड असे संबोधले जाते. विंडवर्डचा शब्दश: अर्थ म्हणजे वातसन्मुख दिशेला (वाऱ्याच्या दिशेला)
असलेल्या बेटांचा समूह. विंडवर्ड बेट समूहात जवळपास ९० लहानमोठ्या बेटांचा समावेश होतो. लीवर्ड बेटांच्या दक्षिणेस आणि कॅरिबियन समुद्राच्या पूर्व सीमेवर ही बेटे आहेत. विंडवर्डचा शब्दश: अर्थ म्हणजे वातसन्मुख दिशेला (वाऱ्याच्या दिशेला) असलेला बेटांचा समूह. विंडवर्ड बेट समूहात जवळपास ९० लहानमोठ्या बेटांचा समावेश होतो. त्यांचा अक्षवृत्तीय विस्तार १२° उ. ते १६° उ. अक्षांश, तर रेखावृत्तीय विस्तार ६०° प. ते ६२° प. रेखांश असा आहे. या मालिकेत उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे इंग्रजी भाषिक डोमिनिका, मार्तीनीक बेटे (फ्रेंच विभाग), इंग्रजी भाषिक सेंट लुसीया, सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ या बेटांचा समावेश होतो. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडा या बेटांदरम्यानच्या लहान द्वीपमालिकेला ग्रेनेडीन्झ या नावाने ओळखले जाते.
त्रिनिदाद व टोबॅगो बेटे ही भूशास्त्रीय दृष्ट्या दक्षिण अमेरिकेच्या मुख्य भूमीचा विस्तारित भाग असली, तरी त्यांना विंडवर्ड बेटांचे दक्षिण टोक मानले जाते. त्याच प्रमाणे सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ बेटांच्या पूर्वेकडील बार्बाडोस बेट प्राकृतिक दृष्ट्या विंडवर्ड बेटांचा भाग नसले, तरी त्याचा समावेश विंडवर्ड मध्येच केला जातो. डोमिनिका बेट पूर्वी ब्रिटिश प्रशासित होते; परंतु आता तो स्वतंत्र देश आहे. सुरुवातीला या बेटाचा समावेश विंडवर्ड बेटांपेक्षा लीवर्ड बेटांमध्येच केला जाई. वांशिक दृष्ट्या येथील लोकसंख्या प्रामुख्याने कृष्णवर्णीय किंवा मिश्र वांशिक गटातील आढळत असून त्यात ईस्ट इंडियन, चिनी, पोर्तुगीज, फ्रेंच व ब्रिटिशांचे मिश्रण आढळते.
विंडवर्ड बेटे ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेली असून त्यांच्यावरील मध्यवर्ती पर्वतीय कडांवर ज्वालामुखी कुंड, ऊष्ण पाण्याचे झरे (उन्हाळे) व गंधकाची निर्गम द्वारे आढळतात. मार्तीनीक बेटावरील मौंट पले या ज्वालामुखीचा ८ मे १९०२ रोजी झालेला उद्रेक हा अलीकाडच्या काळातील सर्वांत विनाशकारी उद्रेकांपैकी एक असून त्यामध्ये सुमारे ३०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.
विंडवर्ड बेटांचे हवामान सागरी असून ऊष्णकटिबंधीय उष्णतेची तीव्रता नित्य व्यापारी वारे व दैनिक खारे वारे यांमुळे कमी केली जाते. आलटून पालटून येथे शुष्क व आर्द्र ऋतू असतो. प्रचलित ईशान्य व्यापारी वाऱ्यांमुळे या बेटांच्या पूर्व भागांत अधिक पर्जन्यवृष्टी होते. जून ते ऑक्टोबर यांदरम्यान हरिकेन या वादळांचा तडाखा बसतो.
संदर्भ : Monkhouse, F. J., Principles of Physical Geography, New York, 1970.
समीक्षक : सुरेश फुले
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.