पुरंदरे, भालचंद्र नीळकंठ : (२७ ऑक्टोबर १९११ — १० नोव्हेंबर १९९०). भारतीय स्त्रीरोगतज्ञ आणि वैद्यक. एक विख्यात, कुशल आणि उत्कृष्ट कौशल्य असलेले योनी-शल्यविशारद अशी त्यांची ख्याती होती. भारत सरकारने १९७२ मध्ये त्यांना भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मभूषण हा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून सन्मानित केले.
पुरंदरे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाल्यावर इंटरसायन्सपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये झाले. त्यांनी महाविद्यालयीन काळात अनेक शिष्यवृत्त्या मिळवून सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटलमधून पदवी प्राप्त केली (१९३४). पुढे त्यांनी केईएम हॉस्पिटल येथे स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले (१९३७). भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर शस्त्रक्रिया आणि स्त्रीरोगशास्त्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडमधील एडिनबर्ग येथे गेले. त्यांना प्रा. हॅल्टेन, सर व्हिक्टर बोनी, सर डेव्हिड विल्की आणि सर जॉन फ्रेझर या नामांकित व्यक्तीच्या हाताखाली शस्त्रक्रिया आणि स्त्रीरोगशास्त्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यांना रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची एफ.आर.सी.एस. (FRC) अधिछात्रवृत्ती संपादन केली (१९३९). मुंबईत परत आल्यावर कॉलेज ऑफ फिजिशियन्स व सर्जन यांची अभिछात्रवृत्ती मिळवून ते एफ.सी.पी.एस. (FCPS) झाले. त्यानंतर ते केईएम रुग्णालयात साहाय्यक सन्माननीय विशेषज्ञ या पदावर रुजू झाले (१९४१). हा पदभार त्यांनी १४ वर्षे सांभाळला आणि नंतर ते त्याच विभागाचे प्रमुख झाले (१९५७).
पुरंदरे यांचे वडिल डॉ. नीळकंठ अनंत पुरंदरे हे भारतीय स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्राचे जनक मानन्यात येतात. त्यामुळे पुरंदेरे यांना वैद्यकीय शिक्षणाचे बाळकडू घरातच मिळाले होते. पुरंदरे यांनी गर्भाशयाचा विस्तार (POP; Pelvic Organ Prolapse) यासाठी ओटीपोटातून गर्भाशियग्रीवास्थिरण (सर्व्हिकोपेक्सी; Cervicopexy) ही प्रजननक्षमतेची संरक्षण करणारी शल्यक्रिया विकसित केली. त्यामुळे प्रोलॅप्सच्या जुन्या शस्त्रक्रियांमध्ये क्रांती घडली आणि या शस्त्रक्रियेला ‘पुरंदरे’ज सर्व्हिकोपेक्सी’ असे नाव देण्यात आले. आजही ती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुरंदरे यांचे स्त्रीरोगशास्त्रातील योगदान जगभरात प्रसिद्ध आहे. योनीतील गर्भाशय उच्छेदन (Hysterectomy; हिस्टेरेक्टॉमी), योनी नसबंदी (Vaginal sterilization), शौटाची शस्त्रक्रिया आणि नलिका-पुनर्वाहिनी (ट्यूबल रिकॅनलायझेशन; Tubal recanalization) या शस्त्रक्रियांचा त्यांच्या कामात विशेष समावेश आहे. त्यांनी केलेल्या पंचवीस हजारांहून अधिक योनीतील गर्भाशय उच्छेदन आणि योनी नसबंदीची मालिका ही त्यांची एक अनोखी कामगिरी आहे, जी आजपर्यंत कोणाही पार केली नाही. पुरंदरेंनी कुटुंबनियोजनासाठी विशेष कामगिरी बजावली. कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया योनिमार्गे करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. या पद्धतीमुळे स्त्रीचे रुग्णालयातील वास्तव्य कमी झाले आणि नंतर मूल हवे असल्यास बीजवाहिनीचे टाके काढून पुन्हा गर्भधारणा होऊ शकते हे त्याचे वैशिष्ट्य होते, याला ‘पुरंदरे तंत्र’ म्हणतात. पुरंदरे यांनी योनिमार्गे गर्भाशय काढण्याची पद्धत सुरू केली. यामध्ये कमीतकमी रक्तस्त्राव होतो व पोटावर एरवी होणारा व्रणही रहात नाही. या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे त्यांनी स्वत:च तयार केली. ती सर्व त्यांच्याच नावे प्रसिद्ध आहेत.
पुरंदरे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ डॉ. एन. ए. पुरंदरे मेडिकल सेंटर फॉर फॅमिली वेल्फेअर अँड रिसर्च या केंद्राची स्थापना के.ई.एम. रुग्णालयात करण्यात आली. प्रसूती, स्त्रीरोग आणि कुटुंब नियोजनातील विविध समस्यांवर संशोधन आयोजित करण्यासाठी त्यांनी मौल्यवान योगदान दिले. पुरंदरे तेथे विभाग प्रमुख व संशोधन केंद्र संचालकही होते, या पदांची कारकीर्द त्यांनी १९६९ पर्यंत त्यांच्या निवृत्तीपर्यंत सांभाळली. त्यानंतर त्यांना एम.डी. आणि पीएच.डी.मधील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुणश्री प्राध्यापक (प्रोफेसर एमेरिटस) म्हणून नियुक्त करण्यात आले. ते वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल आणि पोस्ट-ग्रॅज्युएट स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र आणि कुटुंब नियोजन, इन्स्टिट्यूट मुंबईचे अधिष्ठाता होते. ते वाडिया, बॉम्बे आणि पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात सन्माननीय विशेषज्ञ म्हणूनही कार्यरत होते. ते आरोग्य विभाग, सरकारचे कुटुंब नियोजन आणि माता आणि बाल आरोग्य याचे प्रमुख सल्लागार होते. राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या कुटुंब नियोजन प्रकल्पावर विशेष सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. त्यांनी संशोधनात पुढाकार घेतला आणि ते संशोधन संचालक, अधिष्ठाता आणि नंतर, वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटलचे गुणश्री प्राध्यापक होते, जिथे त्यांनी त्यांच्या अनेक शस्त्रक्रिया केल्या आणि त्यात बदलही केले. ते मुंबई विद्यापीठच्या वैद्यकीय विभागाचे अधिष्ठाताही होते. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या शांतिलाल शाह समितीचे ते सभासद होते. यानंतर भारतामध्ये वैद्यकीय गर्भसमापन (एमटीपी; Medical termination of Pregnancy; MTP) कायदा लागू झाला.
पुरंदरे यांना पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्याची खूप आवड होती, विद्यार्थ्यांचा एक गट त्यांच्यासह नेहमीच राहात असे. पुरंदरे यांना स्त्रीरोगचिकित्सेप्रमाणे संगीत, नाटक, विमान उड्डाण, फोटोग्राफी आणि ज्योतिषशास्त्र या विषयांत विशेष रस होता. ते उत्तम तबलावादकही होते.
पुरंदरे यांना अनेक मानसन्मान मिळाले, रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनॅकॉलॉजिस्ट लंडनने त्यांना स्त्रीरोग आणि प्रसूती क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देऊन त्यांचा गौरव केला होता आणि इंडियन अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक फेलो म्हणूनही त्यांची निवड केली. पुरंदरे द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियाचे ( The Federation of Obstetric and Gynaecological Societies of India; FOGSI) दहावे अध्यक्ष होते (१९६७-१९६८). ते इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनॅकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्सचे (Federation of Obstetric and Gynaecologic; FIGO) पहिले भारतीय अsध्यक्षदेखील होते. स्त्री-रोगविज्ञान व प्रसूतिविद्या या विषयांवर त्यांचे बरेच संशोधन असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांतून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते सहलेखक असलेल्या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या आहेत.
पुरंदरे यांचे बंधू विठ्ठल एन. पुरंदरे आणि त्यांचे पुतणे चित्तरंजन नरहरी पुरंदरे हे देखील नामांकित स्त्रीरोग तज्ञ आहेत. बी. एन. पुरंदरे यांच्या नावावर लोणावळ्यात एक हायस्कूल आणि महाविद्यालय आहे. राष्ट्रीय आणि समाज सेवेसाठी त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी हजारो कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे भरवून दिवसाचे अठरा-अठरा तास काम केले आणि लाखो शस्त्रक्रिया पार पाडल्या. त्यांनी त्याचे आत्मचरित्र शल्यकौशल्य या पुस्तकात मांडले आहे.
पुरंदरे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.
कळीचे शब्द : #सर्व्हिकोपेक्सी #पुरंदरे तंत्र
संदर्भ :
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3366575/
- https://jogi.co.in/articles/files/filebase/Archives/2000/oct/2000_46_Oct.pdf
- https://amogsobgy.com/aboutus.html
समीक्षक : अनिल गांधी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.