क्षीरसागर, कमलाकर कृष्ण (१७ सप्टेंबर १९३१). भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि मधुमक्षिकातज्ञ.

क्षीरसागर यांचा जन्म सासवड, पुणे येथील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पालघर जिल्ह्यातील चिंचणी-तारापूरला, माध्यमिक शिक्षण भावे विद्यालय, पुणे आणि उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून झाले. त्यांनी बी.एस्सी. (जनरल), एम.एस्सी. या पदव्या पुणे विद्यापीठातून प्राप्त केल्या. त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या रेशीम संशोधन संस्थेत संशोधक साहाय्यक म्हणून डॉ. गो. बा. देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेशीम कीटक व रेशीम निर्मितीविषयक संशोधनास सुरुवात केली (१९५९). महाराष्ट्रात रेशीम व्यवसाय यशस्वी होणार नाही, असे ब्रिटीशानी १९१० साली जाहीर केले होते. परंतु क्षीरसागर यांच्या गटाच्या संशोधकांनी अनेक प्रयोगाद्वारे महाराष्ट्रात हा व्यवसाय यशस्वी करून दाखविला. म्हैसूर रेशमापेक्षा अधिक दर्जेदार रेशीम महाराष्ट्रात आता मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. नंतर त्यांनी सोलापूर महाविद्यालयात जीवशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली (१९६२ — १९६४). तदनंतर पाचगणीच्या रेशीम संशोधन प्रयोगशाळेत संशोधन अधिकारी म्हणून काम केल्यावर, कालांतराने केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र येथे वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी पुणे विद्यापीठातून भारतीय मधमाशांचा तौलनिक अभ्यास या विषयात पीएच.डी.ची पदवी मिळविली (१९७६). त्यावेळी ते कृषी वनस्पती संरक्षण अधिकारी म्हणून बिहार येथील धनबाद येथे कार्यरत होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग आयोगाच्या केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण संस्थेत मधमाशांचा व्याधी संशोधन विभाग आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख म्हणून त्यांनी २५ वर्षे सेवा केली.

क्षीरसागर यांनी सातेरी मधमाशांचे सात परिरूप आढळत असल्याचे संशोधन केले. यामुळे भारतीय मधमाशीचे निवड पद्धतीने गुणसंवर्धित मोहोळांची निर्मिती करण्यासाठी आणि मधोत्पादन व परागीभवन करण्यासाठी परिरूपांचा चांगला उपयोग करता येऊ लागला. त्याकाळी पाश्चात्त्य देशातून आयात केलेल्या मोहोळांमुळे भारतीय मधमाशांमधे नव्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्या रोगांचा शोध घेऊन त्यावरील उपाय योजना त्यांनी निश्चित केली. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या प्रयोगशाळांच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जंगली आणि पाळीव रेशीम कीटकांचा जनुकीय अभ्यासदेखील त्यांनी केला. केवळ कीटकशास्त्रच नव्हे तर त्यांनी भारतीय संस्कृती, पुण्याचा इतिहास अशा विविध विषयातदेखील काम केले आहे. कृषीविषयक लेखन, मधुमकक्षिकापालनाच्या अभ्यासावर पुस्तके, रेशीम कीटकांची माहिती, विविध कृषिशास्त्रज्ञांचे कार्य इ. विषयांत त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. याव्यतिरिक्त अनेक विषयांच्या विशेष खंडांसाठी त्यांनी प्रकरणे लिहिली आहेत.

क्षीरसागर यांचे मराठी विज्ञान परिषद,  विज्ञान भारती, वनराई, ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन, सृष्टिज्ञान मासिक अशा विविध संस्थांशी संबंध आहे. भारताच्या वीस राज्यात कार्यरत असलेल्या विज्ञान भारतीचा संस्थापक म्हणून त्यांनी क्रियाशील भूमिका पार पाडली आहे. ग्रामीण भागात विज्ञान प्रसाराचे काम, भारतीय वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रामुख्याने प्रसार व प्रचार करणे याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे. त्यांच्या विज्ञान कथांना आणि चार पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय वसंतराव नाईक प्रतिष्ठानने त्यांना उत्कृष्ट कृषी साहित्याचा पुरस्कार दिला आहे. तसेच पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने त्यांना पुरस्कृत केले आहे. ते मधमाशांचे सुलभ पालन व व्यवस्थापन यांवर लेखन करीत आहेत. आजवर त्यांची ३२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत, त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन केले आहे. त्यांची आग्या मधमाशांचे सुलभ पालन व व्यवस्थापन आणि अष्टपैलू शास्त्रज्ञ डॉ. गोविंद बाळकृष्ण देवडीकर यांचे चरित्र अशी नवी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत (२०२१s).

क्षीरसागर यांना विज्ञानप्रसार कार्यासाठी डॉ. मो. वि. चिपळोणकर विज्ञान पुरस्कार, स्वा. सावरकर ग्रंथ पुरस्कार, हरिभाऊ मोटे विज्ञान प्रसार पुरस्कार, विज्ञान कथा पुरस्कार, महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघ पुरस्कार, महाराष्ट्र दीप हे पाच पुरस्कार मिळाले आहेत.

कळीचे शब्द : #सातेरी मधमाशी #इकोटाईप्स # परिरूप

संदर्भ :

समीक्षक : नागेश टेकाळे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.