दाससरमा, शिलादित्य : (११ नोव्हेंबर १९५७). भारतीय-अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ. ते लवणजलरागी (Halophilic; हॅलोफिलिक) आणि एक्स्ट्रीमॉफिलिक सूक्ष्मजीवांच्या जीवशास्त्रातील योगदानासाठी प्रसिद्ध आहेत.
दाससरमा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. इंडियाना विद्यापीठ ब्लूमिंग्टन येथून त्यांनी रसायनविज्ञानातील बी.एस. पदवी मिळविली. पुढे मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथून नोबेल पारितोषिक विजेते हरगोविंद खोराना आणि डॉ. उत्तम एल. राजभंडारी यांच्याकडे संशोधनाचे काम करून जीवरसायन शाखेतील पीएच.डी. पदवी संपादन केली. बाल्टिमोरमधील मेरिलॅन्ड विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी त्यांनी मॅसॅच्युसेटस जनरल हॉस्पिटल, हॉवर्ड मेडिकल स्कूल आणि पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूट येथे संशोधन केले.
दाससरमा यांनी लवणजलरागी जीवाणूतील जनुकावर संशोधन केले. त्यांच्या संशोधनातून कार्ल वोज यांच्या सजीवांच्या तीन अधिक्षेत्र सिद्धांतास बळकटी मिळाली. त्यांनी जीवाणूपासून आर्किया अधिक्षेत्र वेगळे आहे हे सिद्ध केले (पाहा : तीन अधिक्षेत्र वर्गीकरण). त्यांच्या अभ्यास क्षेत्रात रेणवीय आनुवंश विज्ञान, जीनोमिक्स आणि जैवमाहिती विज्ञान या क्षेत्रांचा समावेश होतो.
नेहमीहून अधिक क्षारमय माध्यमामध्ये राहणाऱ्या जीवाणूंना लवणजलरागी सजीव म्हणतात. अशा नेहमीच्या माध्यमाहून अधिक विपरित स्थितीत जीवित असणारे सजीव परम-सीमा सजीव म्हणतात. अशा सजीवाच्या संशोधनासाठी त्यांनी वेगळा विभाग सुरू केला. त्यांनी लवणजलरागी सजीवातील हॅलोबॅक्टेरियम स्पिशीज एनआरसी-१ (NRC-1) चे जनुक क्रमनिर्धारण पूर्ण केले. त्यांच्या संशोधनातून या जीवाणूतील प्रथिने कमीत कमी पाण्यात आणि तीव्र क्षारस्थितीतसुद्धा कार्यक्षम असतात असे सिद्ध केले. जनुक क्रमनिर्धारणातून आर्किया अधिक्षेत्र हे प्रगत केंद्रकी सजीव जीवाणूहून वेगळे असल्याचे आणि जीवाणूतील काही जनुके समांतर जनुक हस्तांतरातून मिळविले जातात, असे समजले. उदा., लवणजलरागी जीवाणू ऑक्सिश्वसन जनुके. जीनोम क्रमनिर्धारण जनुक ओळख आणि त्यानंतर केलेले संशोधनातून लवणजलरागी जीवाणूमधील काही विशेष प्रथिने ही सर्वस्वी नवी असल्याचे आढळले. काही जनुके डीएनए दुरुस्त करण्यासाठी वापरता येतात, हेसुद्धा त्यांनी सिद्ध केले.
दाससरमा यांचे संशोधन प्रामुख्याने अंटार्टिक लवणजलरागी जीवाणू हॅलोरुब्रम लॅकसस्प्रोरोफंडी यावर होते. अतिक्षारस्थिती आणि शीत तापमानात त्यातील प्रथिने आश्चर्यकारकरित्या कार्यक्षम होती. सजीव नव्या स्थितीत त्यातल्या त्यात पृथ्वीबाह्य स्थितीत ही प्रथिने कार्यक्षम असण्याची शक्यता आहे, असे त्यांचे मत आहे. तसेच त्यांनी डोळ्यातील रंगकणाचा उगम लवणजलरागी आर्कियापासून झाला असावा आणि यापासूनच पृथ्वीवर हरितलवक तयार झाले असावे, असे सुचविले. या सिद्धांतास त्यांनी ‘पर्पल अर्थ’ असे नाव दिले आहे. ही सजीव ओळखण्यातील जैविक खूण (bio signature) आहे.
दाससरमा यांच्या प्रयोगशाळेने हॅलोबॅक्टेरियम प्रजाती एनआरसी-१ (NRC-1) मधील प्लावी वायू पुटिक अब्जांश कण [ब्युयंट गॅस वेसिकल नॅनोपार्टिकल्स (GVNPs; जीव्हीएनपी’ज)] च्या अभ्यासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि जैवतंत्रज्ञान अनुप्रयोगांसाठी प्लावी वायू पुटिका अब्जांश कणासाठी एक अभिव्यक्ती प्रणाली विकसित केली आहे. प्रतिजन वहन (antigen delivery), लस बनवणे आणि जैववैद्यकीय व पर्यावरण समस्यांवर अशा अब्जांश कण वापराचे तंत्र आता टप्प्यात आले आहे.
दाससरमा यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून ग्रॅंड चॅलेंजेस ॲवॉर्ड, फुलब्राइट स्पेशॅलिस्ट आणि आंतरराष्ट्रीय व्हिजिटिंग प्रोफेसरशिप प्रदान करण्यात आली. सध्या ते युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅन्ड इन्स्टिट्यूट ऑफ मरीन अॅन्ड इन्व्हायरन्मेंटल टेक्नॉलॉजीमध्ये संशोधक आहेत.
कळीचे शब्द : #लवणजलरागी जीवाणू
संदर्भ :
- https://www.americanscientist.org/author/shiladitya_dassarma
- https://loop.frontiersin.org/people/587523/bio
- https://www.celebsagewiki.com/shiladitya-dassarma
- dassarma@umbi.umd.edu
- https://en.wikipedia.org/wiki/Shiladitya_DasSarma
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.