गोल्डिन, क्लॉडिया (Goldin, Claudia) : (१४ मे १९४६). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्र विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या तिसऱ्या महिला. स्वतःच्या
बळावर अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक जिंकणारी इतिहासातील पहिली महिला म्हणून त्यांचा उल्लेख आहे. क्लॉडिया यांचा जन्म न्यूयॉर्क (अमेरिका) येथे एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिओन गोल्डिन हे बर्लिंग्टन इंडस्ट्रीजमध्ये डेटा प्रोसेसिंग मॅनेजर म्हणून काम करत होते, तर आई ल्युसिल या तेथील पब्लिक स्कूलच्या प्राचार्य होत्या. क्लॉडिया यांचा विवाह हार्वर्डमधील अर्थशास्त्राचे सहकारी प्राध्यापक लॉरेन्स एफ. काट्झ यांच्याशी झाला.
क्लॉडिया यांना पुरातत्त्वशास्त्रज्ञ व्हायचे होते; परंतु पॉल डी क्रुइफ यांचे मायक्रोब हंटर्स हे पुस्तक वाचल्यानंतर, त्या बॅक्टेरियोलॉजीकडे आकर्षित झाल्या. हायस्कूलमध्ये असताना त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्राचा उन्हाळी शालेय अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी १९६७ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून अर्थशास्त्रात विषयात बी. ए. ही पदवी; १९६९ मध्ये शिकागो विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि १९७२ मध्ये पीएच. डी. ही पदवी मिळवली. त्यांनी औद्योगिक संघटना आणि कामगार यासंबंधातील दक्षिणेकडील शहरांमधील गुलामगिरी (शहरी गुलामगिरीचे अर्थशास्त्र: १८२० ते १८६०) यावर प्रबंध लिहिला.
क्लॉडिया यांना अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांच्या भूमिकेच्या क्षेत्रातील अग्रगण्य संशोधक आणि शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्या १९८९ ते २०१७ या काळात एन. बी. ई. आर. च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील एक आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्य करत असताना त्यांनी केलेले संशोधन हे भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तमानाचा अर्थ लावणारा आहे. महिलांची श्रमशक्ती, लिंगभेदानुसार उत्पन्नातील असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि स्तलांतर यांसह विविध विषयांचा अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनातून केला आहे. महिलांचे जीनव आणि कुटुंबाच्या शोधाचा इतिहास, उच्च शिक्षणातील सहशिक्षण, लग्नानंतरचे महिलांचे आडनाव हे सामाजिक निर्देशक, महिलांचे जीवन व लग्नाचा निर्णय यांवर गर्भनिरोधक गोळीचा प्रभाव अशा विविध विषयांवर त्यांनी संशोधनपर निबंध लिहिले आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांच्या प्रवेशाने जीवन जगण्यासाठी नियोजन करून जीवनाला नवीन संधी देणे या क्रांतिकारी बदलाला गती देण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे क्लॉडिया त्यांनी दाखवून दिले आहे. बहुसंख्य महिला आता पदवीधर असल्याने महिलांच्या रोजगाराचे नवीन जीवनचक्र सुरू झाले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेतकरी ते औद्योगिक समाज यांमध्ये बदल झाल्यामुळे सेवाक्षेत्रात विवाहित महिलांचा सहभाग कमी झाला; परंतु विसाव्या शतकात बहुतेक विकसित देशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांमधील शिक्षणाची पातळी लक्षणीय रीत्या सतत वाढत जाऊन सेवाक्षेत्रामध्ये त्यांची वाढ झाली आहे, असे मत क्लॉडिया मांडतात.
क्लॉडिया यांनी महिलांच्या श्रमबाजारातील योगदानाचा पहिला सर्वसमावेशक अभ्यास सादर केला आहे. त्यांनी श्रम (कामगार) बाजार, असमानता, लिंग आणि आर्थिक इतिहास हे
एकत्रित करून तिच्या प्रभावी कामाने पारंपरिक शैक्षणिक सीमांच्या बाहेर एक नवीन पाया रचला. औद्योगिकीकरणामुळे महिलांचा श्रमबाजारातील सहभाग कमी झाला; परंतु सेवाक्षेत्राच्या वाढीमुळे त्यात पुन्हा वाढ झाली, हे त्यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले. जागतिक श्रमबाजारात महिलांचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे. त्या जेव्हा काम करतात, तेव्हा त्यांचा मोबदला पुरुषांपेक्षा कमी असते. विवाह, अपेक्षा आणि गर्भनिरोधक गोळ्या यांसारखे घटक स्त्री श्रमाच्या मागणी व पुरवठ्यावर कसा परिणाम केला आहे, हे त्यांच्या संशोधनातून समोर आले. श्रमिक बाजारात लिंगभेद कायम राहिल्यास पुरुष आणि स्त्रिया दोघानांही नुकसान सोसावे लागते. कामगार क्षेत्रातील लिंगविषमता समजून घेण्याचा आणि तो दूर करण्याचा क्लॉडिया यांचा प्रयत्न केवळ कामगार अर्थशास्त्राच्या क्षेत्रालाच आकार देत नाही, तर ऐतिहासिक दृष्ट्या पुरुषप्रधान क्षेत्रात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक दीपस्तंभ म्हणूनही काम करत आहे.
क्लॉडिया यांनी अनेक पुस्तके व लेख लिहिले आहेत. त्यांमध्ये अर्बन स्लेव्हरी इन द अमेरिकन साउथ, १८२० ते १८६० : अ क्वांटिटेटिव्ह हिस्ट्री, १९७६; करिअर अँड फॅमिली : वुमेन्स सेंच्युरी-लाँग जर्नी टुवर्ड इक्विटी, २०२१; ॲन इव्हॉल्व्हिंग फोर्स : अ हिस्ट्री ऑफ वुमेन इन द इकॉनॉमी, २०२३ इत्यादी.
क्लॉडिया यांना अनेक मानसन्मान लाभले आहेत. त्यामध्ये रिचर्ड ए. लेस्टर पुरस्कार (१९९०, २००८, २०२१); सोशल सायन्स हिस्ट्री असोसिएशनकडून अॅलन शार्लिन मेमोरियल बुक पुरस्कार, १९९१; अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनकडून कॅरोलिन शॉ बेल पुरस्कार, २००५; आर. आर. हॉकिन्स पुरस्कार, २००८; सोसायटी ऑफ लेबर इकॉनॉमिस्ट्सकडून जेकब मिन्सर पुरस्कार, २००९; जॉन आर. कॉमन्स पुरस्कार, २००९; आयझेडए पुरस्कार, २०१६; बीबीव्हीए फाउंडेशन फ्रंटियर्स इन नॉलेज पुरस्कार, २०१९; अर्थशास्त्रातील एर्विन प्लेन नेमर्स पुरस्कार, २०२०; सोसायटी फॉर प्रोग्रेस मेडल, २०२१; आर्थिक शिक्षण परिषदेकडून दूरदर्शी पुरस्कार, २०२२ इत्यादी.
संदर्भ : Claudia Goldin – Facts – NobelPrize.org, 2023.
समीक्षक : संतोष दास्ताने
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.