गलांडे, संजीव अनंत : (२० सप्टेबर १९६७). भारतीय जीवरसायनशास्त्रज्ञ. विविध प्रारूपांच्या साहाय्याने जनुकबाह्य आनुवंशिकीतील (एपिजेनेटिक्स; Apigenetic) उत्क्रांती पद्धती तसेच गर्भावस्थेत मधुमेह असलेल्या मातेच्या संततीतील मधुमेह, टी-लसिक पेशी विकासातील रंज्यद्रव्य आणि एक्स-गुणसूत्रावरील जनुक निष्क्रीयता यांवर त्यांचे संशोधन आहे.
गलांडे यांचा जन्म पुणे (महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून जैवरसायनशास्त्र विषयात एम.एस्सी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोरमधून पीएच.डी. पदवी संपादन केली (१९९६). पुढील संशोधनासाठी ते लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी, कॅलिफोर्निया येथे गेलेत. तेथे त्यांनी अर्बुदनिर्मितीत (ट्युमेरोजेनेसिस) एमएआरने (सारणी जोडणी भाग; MAR; Matrix Attachment Region) जोडल्या जाणाऱ्या प्रथिनांच्या कार्याबद्दल संशोधन केले. भारतात परतल्यानंतर ते राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स; NCCS) येथे वरिष्ठ वैज्ञानिक पदावर रूजू झालेत. पुढे त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे (IISR; आयसर) येथील प्राध्यापक पद स्वीकारले (२०१०). आयसरमध्ये त्यांनी जनुकबाह्य आनुवंशिकीचे (सेंटर ऑफ एक्सलन्स इन एपिजेनेटिक्स; CoEE) केंद्र स्थापन केले. जीवविज्ञानातील ती सर्वांत आधुनिक शाखा आहे. तसेच आयसरमध्ये ते क्रोमॅटिन बायॉलॉजी आणि एपिजेनेटिक्स प्रयोगशाळेचेही प्रमुख होते. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहायक प्राध्यापकही होते.
गलांडे यांचे प्राथमिक संशोधन कर्कअर्बुदजनन आणि अर्बुदनिर्मितीत एमएआरने जोडल्या जाणाऱ्या प्रथिनांच्या कार्याबद्दल होते. कालांतराने त्यांनी जनुक बाह्यआनुवंशिकी आणि रंज्यद्रव्य (क्रोमॅटिन) यांवर संशोधन केंद्रित केले. जनुक बाह्यआनुवंशिकी मध्ये जनुकाची व्यक्तता बदलते, मात्र डीएनएमध्ये कसलाही बदल होत नाही. पेशीतील डीएनए रंज्यद्रव्यामध्ये गुंडाळण्यात येणाऱ्या पेशीपासून येणाऱ्या संदेशांचा वाटा यावर त्यांनी संशोधन केले. आयसरमध्ये त्यांनी झीब्रा मासा, किण्व, फळमाशी, सीनोऱ्हॅब्डायटिस सूत्रकृमी आणि मानव यांच्या जनुकबाह्य आनुवंशिकीबद्दल काम करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिलेखन, जनुक नियंत्रण, पेशीवृद्धी, पेशीस्वनियंत्रण आणि पेशीपुनरुत्पादन अशा जैविक क्रिया यांवर काम केले. त्यातसुद्धा त्यांनी जनुकीय, जैवरासायनिक, रेणवीय आणि संगणकीय प्रारूपे यांचा अभ्यास केला. टी-लसीका पेशींचा विकास आणि फरक त्यावरील प्रथिननिर्मितीची पद्धत यावरही त्यांनी संशोधन केले.
गलांडे यांनी रिसर्च गेट या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ८७हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र आणि आयसरमधील अनेक संशोधकांचे ते मार्गदर्शक आहेत. रेणवीय जीवविज्ञान, जैवमाहिती विज्ञान, पेशी विज्ञान, प्रथिन रचना आणि जिनॉमिक्स मधील अभ्यासक्रम बनवून त्यांवर त्यांनी अनेक कार्यसत्रे घेतली आहेत. त्यांच्या संशोधनामुळे आणि जीवविज्ञानातील भरीव कामगिरीमुळे त्यांना डिपार्ट्मेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीकडून नॅशनल बायोसायन्स ॲवॉर्ड (२००६), जीवविज्ञानातील स्वर्णजयंती बायोसायन्स अधिछात्रवृत्ती, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (२०१०), वेलकम ट्रस्टची वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती, बिर्ला फाउंडेशनतर्फे जी. डी. बिर्ला आणि के. के. बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार, इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स आणि इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी यांच्या अधिछात्रवृत्ती मिळाल्या आहेत. सध्या ते शिव नाडार इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स, दिल्ली-एनसीआर येथे अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत.
कळीचे शब्द :#क्रोमॅटिन #बायॉलॉजी #एपिजेनेटिक्स #टी-लसीका पेशी
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.