जीवनसत्त्व के मेदविद्राव्य आहे. मानवी शरीरामध्ये रक्त क्लथनासाठी (रक्त गोठण्यासाठी) आवश्यक असणाऱ्या पूर्व प्रथिनांचे संश्लेषण आणि हाडांमध्ये कॅल्शियमला बांधून ठेवणाऱ्या ऊतींना मदत करणाऱ्या पूर्व प्रथिनांचे संश्लेषण झाल्यानंतर के जीवनसत्त्व त्यावर प्रक्रिया करून प्रथिनांची रचना बदलवते. त्यामुळे त्या प्रथिनामुळे रक्त गोठते. Coagulation हा इंग्रजी शब्द मूळ Koagulation या डॅनिश शब्दावरून आल्याने याचे नाव जीवनसत्त्व के असे पडले आहे. या जीवनसत्त्वाचा शोध लावल्याबद्दल १९४३ मध्ये डॅनिश शास्त्रज्ञ हेन्रिक डाम (Henrik Dam) व अमेरिकन शास्त्रज्ञ एडवर्ड डॉइझी (Edward Doisy) यांना नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.

के जीवनसत्त्व : रासायनिक संरचना

जीवनसत्त्व के गटामध्ये मुख्यत: २-मिथिल-१,४-नॅफ्थोक्विनोन असे क्रियात्मक घटक असणारे दोन प्रकार आढळतात. जीवनसत्त्व के म्हणजे फायलोक्विनोन (Phylloquinone) आणि जीवनसत्त्व के म्हणजेच मीनाक्विनोन (Menaquinone). जीवनसत्त्व के [मीनाक्विनोन-४ (MK-4) व मीनाक्विनोन-७ (MK-7)] यावर सर्वाधिक अभ्यास झालेला आहे.

स्रोत : हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्व के भरपूर प्रमाणात निर्माण होत असते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन वहनात म्हणजेच सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या ऊर्जेचे स्वरूप बदलण्यात जीवनसत्त्व के मदत करत असते. तसेच प्राण्यांच्या शरीरात या जीवनसत्त्व केचे के (MK-4) मध्ये रूपांतर होत असते. अन्ननलिकेत असणारे जीवाणू जीवनसत्त्व केचे रूपांतर MK-४ मध्ये करतात. तसेच MK-४ प्रकार वगळता जीवनसत्त्व केच्या इतर सर्व प्रकारांची निर्मितीही करतात. अशा पद्धतीने तयार केलेले हे जीवनसत्त्व केचे प्रकार विनॉक्सिश्वसन (Anaerobic respiration) क्रियेत वापरले जातात.

दैनंदिन मानवी आहारातील वयोगटानुसार के जीवनसत्त्वाचे प्रमाण

विविध स्रोतातील जीवनसत्त्व केचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे :

वनस्पतीजन्य स्रोत : एक कप पालक – १४५ मायक्रोग्रॅम, अर्धा कप कोबी किंवा फ्लॉवर – ११९ मायक्रोग्रॅम, अर्धा कप भाजलेले सोयाबीन – ४३ मायक्रोग्रॅम, एक कप शतावरी – ४६ मायक्रोग्रॅम, १ कप भोपळा – ४० मायक्रोग्रॅम, तीन चतुर्थांश कप गाजराचा रस – २८ मायक्रोग्रॅम.

प्राणीजन्य स्रोत : एक उकडलेले अंडे – ४ मायक्रोग्रॅम, ९० ग्रॅम चिकन – ६ मायक्रोग्रॅम.

उपयोग : ग्लुटामिक अम्लाचे जास्त प्रमाण असणाऱ्या प्रथिनांमध्ये ग्लुटामिक संरचनेचे कार्बॉक्सिकरण करणाऱ्या विकराचा सहविकर म्हणून जीवनसत्त्व के कार्य करते. या कार्बॉक्सिकरणामुळे जखम झाल्यावर रक्त गोठवणे ही प्रक्रिया पार पडते, त्यामुळे एखादी जखम झाल्यानंतर त्यातून अतिरक्तस्राव होऊन मृत्यू होण्यासारखे धोके टाळता येतात. तसेच हाडांमध्ये कॅल्शियमला बांधून ठेवायलाही हे जीवनसत्त्व मदत करते. यामुळे अस्थिमृदुता या विकारावरही हे जीवनसत्त्व उपयोगी ठरते.

कमतरता/अभाव : थ्राँबिन प्रथिनाचे पूर्वप्रथिन असणारे प्रोथ्राँबिन या प्रथिनातील ग्लुटामिक आम्लाचे कार्बॉक्सिकरण झाल्यावरच थ्राँबिन हे क्रियाशील बनते आणि याच क्रियेसाठी जीवनसत्त्व के याची गरज असते. जीवनसत्त्व केच्या स्रोतांकडे पाहिले तर सहजच लक्षात येईल की, कोणत्या ना कोणत्या अन्नातून जीवनसत्त्व के मानवाला आहारातून मिळतच असते. त्यामुळे जीवनसत्त्व केची कमतरता शक्यतो जाणवत नसते. परंतु, पुढील काही कारणांनी त्याची कमतरता जाणवू शकते.

जीवनसत्त्व के : प्रमुख स्रोत

(१) क्रॉन आजारासारख्या लहान आतड्याच्या त्रासांमुळे किंवा आतड्याच्या दोषांमुळे अन्ननलिकेच्या शोषण क्षमतेमध्ये कमतरता निर्माण झाली तर के जीवनसत्त्वाची कमतरता जाणवू शकते.

(२) अम्लपित्तनाशक औषधे (Antacids), रक्त पातळ बनवणारी औषधे (Blood thinners), प्रतिजैविके (Antibiotics), कर्करोगाच्या उपचारासाठीची औषधे, अपस्मारावरील (Seizure) औषधे अशा औषधांमुळे के जीवनसत्त्वाच्या कार्यामध्ये बाधा येते.

(३) बालकांमध्ये किंवा गर्भवती स्त्रीकडून बालकाला नाळेतून जो अन्नपुरवठा होतो, त्यामधून आणि बालकाच्या जन्मानंतर स्तनपानातून जो अन्नपुरवठा होतो, त्यात यात के जीवनसत्त्वाचे प्रमाण खूपच कमी असते; म्हणून अतिकुपोषणात के जीवनसत्त्व कमतरतेचे परिणाम दिसून येतात.

(४) जीवनसत्त्व केचे संचय मुख्यत: यकृतातच होत असते, त्यामुळे अतिमद्यपानामुळे ज्यावेळी यकृत कमकुवत होते, तेव्हा देखील के जीवनसत्त्वाची कमतरता जाणवते.

के जीवनसत्त्व मेदविद्राव्य असल्यामुळे त्याचे शरीरात संचयित होऊ शकते. त्याला ‘हायपरव्हिटामिनोसीस’ असे म्हणतात. आहारातून के जीवनसत्त्वाचे अधिक सेवन झाल्याचे दुष्परिणाम खूपच दुर्मिळ आहेत. परंतु, हृदयरोगावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे जीवनसत्त्व केच्या सेवनावर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते, कारण अशा वेळी जीवनसत्त्व केचे प्रमाण थोड्याशाही अंशाने वाढणे घातक ठरू शकते.

पहा : जीवनसत्त्व के (पूर्वप्रकाशित), जीवनसत्त्वे.

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Vitamin_K
  • https://www.webmd.com/vitamins-and-supplements/supplement-guide-vitamin-k#1

समीक्षक : नंदिनी देशमुख