पृथ्वीच्या मध्यातून उत्तर-दक्षिण जाणाऱ्या काल्पनिक रेषेला तिचा परिवलन अक्ष म्हणतात व या परिवलन अक्षाभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्याला भ्रमणाक्ष म्हणतात. या भ्रमणाक्षाचे दक्षिण टोक म्हणजेच दक्षिण ध्रुव असून उत्तर टोक म्हणजे उत्तर ध्रुव होय. पृथ्वीच्या मध्यातून जाणारा तिचा परिवलन अक्ष दक्षिणेस ज्या बिंदूवर भूपृष्ठाला छेदतो, तो बिंदू म्हणजेच दक्षिण ध्रुव किंवा भौगोलिक दक्षिण ध्रुव होय. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ध्रुवांचे भूपृष्ठीय अक्षांश अनुक्रमे ९०° उ. व ९०° द. असते. पृथ्वीवरील सर्व रेखावृत्ते दक्षिण गोलार्धात पृथ्वीच्या दक्षिण टोकाशी ज्या बिंदूवर एकत्र येतात, तो बिंदू म्हणजे भौगोलिक दक्षिण ध्रुव असून उत्तर गोलार्धात ती रेखावृत्ते पृथ्वीच्या अगदी उत्तर टोकाशी ज्या बिंदूवर एकत्रित येतात, तो बिंदू म्हणजे भौगोलिक उत्तर ध्रुव होय. अंटार्क्टिका खंडावरील रॉस आईस सेल्फपासून दक्षिणेस सुमारे ४८० किमी. वर दक्षिण ध्रुव आहे. रॉस आईस सेल्फ हे तरंगत्या बर्फाचे जगातील सर्वांत मोठे क्षेत्र असून ते रॉस समुद्राच्या शिरोभागी आहे. सध्याचे त्याचे क्षेत्र अंदाजे ४,७२,००० चौ. किमी. असून त्याच्या कड्यासारख्या भिंतीची उंची काही ठिकाणी ५० ते ६० मी. च्या आसपास आणि सरासरी जाडी सुमारे ३३० मी. आहे.

अंटार्क्टिका खंडावर भौगोलिक दक्षिण ध्रुवाशिवाय चुंबकीय दक्षिण ध्रुव, भूचुंबकीय दक्षिण ध्रुव, पृथ्वीचा अक्षीय दक्षिण ध्रुव, भूसंतुलन दक्षिण ध्रुव असे अनेक दक्षिण ध्रुव बिंदू आहेत. पृथ्वीचे हे सर्व दक्षिण ध्रुव एकच नसून एकमेकांपासून काही अंतरावर असणारे भिन्न बिंदू आहेत. हे सर्व ध्रुव बिंदू अंटार्क्टिका खंडाच्या परिसरात आहेत. सामान्यत: जेव्हा पृथ्वीचा ‘दक्षिण ध्रुव’ असे म्हटले जाते, तेव्हा भौगोलिक दक्षिण ध्रुव अभिप्रेत असतो. भौगोलिक दक्षिण ध्रुव ना चुंबकीय दक्षिण ध्रुवाशी जुळत ना भूचुंबकीय दक्षिण ध्रुवाशी जुळत. पृथ्वीची भूपट्ट संरचना आणि भूपट्टांच्या मंदगतीने पण सातत्याने होणाऱ्या हालचालींमुळे ध्रुव बिंदूंमध्ये बदल झालेले आढळतात. सर्व दिशांनी येणारी होकायंत्रे दक्षिणेकडील ज्या बिंदूची दिशा दर्शवितात, तो अंटार्क्टिका खंडावरील बिंदू म्हणजेच चुंबकीय दक्षिण ध्रुव होय. चुंबकीय दक्षिण ध्रुव अडेली कोस्ट (पूर्व अंटार्क्टिकामधील विल्क्स लँड किनाऱ्याचा भाग) येथे असून त्याचे अक्षांश व रेखांश अनुक्रमे ६६° ००′ द. व १३९° ०६′ पू. असे आहे. चुंबकीय दक्षिण ध्रुवही सतत जागा बदलत असून प्रतिवर्षी तो वायव्येस अंदाजे १३ किमी. सरकतो. भूचुंबकीय दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भूचंबकीय क्षेत्राच्या अगदी दक्षिण टोकाशी असून तोसुद्धा बदलत असतो. तो १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस अनुक्रमे ७९° १३′ द. अक्षांश व १०८° ४४′ पू. रेखांशावर होता. पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण ध्रुव समुद्रसपाटीपासून साधारण २,८३० मी. उंचीवर असून त्याची उंचीही सातत्याने बदलत असते.

पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला आस यांमुळे दक्षिण ध्रुवावर वर्षातून फक्त एकदाच सूर्योदय आणि एकदाच सूर्यास्त अनुभवास येतो. २३ सप्टेंबर या विषुवदिनाच्या दरम्यान येथे सूर्योदय होतो; त्यानंतर तीन महिने सूर्य क्षितिजापासून अधिकाधिक वर वर येत राहतो; २२ डिसेंबर या अयनदिनाच्या दिवशी सूर्य क्षितिजापासून कमाल उंचीवर आलेला असतो; त्यानंतर तीन महिने म्हणजे २१ मार्च या विषुवदिनापर्यंत तो क्षितिजाकडे खाली खाली जात राहतो आणि सूर्यास्त होतो. २३ सप्टेंबर ते २१ मार्च या सहा महिन्यांच्या दक्षिण गोलार्धातील उन्हाळ्याच्या कालावधीत दक्षिण ध्रुव प्रदेशात २४ तास दिवस असतो, तर २१ मार्च ते २३ सप्टेंबर या सहा महिन्यांच्या हिवाळ्याच्या कालावधीत दक्षिण ध्रुवावर २४ तास रात्र असते, त्यावेळी तेथे फक्त संधिप्रकाश मिळत असतो. उन्हाळा ऋतुमध्ये सूर्य कायमच क्षितिजाच्या वर असतो, तर हिवाळ्यात तो कायमच क्षितिजाच्या खाली असतो. दक्षिण ध्रुव बिंदू अंटार्क्टिका खंडावर आहे, तर उत्तर ध्रुव बिंदू आर्क्टिक महासागरात आहे. दक्षिण ध्रुवाची समुद्रसपाटीपासूनची उंची केवळ १०० मीटर असली, तरी तेथील हिमावरणाची जाडी अंदाजे २,७०० मी. आहे. शिवाय डिसेंबर अयनदिनाच्या दिवशी सूर्य आकाशात सुमारे २३० ३०’ द. अक्षवृत्तावर असला, तरी बराचसा सूर्यप्रकाश भूपृष्ठावर पोहोचत नाही; तसेच हिमाच्छादानामुळे सूर्यप्रकाशाचे परावर्तन होते. सदैव हिमाच्छादन आणि हिमाच्छादनामुळे वाढलेली समुद्रसपाटीपासूनची उंची यांमुळे उत्तर ध्रुवापेक्षा येथील तापमान कमी असते. वैश्विक तापमानवाढीमुळे अलिकडच्या काळात तेथील बर्फाच्या थरांची जाडी कमी झालेली आढळते. असे असले, तरी येथील सर्वाधिक तापमानाची नोंद -१२.३° सेल्सिअस इतकी झालेली आहे. दक्षिण ध्रुव हे पृथ्वीवरील सर्वांत थंड ठिकाणांपैकी एक असून येथील किमान तापमानाची नोंद -८२.८° से. इतकी झालेली आहे. दक्षिण ध्रुवापासून १,३०० किमी. अंतरावर असलेल्या ‘व्हस्टॉक’ या रशियन संशोधन केंद्राच्या ठिकाणी किमान -८९.२° से. तापमानाची नोंद झालेली आहे. दक्षिण ध्रुवावर सर्व दिशा उत्तराभिमुख असतात. या भागातील सर्व रेखावृत्ते दक्षिण ध्रुवात केंद्रित होत असल्यामुळे येथे कालविभाग निश्चित करता येत नाही. त्यामुळे तेथे कोणतीही वेळ ही स्थानिक वेळ असते. या ध्रुवीय प्रदेशात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फेरी मारल्यास ती पूर्व दिशा दर्शविते तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फेरी मारल्यास ती पश्चिम दिशा मानली जाते. अतिथंड ओसाड प्रदेशामुळे दक्षिण ध्रुवावर कायमस्वरूपी वनस्पती व प्राणिजीवन आढळत नाही. अंटार्क्टिकावर मात्र सपुष्प वनस्पती, शेवाळी वनस्पती, पेंग्विन पक्षी, सील, देवमासा (व्हेल) इत्यादी मासे आढळतात.

अंटार्क्टिका या स्थिर भूखंडीय प्रदेशामुळे उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुवावर जाणे व तेथील अभ्यास करणे अधिक सुलभ आहे. नॉर्वेजियन समन्वेषक रोआल आमुनसेन हे १४ डिसेंबर १९११ रोजी दक्षिण ध्रुवावर पोहोचले होते. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी तीच पहिली व्यक्ती होय. त्यानंतर १७ जानेवारी १९१२ रोजी ब्रिटिश समन्वेषक रॉबर्ट फाल्कन स्कॉट यांनी दक्षिण ध्रुवाची सफर केली होती. २९ नोव्हेंबर १९२९ रोजी अमेरिकन वैमानिक व समन्वेषक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांसह विमानातून दक्षिण ध्रुवावर फेऱ्या मारल्या होत्या. बर्ड हे ९ मे १९२६ रोजी विमानातून उत्तर ध्रुवावर जाऊन आल्याचे मानले जाते; परंतु ते उत्तर ध्रुवापासून २४० किमी. पर्यंत गेल्याचे नंतर लक्षात आले. पुढे दक्षिण ध्रुवावर अनेक सफरी गेल्या होत्या. महिलांचा एक गट १९६९ मध्ये दक्षिण ध्रुवावर पोहोचला होता. ब्रिटिश समन्वेषक रॉबर्ट स्वान यांनी ११ जानेवारी १९८६ रोजी दक्षिण ध्रुवावर जाऊन आल्यानंतर उत्तर ध्रुवावरील सफरीचे आयोजन करून १४ मे १९८९ रोजी त्यांनी ते उद्दिष्टही साध्य केले. त्यामुळे दोन्ही ध्रुवांवर चालणारी ती पहिली व्यक्ती ठरली. दक्षिण ध्रुवावर संयुक्त संस्थानांचे १९५६ पासून आमुनसेन–स्कॉट संशोधन स्थानक आणि धावपट्टी आहे. या स्थानकावर संशोधनासाठी शास्त्रज्ञ व साहाय्यक कर्मचारी अशा साधारण ५० ते २०० व्यक्तींचे वास्तव्य असते. वास्तव्यासाठी व संशोधनासाठी तेथे त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आज आमुनसेन–स्कॉट दक्षिण ध्रुवीय संशोधन स्थानकावर विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे. या संशोधनातून हिमनदीशास्रज्ञ, हवामानशास्रज्ञ, भूगर्भशास्रज्ञ यांना विविध घटनांसंबंधीची माहिती प्राप्त होते. अलीकडच्या संशोधनातून खंडवहन सिद्धांताच्या पृष्ट्यर्थ मिळालेले पुरावे सिद्ध झाले आहेत. दक्षिण ध्रुवीय प्रदेशातून प्राप्त खडकांचे नमुने उष्णकटिबंधीय भूखंडाच्या खडकांशी स्वरूप आणि काळाच्या संदर्भात तंतोतंत साधर्म्य दर्शवितात. इ. स. २००९ मध्ये संयुक्त संस्थानेद्वारा दक्षिण ध्रुवीय प्रवास मार्ग बांधण्यात आला. या मार्गाला मॅकमुर्डो – दक्षिण ध्रुव महामार्ग असे म्हणतात. तो कच्चा असून त्याची एकूण लांबी १,६०० किमी. आहे. हा मार्ग संपूर्ण अंटार्क्टिक हिमक्षेत्रीय प्रदेशातून जात असून तो मॅकमुर्डो स्थानक ते आमुनसेन – स्कॉट दक्षिण ध्रुवीय स्थानकापर्यंत पसरला आहे. मॅकमुर्डोपासून दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचण्यासाठी साधारणपणे एकूण ४० दिवस लागतात. तरीही हाच मार्ग सुकर, विश्वासार्ह आणि विमान वाहतूक खर्चाच्या तुलनेने कमी खर्चाचा आहे. ध्रुवावरील हिमाच्छादनाची हालचाल होत असल्याने त्यांच्याकडून स्थानकावरील परिवलनीय ध्रुवाचे सम्यक (तंतोतंत) स्थान नियमितपणे निश्चित केले जाते.

भारताकडून अंटार्क्टिकावरील व दक्षिण ध्रुवावरील वैज्ञानिक सफरींना १९८२ पासून सुरुवात करण्यात आली. अंटार्क्टिकावर १९८३ मध्ये दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र सुरू करण्यात आले; परंतु ते जास्त काळ कार्यान्वित राहिले नाही. कर्नल जे. के. बजाज हे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले (१९८९). भारतीय पोलीस सेवेतील अपर्णा कुमार या दक्षिण ध्रुवावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला होत. मैत्री (स्था. १९८९) व भारती (२०१२) ही अंटार्क्टिकावरील भारतीय संशोधन केंद्रे आहेत. या केंद्रांवर गेलेल्या वैज्ञानिक मोहिमांमध्ये भारतीय भूशास्त्रज्ञ, हिमनदी शास्त्रज्ञ, वातावरणवैज्ञानिक इत्यादींनी सहभाग घतलेला आहे. भारताची दक्षिण ध्रुवावरील पहिली वैज्ञानिक मोहिम २०१० मध्ये गेली होती.

संदर्भ : Amundsen, Roald; Chater, Arthur, The South Pole, 2001.

समीक्षक : शंकर चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.