महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातून वाहणाऱ्या घोड नदीवरील चिंचणी गावालगत असलेले एक मातीचे धरण. यास पाव किंवा पावा किंवा चिंचणी धरण असेही संबोधले जाते. घोड नदी ही भीमा नदीची प्रमुख उपनदी आहे. घोड नदी सह्याद्रीच्या (पश्चिम घाटाच्या) पूर्वेकडील उतारावर समुद्रसपाटीपासून सुमारे १,०९० मीटर उंचीवर उगम पावते. तिचे उगमस्थान पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात आहे. सुरुवातीला काहीशी पूर्ववाहिनी असणारी घोड नदी पुढे आग्नेय दिशेत वाहत जाऊन पुणे जिल्ह्यातील शिरूर व दौंड तालुक्यांच्या सीमेवर सांगवी गावाजवळ भीमा नदीला मिळते. या नदीच्या वरच्या भागात तिला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे पूर्वी दरवर्षी या नदीला मोठा पूर येत असे. घोड खोऱ्याचा मध्य व पूर्व भाग कमी पावसाचा दुष्काळी भागात मोडतो. त्यामुळे शिरूर तालुक्यात या नदीवर घोड धरण बांधून शेतीस पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

धरणाच्या खालच्या भागातील शेतीला, तसेच उदयोन्मुख औद्योगिक भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९६५ मध्ये शिरूरजवळ घोड नदीच्या अगदी सपाट दरीत हे धरण बांधण्यात आले. हे धरण शिरूर, श्रीगोंदा व कर्जत या तीन तालुक्यातील सुमारे ५० गांवांना वरदान ठरत आहे. धरणाची क्षमता सर्व पूर सामावून घेण्यासाठी पुरेशी नसल्याने उजव्या बाजूला २९ दरवाजे असलेला एक खूप मोठा सांडवा (उत्प्लव मार्ग) बांधण्यात आला आहे. या धरणाची उंची सुमारे २९.६ मीटर व लांबी सुमारे ३,३०० मीटर आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता २,१६,३०० घन किमी. असून पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३०,९९२ चौ. किमी. आहे. धरणाच्या डाव्या कालव्याची लांबी ८६ किमी. व उजव्या कालव्याची लांबी ३२ किमी. असून ओलिताखालील क्षेत्र ३,०५५ हेक्टर आहे. हे धरण २००५ मध्ये पूर्ण झाल्यानंतर २,१२४ चौ. किमी. क्षेत्र व्यापण्यासाठी मूलत: हेतू असलेला जलाशय घोड मैदानावर साचला आणि ९५८ चौ. किमी. अतिरिक्त क्षेत्र पाण्याने व्यापले. धरणालगतचा प्रदेश कमी पावसाचा असल्यामुळे जलसिंचनाच्या दृष्टीने या धरणाला महत्त्व प्राप्त झाले असून बरेचसे क्षेत्र ऊसाच्या लागवडीखाली आणण्यात आले आहे. या धरणातून अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो.

संदर्भ : https://mwrra.maharashtra.gov.in/

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.