अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील सर्वांत उंच काँक्रीटचे कमानी धरण आणि जगातील सर्वांत उंच काँक्रीट धरणांपैकी एक. ॲरिझोना व नेव्हाडा या राज्यांच्या सरहद्दीवर, कोलोरॅडो नदीतील ब्लॅक कॅन्यनमध्ये हे धरण बांधलेले असून ते नेव्हाडा राज्यातील लास व्हेगास शहराच्या आग्नेयीस ४० किमी.वर आहे. अमेरिकन काँग्रेसने बोल्डर कॅन्यन नावाच्या या प्रकल्पास १९२८ मध्ये मंजूरी दिली. धरणाचे बांधकाम १९३० ते १९३६ या कालावधीत पूर्ण झाले आहे. केवळ या धरणाच्या बांधकामाचा खर्च १६५ द. ल. डॉलर झाला असून संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ३८५ द. ल. डॉलर झाला आहे. हूव्हर धरणाची उंची २२१ मी. आणि लांबी ३७९ मी. आहे. धरणाच्या भिंतीची माथ्यावरील रूंदी १४ मी. आहे. धरणाची काँक्रीट भिंत अतिशय मजबूत असून त्यावरील १४ मी. रुंदीच्या माथ्यावरून न्यूयॉर्क शहर ते सॅनफ्रँसिस्को यांदरम्यानचा दोन पदरी महामार्ग जातो. या धरणामुळे निर्माण झालेला मीड जलाशय हा जगातील सर्वांत मोठ्या जलाशयांपैकी एक आहे. या जलाशयाचा फुगवटा धरणापासून वर १८५ किमी.पर्यंत पसरलेला असून त्याची कमाल खोली १८० मी. व जलव्याप्तक्षेत्र सुमारे ६५० चौ. किमी. आहे. याची साठवण क्षमता ३३,६०,००० घ. मी. आहे.

या बहुउद्देशीय प्रकल्पाचे पूरनियंत्रण, जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती, घरगुती व उद्योगांस आवश्यक पाणीपुरवठा, वाहतूक हे उद्देश आहेत. अमेरिकेतील सर्वांत मोठी जलविद्युत सुविधा याठिकाणी असून त्यातील वीज कारखाने व शहरांना पुरविली जाते. याची विद्युतनिर्मिती क्षमता १,३४५ मे. वॉ. असून सुमारे १.३ दशलक्ष लोकांना त्याचा फायदा होत आहे. धरणापासून ३८६ किमी. लांबीचा कालवा काढण्यात आला आहे. त्यापासून ॲरिझोना, नेव्हाडा व कोलोरॅडो या तीन राज्यांतील सुमारे ४,००,००० हेक्टर क्षेत्र जलसिंचित केले जाते. कोलोरॅडो नदीतील पुराचे नियंत्रणही या धरणामुळे केले जाते.

धरणाच्या बांधकामासाठी आलेल्या कामगारांच्या निवासासाठी येथे बोल्डर या शहराची उभारणी केली आहे. १९४७ मध्ये अमेरिकन काँग्रेसने अ. सं. सं. चे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांच्या सन्मानार्थ या धरणाचे नामकरण हूव्हर धरण असे केले आहे.

इतर मोठ्या धरणांप्रमाणे हूव्हर धरणाचाही तेथील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. धरण बांधून झाल्यानंतरच्या नऊ वर्षांत धरणाखालचे नदीपात्र चार मीटरपेक्षा अधिक खोल खोदले गेले आहे. धरणाच्या खालच्या बाजूस या कॅन्यनवर ‘माइक ओ कॅलघन – पॅट टिलमन मेमोरिअर ब्रिज’ हा पूल आहे. या पूलाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. हे धरण एक राष्ट्रीय ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून ओळखले जाते. हूव्हर धरण व परिसराला दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात.

समीक्षक : वसंत चौधरी