लाओ-त्झू : (इ. स. पू. सु. ६०४ — इ. स. पू. सु. ५३१). चिनी तत्त्वज्ञानातील महान आचार्य. लाव् ज या नावानेही तो ओळखला जातो. त्याच्या चरित्राविषयी विश्वसनीय माहिती ज्ञात नाही. ताओ मत म्हणजे दाव् (मार्ग-विश्वचक्र) तत्त्वसंप्रदायाचा तो प्रवर्तक होता; या मतप्रणालीचा तो मूळ पुरुष होय. तथापि अशी कोणी व्यक्ती खरोखरच अस्तित्वात होती, असे मानायला सबळ पुरावा-आधार नाही. ‘लाव्’ म्हणजे म्हातारा किंवा वयोवृद्ध व्यक्ती. ‘लाव्’ हे आदरार्थी संबोधन आहे. दाव् मतप्रणालीचा मुख्य ग्रंथ दाव्-द्-मिंग (ताओ-ते-चिंग) म्हणजे ‘मार्गसूत्र’ असून तो लाव् ज याने रचला असे मानतात. यावर अनेक टीका लिहिल्या गेल्या आहेत आणि आणखीही लिहिल्या जातील, इतका हा ग्रंथ गूढ आहे. लाव् ज या व्यक्तीभोवती गूढतेचे वलय आहे आणि त्याच्या अस्तित्वाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. लाव् ज ही एक व्यक्ती नसून तीन व्यक्ती आहेत, अशीदेखील समजूत आहे. एका मतानुसार आचार्य लाव् ज हा कन्फ्यूशस (आचार्य खुंग) याचा समकालीन होता आणि त्याची दुसरी नावे लाव् दान् आणि ली अर् अशी होती; तथापि स्स-मा च्यन (इ. स. पू. १८५ ‒ इ. स. पू. ८६) याने लिहिलेल्या रेकॉर्ड्स ऑफ हिस्टोरियन्स या इतिहासग्रंथामध्ये आचार्य लाव् ज हा लो-यांग या राजधानीत राजाच्या दरबारी ग्रंथपाल किंवा शासकीय दप्तरखान्यात इतिहासकार म्हणून काम करीत होता आणि इ. स. पू. ५१७ मध्ये त्याची आणि कन्फ्यूशसची भेट झाली, असा उल्लेख आहे. पुढे जव् राजवटीचा ऱ्हास होत आहे याची जाणीव झाल्यावर लाव् ज याने लो-यांग सोडले व त्याच वेळी त्याने दाव-द-जिंग हा ग्रंथ लिहिला, असे स्स-मा च्यन म्हणतो. त्या काळात तत्त्वज्ञाला प्रौढ, वृद्ध आणि शहाणा या अर्थाने संबोधण्याची पद्धत दिसून येते. दुसरा एक लाव् ज हादेखील कन्फ्यूशसचा समकालीन मानला जातो आणि त्यालाही ताओ तत्त्वाशी संबंधित पुस्तकाचे श्रेय दिले जाते. लाव् ज म्हणून ज्ञात असलेली तिसरी एक व्यक्ती ही कन्फ्यूशसच्या मृत्यूनंतर १२९ वर्षे जगली होती, असेही म्हटले जाते. राजधानीतून निघून तो कोठे गेला आणि त्याचा मृत्यू केव्हा व कोठे झाला, हे कोणालाच माहीत नाही, असा उल्लेख आढळतो. लाव् ज याने दाव-द-जिंग हा ग्रंथ दोन विभागातून लिहिले. ते ‘योग्य वर्तनाचा मार्ग’ म्हणून ओळखले जाते. तो ८७ वर्षे जगून शांतपणे मृत्यू पावला असेही म्हणतात. लाव् ज स्वतः जव् राजवटीत होता, तरी त्याचे तत्त्वज्ञान हान राजवटीत प्रसृत झाले. दाव-द-जिंग या ग्रंथाचा लेखक एक नसून अनेक असावेत. तो संकलित ग्रंथ आहे, असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

लाव् ज आणि तरुण कन्फ्यूशस यांच्या भेटीविषयी स्स-मा च्यन (सुमा चियेन) लिहितो, “कन्फ्यूशसने लाव् जला इतिहासाविषयी प्रश्न विचारला होता. इतिहासातील थोर माणसे आता नाहीशी झाली. त्यांचे फक्त शब्द उरले आहेत’’, तेव्हा लाव् जने त्याला त्याच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा-आकांक्षा, निरनिराळी ध्येये, आवडीनिवडी, सोडण्याचा सल्ला दिला. त्याची शिकवण साधेपणाने राहण्याची होती. तिचा कन्फ्यूशसवर प्रभाव पडला. त्याला लाव् ज एखाद्या भव्य पौराणिक ड्रॅगनप्रमाणे वाटला.

लाव् जच्या तत्त्वज्ञानानुसार निसर्गतत्त्व किंवा निसर्गामागील शक्ती, ताओ (दाव-मार्ग) हे सर्वांत महत्त्वाचे तत्त्व होय. त्यात माणसाने ढवळाढवळ करू नये. निसर्गाच्या बलवत्तर शक्तीविरुद्ध काम करू नये. उलट, निसर्गाशी सुसंगत असे आपले वागणे असावे. हिंदू धर्मातील आत्म्याच्या संकल्पनेप्रमाणे ताओचे वर्णन केले जाते. ताओचा मार्ग वर्णनातात आहे, ती विश्वामागची शक्ती आहे, किंबहुना ताओ म्हणजेच विश्व आहे. ताओ हे तत्त्व सर्वांचे कारण आणि परिणामदेखील आहे.

दाव-द-जिंग या ग्रंथाचा भौतिक आणि आध्यात्मिक प्रभाव तत्कालीन तत्त्वज्ञानावर पडला. हा ग्रंथ म्हणजे एक दीर्घ गूढगुंजनात्मक काव्य आहे. त्यात शाब्दिक लीला आढळून येते. उदा. ‘अकर्म केल्याने कर्म घडते’ किंवा ‘दावचा अर्थ विशद करणाऱ्याला दाव काय आहे, हे समजत नाही’ वगैरे. या ग्रंथात विश्वाचे गूढ काय आहे, या प्रश्नावर सखोल आणि काव्यात्मक विचार असून चीनच्या वैज्ञानिक शास्त्रावर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. ‘यीन्-यांग’ (स्त्री आणि पुरुषतत्त्वे), पंचमहाभूते व त्यांचे परस्परसंबंध, विश्वचक्र (दाव) व त्याची गती आणि ओघ या विषयांची या ग्रंथातील चर्चा आणि अत्याधुनिक भौतिक विज्ञानांतील सिद्धान्त यांत फार साम्य आढळून येते.

समीक्षक – अमिता वाल्मिकी

प्रतिक्रिया व्यक्त करा