इस्लाम धर्मातील एक संकल्पना. निसर्गातील विकासप्रक्रिया हळूहळू पण संथगतीने होत असते. सूर्योदय होत असताना सूर्याचा प्रकाश पूर्वेच्या क्षितिजावर एका क्षणात पसरत नसतो. सूर्यबिंब हळूहळू वर येत असते आणि त्या प्रमाणात त्याचा प्रकाशही सर्व परिसरावर हळूहळू पसरत जातो. संध्याकाळी सूर्य मावळत असतानाच्या प्रक्रियेची पण प्रकाशाकडून अंधाराकडे अशी उलट्या दिशेने पुनरावृत्ती होत असते. सूर्य हळूहळू क्षितिजाआड जात असतो व त्याच गतीने अंधारही पृथ्वीवर पसरत असतो. थोड्याच वेळात भूतलावर रात्रीचे साम्राज्य सुरू होते. या नैसर्गिक प्रक्रियेला ‘कुराणा’मध्ये ‘तकरीर’ म्हटले आहे. ही प्रक्रिया निसर्गात सर्वत्र आढळते.

मानवाच्या जीवनप्रवासात त्याला वेगवेगळ्या परिस्थितीतून जावे लागते. त्यामुळे अनेक टप्प्यांवर थांबून प्राप्त परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाची आखणी करणे त्याला आवश्यक असते. क्रमाक्रमाने पण संथगतीने होणाऱ्या या प्रक्रियेमुळे मानवाला अशा आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढणे शक्य होते. अशा परिस्थितीवर मात करून पुढे जाता यावे म्हणून नियतीनेच ती तरतूद केलेली असते, हाही अल्लाहच्या रेहमतचा किंवा अनुकंपेचाच आविष्कार आहे. जीवनातील उत्क्रांतीची ही प्रक्रिया उन्नती व अवनती या दोन्ही अवस्थांतून योग्य मार्ग काढण्यासाठी सारखीच उपयोगी पडते. उन्नतीच्या काळात आपले यश सर्वार्थाने परिपूर्ण करण्यासाठी, तर अवनतीच्या काळात हातून झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी ती उपयोगी पडते.

संथगतीने व क्रमश: होणाऱ्या या नैसर्गिक विकासप्रक्रियेची सैद्धांतिक मांडणी ‘कुराणा’च्या पुढील आयतात (श्लोकात) करण्यात आलेली आहे : “त्याने (अल्लाहने) आकाश आणि पृथ्वी यांची निर्मिती अर्थपूर्ण उद्देशाने केली आहे. तोच रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र आणतो. त्यानेच सूर्य आणि चंद्र यांना आपल्या नियमांच्या अधीन ठेवले आहे. त्यांपैकी प्रत्येक जण त्याला नेमून दिलेली भूमिका निश्चित वेळेत पार पाडत असतो. लक्षात ठेवा, तो सर्वशक्तिमान व तितकाच क्षमाशील आहे” (३९:५).

मानवी जीवन संघर्षमय असले, तरी जीवनातील संकटांचा आणि दु:खांचा मुकाबला करण्याची उर्मी त्याच्यात उपजतच असल्यामुळे या संकटांतून मार्ग काढून आपले जीवन पूर्ववत सुखी करण्याचा तो प्रयत्न करत असतो. जीवनातील सुखदु:खाच्या या पाठशिवणीच्या खेळातच सुखी जीवनाचे रहस्य दडलेले असते. ते रहस्य उलगडून दाखविण्यासाठी ईश्वराने दिवस वा रात्रीचा दृष्टांत दिला आहे, तो असा :

“निश्चितच आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्मितीमध्ये आणि रात्र व दिवस यांच्या गमनागमनमध्ये समजदार लोकांसाठी स्पष्ट संदेश आहे.”

‘समजदार लोकांसाठी स्पष्ट संदेश आहे’, अशा तऱ्हेची शब्दयोजना ‘कुराणा’त अनेक ठिकाणी आली आहे. अशा विधानात गर्भित असलेला अर्थ समजूतदार म्हणजेच सुविद्य किंवा अलीम (ज्ञानी) व्यक्ती समजू शकते, असा आहे. दिवसामागून येणारी रात्र आणि रात्रीमागून येणारा दिवस ही मानवी सुखदु:खाची प्रतीके आहेत. रात्र संपून नवा दिवस उगवतो याचाच अर्थ असा की, जीवनातील दु:खे, संकटे यांच्याशी संघर्ष करून मानवाने त्यांवर मात केली आहे आणि म्हणूनच त्याला नव्या दिवसाचा प्रकाश दिसला आहे.

रात्र आणि दिवस या प्रतिकांना ‘कुराणा’त आणखी दोन अर्थच्छटा आहेत. निसर्ग आणि जीवन यांतील विविधता आणि विसंगती किंवा एकमेकांविषयी क्रियाप्रतिक्रिया यांमुळे जीवन सुसह्य होण्यास साह्य होते. त्याचप्रमाणे एकूण चोवीस तासांच्या कालखंडाचे दिवस आणि रात्र असे दोन भाग पडल्यामुळे मानव दिवसा काम आणि रात्री आराम करू शकतो. दिवसभराच्या क्रियाशीलतेमुळे रात्रीचा विश्रांतिकाळ मानवाला साहजिकच स्वागतार्ह वाटतो, तर रात्री विश्रांती घेतल्यामुळे येणाऱ्या दिवशी तो नव्या उमेदीने कामाला लागतो किंवा लागू शकतो.

संदर्भ :

  • Husain, Athar, ‘Prophet Muhammad and His Mission’, New Delhi, 1967.
  • Kidwai, Mohammad Asif, ‘What Islam Is?’, Lucknow, 1967.
  • Salahi, M. A. ‘Muhammad : Man and Prophet’, Massachusetts, 1995.
  • Watt, W. Montgomery, ‘Muhammad : Prophet and Statesman’, Edinburgh, 1960.
  • अबुल हसन अली नदवी, ‘इस्लाम : एक परिचय’, नई दिल्ली, २०१६.
  • केळकर, श्रीपाद, अनु. ‘इस्लामची सामाजिक रचना’, पुणे, १९७६.

समीक्षक : अन्वर राजन


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.