हिमालय पर्वतातील काराकोरम या पर्वतश्रेणीतून वाहणारी एक हिमनदी. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील शिगार जिल्ह्यात ही हिमनदी आहे. तिची लांबी ६३
किमी. असून रुंदी दोन ते तीन किमी. आहे. ध्रुवीय प्रदेशाबाहेरील सर्वाधिक लांब हिमनद्यांपैकी ही एक हिमनदी आहे. काराकोरमच्या चार प्रमुख रांगांपैकी उत्तरेस व पूर्वेस असलेली मुझताघ पर्वतरांग आणि दक्षिणेकडील माशेरब्रुम पर्वतरांग यांच्या दरम्यान असलेल्या दरीतून ही हिमनदी वाहते. बालतोरो हिमनदीच्या प्रदेशात सुमारे २० किमी. च्या परिक्षेत्रात ८,००० मी. पेक्षा अधिक उंचीची पुढील चार शिखरे आढळतात : के-टू किंवा मौंट गॉडविन ऑस्टिन (उंची ८,६११ मी.), हिडन पीक (८,०६८), ब्रॉड पीक (८,०४७ मी.), गाशेरब्रुम-दुसरे (८,०३५ मी.). यांपैकी के-टू हे काराकोरम पर्वतातील सर्वोच्च व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. के-टू हे भारतातीलदेखील सर्वांत उंच शिखर मानले जाते; कारण तो भाग सध्या पाकव्याप्त असला तरी, तो भारताचा अविभाज्य प्रदेश आहे. याशिवाय बिराचेडी (बिराखेडी), चोगोलिसा, गाशेरब्रुम – १, ३, ४, माशेरब्रुम, मुझताघ टॉवर, स्नो डोम, ट्रँगो टॉवर्स, उली बियाहो ही या हिमनदीच्या परिसरातील प्रमुख शिखरे आहेत.
बालतोरो हिमनदीच्या ईशान्येस सिआचेन (स्याचेन) ही पसिद्ध हिमनदी असून या दोन हिमनद्या कॉन्वे या खिंडीमुळे (सॅडलमुळे) अलग झाल्या आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी डावपेचाच्या दृष्टीने सिआचेन या खिंडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या हिमनदीची द्रोणी बरीच रुंद आहे. बालतोरो हिमनदी दिवसाला दोन मीटर पुढे सरकते. जागतिक हवामान बदलामुळे हिमालयातील बहुतेक हिमनद्या दिवसेंदिवस मागेमागे सरकताना आढळतात. २००१ ते २०११ यांदरम्यान केलेल्या शास्त्रीय निरीक्षणानुसार बालतोरो हिमनदीतील हिमाच्छादन कमी झाले असले, तरी ती हिमनदी मागे सरकलेली आढळली नाही. ही हिमनदी सुमारे १,५०० चौ. किमी. क्षेत्राचे जलवाहन करते.
बालतोरो हिमनदी हा ब्राल्डू नदीला पाणीपुरवठा करणारा प्रमुख स्रोत आहे. ब्राल्डू ही शिगार नदीची उपनदी असून शिगार ही सिंधू नदीची उपनदी आहे. ब्राल्डू ही तिच्या खोऱ्यातील प्रदेशाला पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाची नदी आहे. अनेक उप हिमनद्या बालतोरो या मुख्य हिमनदीला हिमाचा पुरवठा करतात. त्यांपैकी के-टू शिखरापासून दक्षिणेस वाहणारी गॉडविन ऑस्टिन हिमनदी, अब्रुझी हिमनदी, गाशेरब्रुम या समूहशिखरांच्या परिसरातून वाहणाऱ्या वेगवेगळ्या हिमनद्या, चोगोलिसा पर्वतश्रेणीकडून वाहत येणारी विग्ने हिमनदी, माशेरब्रुम पर्वतश्रेणीकडून वाहत येणारी येर्मनदेंदू या यातील प्रमुख उप हिमनद्या आहेत. छोट्या उप हिमनद्या मुख्य हिमनदीला मिळतात तेथे हिमप्रपात निर्माण झालेले आढळतात. कॉनकॉर्डिया येथे समुद्रसपाटीपासून ४,६०० मी. उंचीवर बालतोरो हिमनदीला गॉडविन ऑस्टिन हिमनदी येऊन मिळते. कॉनकॉर्डिया व त्यापुढील के-टू बेस कँप (मुख्य तळ) ही ट्रेकिंगसाठीची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. के-टू बेस कँपकडे ट्रेकिंगला जाण्यासाठी या हिमनदीमार्गाने पैयू (पैजू), उर्दूकास व कॉनकॉर्डिया या ठिकाणांवरून जाता येते. हा ट्रेकमार्ग सुमारे १० दिवसांत पूर्ण करता येतो. के-टू, ब्रॉड पीक व ट्रँगो टॉवर्स या शिखरांनी वेढलेल्या हा ट्रेकिंगमार्गाचे सौंदर्य विशेष मनोहारी असते; परंतु अधिक उंची, असह्य हवा, ओबडधोबड भूप्रदेश यांमुळे प्राकृतिक दृष्ट्या हा ट्रेकमार्ग खडतर असतो. जुलै व ऑगस्ट हे महिने ट्रेकिंगसाठी योग्य असतात. या हिमनदीकडे म्हणजेच काराकोरम पर्वताकडे, तसेच हिमनदी परिसरातील ट्रेकिंगसाठी स्कार्डू खोऱ्यात वसलेल्या बाल्टी या शहरापासून जाता येते. हिमनद्यांच्या झीज कार्यामुळे येथील खडकांवर खोदलेली रेखांकने दिसतात. हिमोढाचे ढीग आढळतात. चलनक्षम हिम आणि हिमनद्यांमुळे या भागात द्रोणी (खळगे) निर्माण झालेल्या असून द्रोणी भागांत अनेक हिमानी सरोवरे निर्माण झालेली आढळतात.
संदर्भ : Ribechini, Paolo, Picture Guide Book of Mountains in Baltoro Glacier Area, 2023.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.