वैद्य, विदिता : (१९७१). भारतीय चेताशास्त्रज्ञ. त्यांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र चेताविज्ञान आणि रेणवीय मनोविकृतीचिकित्सा हे आहेत. वैद्यकीय विषयासाठी त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २०१५ मध्ये प्रदान करण्यात आला. नेचर नियतकालिक प्रकाशित करणाऱ्या संस्थेने त्यांचा उत्कृष्ट विद्यार्थीस्नेही विज्ञान मार्गदर्शक (मेंटर) म्हणून गौरव केला आहे.

विदिता यांचा जन्म मुंबईतील गोरेगाव येथे झाला. लहान वयातच त्यांनी चिम्पान्झीतज्ज्ञ जेन गुडॉल या संशोधिकेची पुस्तके वाचली आणि डेव्हिड अटेनबरो यांच्या वन्यजीवन, निसर्गजीवन यावरील चित्रमालिका पाहिल्याने जीवशास्त्रज्ञ होण्याची प्रेरणा मिळाली. उच्च माध्यमिक शिक्षण मुंबईच्या रुईया महाविद्यालयात घेऊन विदिता पुढे सेंट झेवियर्स महाविद्यालयात दाखल झाल्यात. उत्तम टक्केवारी असूनही त्यांनी जीवशास्त्र आणि त्यातही प्राणी वर्तनशास्त्रात काम करण्याचे निश्चित केले. सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये पारंपरिक जीवशास्त्रापेक्षा व्यापक अभ्यासक्रम असलेल्या जीवविज्ञान आणि जीवरसायनशास्त्र या विषयांत त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. पुढे त्यांनी अमेरिकेतील न्यू हेवन, कनेक्टिकटमधील येल विद्यापीठातून रोनाल्ड ड्यूमन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवी संपादन केली. स्वीडनमधील कॅरॉलिन्स्का इन्स्टिट्यूट येथे अर्नेस्ट अरिनास यांच्यासह त्यांची पीएच.डी. नंतरचे संशोधनकार्य केले. नंतरही काही काळ ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात डेविड ग्रॅहम-स्मिथ यांच्याबरोबर संशोधन करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. भारतात परतल्यानंतर त्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे जीवशास्त्र विभागात सामील झाल्यात.

विदिता आणि त्यांच्या गटाचा अवसाद विरोधी औषधे पेशी पातळीवर कसा परिणाम करतात अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा गेली वीस वर्षे प्रयत्न करीत आहेत. काही औषधेही त्यांनी शोधून काढली आहेत. त्यांच्या प्रयोगशाळेत उंदरांसारख्या प्राण्यांवर प्रयोग केले जातात. तसेच त्यांचे संशोधन जन्मानंतरच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये भावनांच्या चेतामंडलांना आकार देण्यात सेरेटोनीनच्या भूमिकेवर आणि वेगाने काम करणाऱ्या नैराश्यविरोधी उपचारांच्या कार्यप्रणालीवर केंद्रित आहे. तणावाशी संबंधित मानसिक विकारांप्रति व्यक्तींमध्ये असुरक्षितता किंवा प्रतिकारशक्ती कशी विकसित होते, हे समजून घेण्यात त्यांना विशेष रुची आहे.

सध्या त्या मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे प्राध्यापिका आहेत.

कळीचे शब्द : #मेंदूचेता #संप्रेरके

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.