भारतातील आंध्र प्रदेश राज्याची नव्याने स्थापन केलेली राजधानी. लोकसंख्या १,४०,००० (२०१८). राज्याची राजधानी म्हणून विकसित होत असलेले हे एक सुनियोजित शहर आहे. आंध्र
प्रदेश राज्यातील गुंतूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. प्राचीन काळी यास ‘धरणीकोट’ किंवा ‘धान्यकटक’ असे म्हणत. गुंतूर आणि विजयवाडा ही दोन शहरे अमरावतीच्या नजिक आहेत. विजयवाडा शहरापासून पश्चिम वायव्येस सुमारे २९ किमी., तर गुंतूर या शहरापासून उत्तर वायव्येस सुमारे ३२ किमी. अंतरावर अमरावती शहर वसले आहे. अमरावती शहराचे भौगोलिक स्थान १६° ५१″ उत्तर अक्षांश व ८०° ५१″ पूर्व रेखांश असून ते समुद्रसपाटीपासून ४९ मीटर उंचीवर आहे. पूर्वीच्या आंध्र प्रदेश राज्याची विभागणी जून २०१४ मध्ये करून आंध्र प्रदेश व तेलंगण अशा दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीच्या १० वर्षांच्या संक्रमण कालावधीत आंध्र प्रदेश व तेलंगण या दोन्ही राज्यांची हैदराबाद ही संयुक्त राजधानी होती; परंतु आंध्र प्रदेश राज्याला एका नवीन व स्वतंत्र प्रशासकीय राजधानीची गरज होती. मध्यवर्ती स्थानामुळे आणि संभाव्य नागरी विकासासाठी येथे खूप वाव असल्यामुळे अमरावतीची राजधानी म्हणून निवड करण्यात आली. या सुनियोजित शहराची कोनशिला २२ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बसविण्यात आली.
अमरावती ही देशातील सर्वोत्तम स्मार्ट सिटी बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंध्र प्रदेश शासनाने अमरावतीच्या पुनरुत्थानाची व विकासाची योजना आखली असून त्यादृष्टीने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. भूसंपादन आणि पायाभूत सुविधांची निर्मिती ही या विकास योजनेची प्राथमिकता होती. सुरुवातीला तीन राजधान्यांची योजना घोषित केली गेली होती. त्यामध्ये विशाखापटनम् ही कार्यकारी राजधानी, अमरावती वैधानिक राजधानी आणि कुर्नूल ही न्यायिक राजधानी असेल, असा निर्णय झाला होता; परंतु पुढे ही तीन राजधान्यांची योजना रद्द करून अमरावती हे एकमेव राजधानीचे ठिकाण असेल, असे ठरविण्यात आले. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, हरित पट्टे आणि स्मार्ट सिटीला साजेसे तंत्रज्ञान केंद्र म्हणून हे शहर विकसित करण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे. वित्त, न्याय, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, प्रसार माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिकी ही क्षेत्रे विचारात घेऊन हे शहर विकसित केले जाणार आहे. विविध व्यवसाय गट व संस्थांकडून येथे गुंतवणूक आणली जाणार आहे. राज्य शासनाला प्रशासनाच्या दृष्टीने जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधा देण्याची योजना आहे. शहरात तसेच लगतच्या शहरांपर्यंत मोनोरेल, बीआरटीएस आणि ट्राममार्ग यांच्या साहाय्याने उत्तम वाहतूक सुविधा तयार करण्याच्या योजना आहेत. तसेच वेगवान वर्तुळाकार लोहमार्ग आणि मेट्रो मार्गांनी लगतची विजयवाडा, गुंतूर आणि तेनाली ही शहरे अमरावतीशी जोडण्याची योजना आहे. शहराच्या सभोवती नौकानयनासाठी कालवानिर्मितीचीही योजना आहे. विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमरावतीसाठीचा विमानतळ आहे. अशा रीतीने अमरावती हे भारतातील तसेच जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रशासकीय व आर्थिक केंद्र आणि स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे.
अमरावती शहर मंदिरांसाठी प्रसिद्ध असल्यामुळे त्यास ‘देवांचे निवासस्थान असलेले गाव’ म्हणून संबोधले जाते. पूर्वीपासून हे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. विशेषत: बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र म्हणूनही ते ओळखले जाते; कारण येथे प्रसिद्ध ‘अमरावती स्तूप’ आहे. हा स्तूप इ. स. पू. दुसऱ्या शतकातील असून शिल्पकलेतील ही एक भव्य कलाकृती मानली जाते. त्याच्यामध्ये बुद्ध जीवनावर आधारित शिल्प कोरलेली आहेत; परंतु आज हा स्तूप अवशिष्ट स्वरूपात आहे. आनंद केंटिश कुमारस्वामी यांच्या मते, ‘सर्व भारतीय शिल्पांत अमरावतीइतके नाजुक व विलासमय शिल्पपुष्प दुसरे नाही’. नंतरच्या काळातील दक्षिणेतील अनेक शिल्पकृतींवर अमरावती शैलीची छाप आढळते. जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथ (ऋषभनाथ) यांचा येथे सापडलेला संगमरवरी पुतळा आणि शिलालेख यांवरून या शहराचे प्राचीन महत्त्व दिसून येते.
इसवी सन पूर्व तिसऱ्या ते दुसऱ्या शतकातील सातवाहन वंशाच्या कारकीर्दीत अमरावतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. सातवाहनांचा धर्म आणि वाङ्मय यांना उदार आश्रय होता. त्यांचा बौद्ध धर्मालाही आश्रय होता. त्यांनी बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे आणि यात्रेचे अमरावती हे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित केले. त्या काळात येथील बौद्ध मठात आणि विद्यापीठात संपूर्ण भारतभरातून आणि पूर्व व आग्नेय आशियातून अभ्यासासाठी विद्यार्थी येत असत. सातवाहन कारकीर्दीच्या अस्तानंतर इक्ष्वाकु राजवंशाच्या कारकीर्दीतही (इ. स. तिसरे आणि चौथे शतक) अमरावतीतील बौद्ध संस्थाना असलेला पाठिंबा तसाच पुढे चालू राहिला. सातवाहन आणि इक्ष्वाकु राजवटीत उत्कर्षाच्या शिखरावर असलेल्या अमरावतीतील बौद्ध संस्थांचे महत्त्व पल्लव वंश, चोल वंश व विजयानगर साम्राज्य या मध्ययुगीन दक्षिण भारतीय साम्राज्यांच्या काळात कमी झाले.
मध्ययुगीन काळात बांधण्यात आलेल्या अमरेश्वर या शिवमंदिरामुळे अमरावती पुन्हा प्रसिद्धीस आले. आंध्र प्रदेशातील पाच पवित्र पंचराम शिवमंदिरांपैकी एक अमरावतीचे मंदिर आहे.
मध्ययुगात अमरावती हे हिंदु धर्मीयांचे प्रमुख यात्रास्थान बनले होते. तारकासूर राक्षसाला पराभूत करण्यासाठी देव, यक्ष (यक्ष-यक्षी) व किन्नर यांनी येथे तपश्चर्या केली होती, अशी मिथ्यकथा या स्थळाविषयी सांगितली जाते.
ब्रिटिश राजवटीत अमरावती हे एक छोटे नगर बनले. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कॉलिन मॅकेंझी, सर वॉल्टर इलियट व अलेक्झांडर रिया या सर्वेक्षक व पुरातत्त्ववेत्यांनी येथे केलेल्या उत्खननात अनेक महत्त्वाचे प्राचीन कोरीव लेख, अवशेष व शिलालेख सापडले. त्यांपैकी बरेच चांगले नमुने ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात व शासकीय वस्तुसंग्रहालय, चेन्नई (मद्रास) येथे हलविण्यात आले. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेनेही तेथे उत्खनन केले आणि सापडलेल्या वस्तू नागार्जुनकोंडा येथील वस्तुसंग्रहालयात ठेवल्या आहेत. परंपरागत हस्तव्यवसाय व कारागिरीसाठी विशेषत: अमरावती शिल्पकलेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
संदर्भ : Rao, I. Y. R. Krishna, Whose Capital, AMARAVATHI?, Guntur, 2018.
समीक्षक : सुरेश फुले
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.