कृष्णन, यमुना : (२५ मे १९७४).  भारतात जन्मलेल्या अमेरिकन शास्त्रज्ञ. जीवरसायनशास्त्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीचे शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले (२०१३). तसेच त्यांना रसायनशास्त्र आणि महाविद्यालयातील लुई ब्लॉक प्रोफेसर म्हणून नामाभिधान देण्यात आले (२०२४).

यमुना यांचा जन्म चेन्नई येथे झाला. जैवमाहितीशास्त्र विषयाचे तज्ज्ञ आणि मदुराई विद्यापीठाचे उपकुलगुरू एस. कृष्णास्वामी यांपासून प्रेरणा घेऊन त्यांची प्रयोगांमध्ये रुची निर्माण झाली. मद्रास विद्यापीठाच्या विमेन्स ख्रिश्चन कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी (१९९३) घेऊन त्या बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये दाखल झाल्यात. पुढे रसायनशास्त्र विषयात एम.एस्सी. (१९९७) पदवी प्राप्त करून शंतनू भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी संपादन केली (२००२). विशिष्ट रेणू एकत्र येऊन महाप्रचंड रेणूंचे समूह कसे निर्माण करतात यांवर त्यांचे संशोधन होते. तसेच त्यांनी बंगळूरुमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेसमध्ये अधिछात्रवृत्ती मिळविली. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात पोस्टडॉक्टरल रिसर्च फेलो आणि १८५१ मध्ये रिसर्च फेलो म्हणून काम केले (२००१ — २००४).
यमुना यांनी लिपोसोम, द्रव स्फटिक, ऑरगॅनोजेल्स सारख्या नव्याने माहीत होत असलेल्या पदार्थ रचनांबद्दल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न डॉ. संध्या विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाने केले. त्यांच्या प्रयत्नामुळे लिपोसोम  वापरून एकापेशीत दुसऱ्या पेशीतील सजीवांचे डीएनए वहन करता येते, असे सिद्ध झाले. पाणी-तेलाचे मिश्रण काही विशेष प्रकारचे रेणू वापरून जेलीसारखे बनविण्याबाबत त्यांनी संशोधन केले. मोठ्या प्रमाणावरील तेलगळतीपासून होणारे पर्यावरणाचे नुकसान किमान राहील, तेल वेगळे करून एकत्र करणे आणि आर्थिक नुकसान मर्यादित राखणे यांसारखे फायदे होऊ लागले. त्यानंतर त्यांनी प्रथिने आणि केंद्राम्ले यांकडे लक्ष वळविले. केंब्रिज विद्यापीठातील शंकर बालसुब्रमण्यन यांच्या मार्गदर्शनाखाली चतु:सर्पिल (G-quadruplex) डीएनए रेणूची रचना शोधण्यासाठी त्यांनी संशोधन केले. कर्करोगग्रस्त पेशींमध्ये असे चार धागे असणारे डीएनए रेणू जास्त प्रमाणात आढळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतात परतल्यावर त्यांनीर बंगळुरुमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेसमध्ये जीवशास्त्र केंद्रित प्रयोगशाळेची स्थापना केली. त्यांनी स्वतःच्या गरजेनुसार घडविलेल्या केंद्राम्ल रेणूंचा पेशींच्या अंतरंगातील क्रियांची छाननी करण्यासाठी साधन म्हणून उपयोग करायला सुरुवात केली. सध्या त्या डीएनएचे विशिष्ट प्रकारचे प्रतिदीप्तीशील रेणूच्या साहाय्याने जीवित पेशींमधील जीवनक्रिया कशा घडतात यावर संशोधन करीत आहेत. विशेषतः पेशीच्या अंतरंगात द्वितीयक संदेशवाहक रेणूंच्या मदतीने संदेशवहन कसे होते, हे अशा रूपांतरित डीएनए रेणूंमुळे चित्रित करता येते आणि अप्रत्यक्षपणे पाहता येते. पेशींतील वेगवेगळ्या रिक्तिकांमधील द्रवाची रासायनिक घटना भिन्न असते. यमुना यांनी एका जिवंत पेशींतील भिन्न रिक्तिकांमधील द्रवाचे एकाचवेळी विश्लेषण करता येईल, सामू ठरवता येईल असे सूक्ष्मतंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाने विशिष्ट प्रकारच्या पेशींवर वा विशिष्ट पेशीअंगकांवर केंद्रित प्रयोग करता येऊ शकतात. उदा., लयकारिका पेशीतील टाकाऊ पदार्थ नष्ट करते. लयकारिकेतील द्रवात आम्ल असते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक आम्लता असलेल्या पेशी शरीरात कोठे एकत्र आल्या आहेत याचा शोध घेता येतो. लयकारिकेच्या कामात बिघाड झाल्याने विविध रोग होतात. यमुना यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान वैद्यक क्षेत्रात क्रांतिकारी ठरेल अशी अपेक्षा आहे.

यमुना यांनी लिहिलेले संशोधनपर लेख पुढीलप्रमाणे विविध वैज्ञानिक नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत : नेचर कम्युनिकेशन्स, नेचर मेथड्स, नेचर नॅनोटेक्नोलॉजी, ई-लाइफ़, नेचर केमिकल बायॉलॉजी, ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ बायोकेमिस्ट्री, न्यूक्ल‍िइक ॲसिड रिसर्च इत्यादी. तसचे त्यांना अनेक मानसन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे, त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : इनॉव्हेटिव्ह यंग बायोटेक्नॉलॉजिस्ट पदक, वेलकम ट्रस्टचे डीबीटी अलायन्स सिनियर रिसर्च ॲवार्ड, बॉस्टन यंग सायंटिस्ट ॲवार्ड, इंडियन नॅशनल सायन्स अकादमीतर्फे यमुना यंग सायंटिस्ट मेडल, भौतिक विज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस पारितोषिक इत्यादी.

यमुना २०१४ पासून अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात प्राध्यापकपदी कार्यरत आहेत.

कळीचे शब्द : #डीएनएच #रासायनिक #प्रतिमारेखन

संदर्भ :

  • https://krishnanlab.uchicago.edu/research1.htm
  • https://www.infosys-science-foundation.com/prize/laureates/2017/yamuna-krishnan.asp
  • https://en.wikipedia.org/wiki/Yamuna_Krishnan
  • https://chemistry.uchicago.edu/faculty/yamuna-krishnan

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.